असेही क्रांतीसिंह नाना पाटील...

असेही क्रांतीसिंह नाना पाटील...

क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. इंग्रजांच्या  काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा होता. त्यामुळे ते भूमिगत होते. पण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांच्या गावोगावी सभा सुरु होत्या. एका रात्री खानापूर तालुक्यातील एका गावात सभा होती. या सभेची माहिती कोणीतरी फितुराने पोलिसांना कळवली. त्यामुळे सभा सुरु असतानाच पोलिसांनी छापा टाकला. पण सगळे लोक एकदम उठल्यामुळे नाना पाटील व त्यांचे साथी पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत. मग रानावनातून काट्याकुटे तुडवीत त्यांचा प्रवास सुरु झाला.

रात्रभर उपाशीपोटी चालत होते ते. त्या काळोखात ते किती चालले त्याचं त्यांनाच माहीत? कोंबडा आरवला तेव्हा ते एका गावात आले होते. घराघरातून जात्याची घरघर ऐकायला येत होती. गावातील माताभगिनी जाग्या होऊन जात्यावर दळण दळत होत्या. एका घरासमोरून जाताना त्या घरातील दळण दळणाऱ्या भगिनीच्या गाण्यातून नानांना त्यांचे नाव ऐकायला आले म्हणून ते थांबले. लक्षपूर्वक आतील गाणे ऐकायला लागले तर ती बाई 'नाना पाटील हा माझा भाऊ आहे. तो देशासाठी लढत आहे. माझे आयुष्य नानाला दे. त्याच्या जीवाला काही बरवाईट होऊ नये.' असं मागणं जात्यावरील गीतातून देवाकडे मागत होती. तिचा तो स्वर भिडत होता. खूप जिवंतपणा होता त्या गाण्यात.  

नानांनी ते गाणं ऐकले आणि हा महाराष्ट्राचा क्रांतिसिंह तिथंच ढसाढसा रडायला लागला. आपल्या  साथीदारांना म्हणाला," बघा कोण कुठला हा नाना पाटील . पण या खेडयातील ही अनोळखी बहिण तिचं आयुष्य मला द्यायला तयार झाली आहे. जिने माझा अजून चेहराही पाहिलेला नाही." त्या घरामधून येणारे गाणे जसजसे कानावर पडायला लागले, तसे हे  सर्व क्रांतीकारक रडायला लागले. मग त्यांनी दारावर थाप मारली. त्या भगिनीने दार उघडले. दारात असणाऱ्या माणसांना पाहून तिने विचारले, "काहो ? कोण तुम्ही आमच्या मालकाकडं आलाय ? उठवू का त्यास्नी ? " 

"ताई, मला तुलाच भेटायचं हाय. तू आता ज्याला आयुष्य मागत हुतीस. त्योच तुझा भाऊ मी नाना पाटील. ताई तुझ्यासारखी बहिण पाठीशी असल्यावर कोण माझ्या केसालाही धक्का लावणार न्हाय. काळजी करू नगस." साक्षात् नाना पाटील समोर पाहिल्यावर ती हरकून गेली. त्या आनंदाच्या भरात  काय कराव आणि काय नको तिला झालं. तिनं नवऱ्याला जाग केलं .एका शेजारणीला बोलवून तिन पटपट जेवण बनविलं. सकाळी सकाळी भाकरी चटणी दही असं जेवण तयार करून भुकेल्या भावांना वाढलं. जेवत असतानाही या मंडळीना आतून हुंदका दाटत होता. आपल्याला कधीही न पाहिलेली बहिण आपल्यावरून आयुष्य ओवाळून टाकायला तयार होते हे पाहून ते गहिवरत होते. जेवण संपली. नाना व त्यांचे सहकारी जायला उठले . ती बहिण पुन्हा रडायला लागली. म्हणाली," जीवाला जपा. आता कोणालाच शब्द फुटत नव्हते. ते वाट चालत होते. बरंच अंतर गेल्यावर नाना म्हणाले,"अशी  माणसं  जर आपल्यासोबत असतील तर ह्यो नाना देशासाठी हजारवेळा मरायला तयार आहे." 

सच्चे नेते होते तेव्हाचे. त्यामुळे त्यांना सच्चे अनुयायी मिळत होते. असे भाग्य आजच्या नेत्याना मिळेल का ? आज नेत्यांसाठी आयुष्य द्यायला तयार होणारी बहिण आहे काय? कशी असणार? नेतेही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे  हवेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com