ज्याचं त्यालाच उपसावं लागतंय - भाग 2

श्रीराम गरड
शनिवार, 8 डिसेंबर 2018

तांबडं फुटायच्या आत नंदी आणि खंडोबा उठले होते. नंदीनं दोन्ही पोरांना अंघोळीला पाणी टाकलं अन् चहा करून दुपारच्या न्याहारीसाठी भाकरी थापत बसली होती. 

खंडोबा सगळं उरकून पाराकडं गेला होता. पाराजवळच सकाळी आणि संध्याकाळी एसटी येवून थांबायची. सातच्या एसटीचा वेळ झालाच होता. गावही बऱ्यापैकी जागं झालं होतं. रोज तालुक्याला कामाला जाणारे दोन चार लोकही पाराजवळच एसटीची वाट पाहत थांबले होते. खंडोबांनी वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना राम राम घालत पाराजवळच्या मारूतीचं दर्शन घेतलं. अन् घराकडं गेला.

तांबडं फुटायच्या आत नंदी आणि खंडोबा उठले होते. नंदीनं दोन्ही पोरांना अंघोळीला पाणी टाकलं अन् चहा करून दुपारच्या न्याहारीसाठी भाकरी थापत बसली होती. 

खंडोबा सगळं उरकून पाराकडं गेला होता. पाराजवळच सकाळी आणि संध्याकाळी एसटी येवून थांबायची. सातच्या एसटीचा वेळ झालाच होता. गावही बऱ्यापैकी जागं झालं होतं. रोज तालुक्याला कामाला जाणारे दोन चार लोकही पाराजवळच एसटीची वाट पाहत थांबले होते. खंडोबांनी वाट पाहणाऱ्या गावकऱ्यांना राम राम घालत पाराजवळच्या मारूतीचं दर्शन घेतलं. अन् घराकडं गेला.

नंदे.. उरक एसटीचा येळ झालाय. कव्हा भी एसटी येईल. आपून उरकून तिथं पाराजवळ थांबलेलं बरं. अन् पोरांचं उरकलं का गं? 

हा झालच बघा. दुपारच्या न्याहारीसाठी भाकरी थापल्यात. पोरांस्नी भी थोडं खाऊ घातलंय. अन् रात्री गोधा अक्कानं मिरच्या दिल्या होत्या. त्याचा ठेचा केलाय. राहिलेल्या बरणीतीलं आंब्याचं लोणचं भी घेतलंय.

बरं बरं ठिक हाय उरक. ये निल्या, पिट्या तुम्ही चला रं. दोघं ही बारकी भांड्याची गोणी घ्या. मी ही दुसरी गोणी अन् बाजरीचं बोचकं घेतो डोक्यावर.

असं म्हणत खंडोबा झपाझप पाराकडं गेला. दोघांनीही आपला संसार दोन चार गोण्यात भरला होता. अन् पारापाशी नेवून ठेवला होता. दोन्ही पोरांना तिथंच थांबवून काही राहिलंय का पाठीमागं पाहायला खंडोबा पुन्हा घराकडं गेला. नंदीनंही भाकऱ्यांचं गाठोड घेतलं. एका वायरच्या पिशीत तीचे अन् दोन्ही पोरांचे कपडे भरले होते ती पिशी एका हातात भरली अन् पाराकडं निघाली.

अहो ते कुलुप तिथं तुळशीच्या तिथं ठेवलंय. ते लावून या. अन् दरवाजाला जी फट हाय ना तिथं त्या दोन फळ्या लावा. म्हंजी कुत्रं मांजार आत शिरणार नाही. अन् त्यो लाईटीसाठी तारीवर टाकलेला आकडा भी काढला नाही तुम्ही. रातच्यालाच सांगितलं होतं तुम्हास्नी. या आता पटक्यान सगळं उरकून.

असं म्हणत नंदी पाराकडं गेली. खंडोबानं बांबूनं पटकन आकडा काढला. काखेत धरून गुंडाळला. अन घरातल्या  एका कोपऱ्यात ठेवून दिला. दरवाजा ओढून कडी लावली. फट दिसत होती तिथं दोन फळ्या आडव्या लावल्या. दरवाजाला कुलुप लावलं ते ओढून पाहिलं अन् घराकडं एकटक बघत चावी कंबराच्या करतोड्याला बांधली.

एसटीचा आवाज यायला लागला तसा खंडोबा झपझप पाराकडं निघाला होता. मोठं पोरगं निल्या आप्पा... आप्पा... करत निम्म्या रस्त्यात आलं होतं. आलो आलो तू फिर माघारी, तूह्या आईला सामान टाकू लाग असं म्हणत खंडोबानं पार गाठला. नंदी अन् पिंट्या सामान एसटीत टाकतच होते. मग खंडोबानं बाजरीचं बोचकं, भांड्याच्या गोण्या एसटीत भरल्या. तोपर्यंत नंदी दोन्ही पोरांना घेऊन एका सीटवर बसली. खंडोबानं नीट सामान टाकलं अन् गळ्यातल्या गमजानं घाम पुसत एका सीटवर बसला.

कंडक्टरनं घंटा वाजवली. ड्रायव्हरनं गिअर टाकला होता. पारापासून एसटी निघाली होती. पाराजवळचं मंदीर, शाळा, पाण्याची टाकी, वडाखालंच चहाचं दुकान, गावाशेजारी घरं, अन् आपली माणसं खिडकीतून पाठीमागं पडतांनी दिसत होती. अंधुक होत चाललेल्या गावाकडं खिडकीतून एकटक बघत खडोबानं तंबाखूची मळकटलेली पिशवी बाहेर काढली. चिमूटभर तंबाखू हातावर घेत. त्यातली मोठाली तंबाखू बाजूला न करताच त्याला चुना लावत एक दोनदा त्यावर बोट रगडून हातात चिमूट भरून तोंडात टाकली होती.

गाव दिसेनासं झालं होतं. नवे घरं, नवखी माणसं, नवखी शेतं, नवखी गावं एकामागून एक नजरेसमोरून जात होती मात्र खंडोबा एकटक खिडकीतून बाहेर पाहत कसल्यातरी विचारताच होता.

एसटी तालुक्याच्या ठिकाणी पोहचली होती. खंडोबाच्या जवळच्या नातेवाईकानं एक खोली बघून दिली होती. तिथंच हे राहणार होते. तो नातेवाईकही एसटी स्टॅन्डवर न्यायला आला होताच. सगळं सामान घेऊन यांनी खोली गाठली अन् एकदाच सामान टाकलं. 

खरं तर खोली लहानच होती पण तक्रार करायला पण जागा नव्हती. पोरांना शिकवायचंय म्हणून दोघांनी वाडवडिलांची शेतजमिन सोडून तालुका गाठला होता. 

नंदे भारीय ना खोली? नंदीनंही एक नजरेत सगळी खोली डोळ्यात भरली आणि तोंडावर खोटं हसू फुलवत हो म्हणाली.

नंदे खोली मिळाली हाय. ह्यो आपला नातेवाईक माहदू सोडता इथं आपल्या कुणी भी ओळखीचं नाही. आपून जास्त शिकलो भी नाहीत. दोघं भी आपुन अंगठे बहाद्दर. हातावर जेवढी बोट हाईत तेवढीच काय ते आपल्यांस्नी आकडेमोड येतीया. त्यामुळं आपल्याला सावलीत कुणी काम देणार नाय. जे काम भेटेल ते करावं लागेल.

अहो म्या काय म्हणतेय, तसं भी कुठं लई पैका पाण्याची आपल्याला अपेक्षा हाय. दोघा पोरांच्या शिक्षणाचा खर्च भागल अन् आपल्याही पोटात साजं सकाळी अर्धा कोर तुकडा पडेल एवढंच पाहिजे आपल्यांस्नी.

तुहं भी खरं हाय नंदे. बघतो उद्यापास्नं हिंडून कुठं काय कामधंदा भेटतो काय ते. आता पोरांस्नी जेवायला वाढ भुकले असत्यानं ते अन तु भी दोन चार घास खाऊन घे.

तव्हार म्या माहदू सोबत जावून पोरांच्या शाळाचं बघतो. आपल्यामुळं यांच्या शिक्षणाची आबदा नको बाबा. असं म्हणत खंडोबा घराबाहेर पडला होता...

इतर ब्लॉग्स