अमेरिकेतील शिस्तप्रिय निवडणूक

US election
US election

यंदा अमेरिकेतील निवडणूक अनुभवण्याचा योग आला. एक वर्षांपासून नवऱ्याच्या नोकरीनिमित्त आम्ही अमेरिकेत आहोत.आणि मी डिपेंडेंट व्हिसा (H4 ) वर आहे. मला या व्हिसामुळे नोकरी करण्याची परवानगी नसल्यामुळे खूप वेळ मिळतो. यामुळे सहज एकदा इकडच्या निवडणूक प्रचाराच्या रॅलीला जाण्याची संधी आली. आम्ही नॉर्थ कॅरोलिना राज्यात असल्यामुळे, या राज्यातील लोकांच्या मतांना प्रचारामध्ये अनन्य साधारण महत्व होत. त्यामुळे हिलरी क्‍लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यातील अनेक महत्वाच्या व्यक्तींची या राज्यात भाषणे झाली.

फेसबुक किंवा ई-मेल च्या माध्यमातून प्रचारासाठी कोण येणार आहे आणि त्याचे स्थळ वेळ इत्यादींची माहिती मिळायची. आणि मग त्यासाठी नोंदणी करावी लागायची (RSVP ) मग ई-मेल द्वारे confirmation मिळायचं.असच मीही डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने उपराष्ट्रपती पदासाठी उभे असलेले टीम केन यांच्या सभेसाठी नोंदणी केली. हा प्रचार वर्दळीच्या ठिकाणी भर शहरात होता. या साठी ई-मेल मध्ये एक ते दीड तास आधी येण्याची विनंती केली होती. वाहनतळासाठीची सोयीस्कर जागा आधीच ई-मेल द्वारे कळवली गेली होती.

प्रचाराची जागा एका महाविद्यालयाच्या आवारात होती. सुरक्षाव्यवस्था अगदी चोख होती. पण मला कुठेही जाताना किंवा येताना ट्रॅफिक ची झळ लागली नाही. प्रत्येक चौकात प्रचाराच्या ठिकाणचे तसेच वाहनतळासाठीचे फलक दिशा दाखवत होते. ई-मेल मध्ये आधीच पाणी आणि खाण्यासाठी काही आणावयास मज्जाव करण्यात आला होता. सगळ्यांना बिस्लेरी पाणी पुरवला गेले होते. एक दोन तास आधी सगळ्यांना बोलावून व्यवस्थित सुरक्षा तपासणी करून आत सोडले गेले. आबाल वृद्धांसाठी बसण्याची खास व्यवस्था पाहायला मिळाली. अनेक स्वेच्छूक कार्यकर्ते सगळ्यांना मदत करताना दिसले. प्रचारासाठीचे फलक सगळ्यांना वाटण्यात आले. जो पर्यंत उपराष्ट्रपतीसाठी उभे असलेले उमेदवार येण्याची वेळ झाली नव्हती तो पर्यंत इतर पदासाठी उभे असलेले त्या राज्याचे वेगवेगळे राजकीय नेते येऊन डेमोक्रॅटिक पक्षाविषयी आणि हिलरी क्‍लिंटन यांच्या कार्याविषयी माहिती सांगत होते. आणि त्यांना मत करण्याचे आवाहन करत होते.

अगदी ई-मेल मध्ये सांगितलेल्या वेळेप्रमाणे टीम केन भाषणासाठी व्यासपीठावर आले. कुठेही त्यांचा पुष्पगुच्छ अन्य इतर कोणत्याही वस्तू देऊन सत्कार करण्यात आलेला दिसला नाही. फक्त अमेरिकी रिवाज प्रमाणे हस्तांदोलन आणि आलिंगन पाहायला मिळाले. प्रचाराचे भाषण ठरलेल्या वेळेप्रमाणे संपले. विशेष कौतुक म्हणजे शेवटचे 15-20 मिनिट्‌स व्यासपीठावरून खाली येऊन उमेदवार गर्दीतील पुढे उभे असलेल्या उपस्थित मतदारांना भेटायला खाली आले आणि मग ते जे फलक सगळ्यांना वाटले होते त्यावर स्वाक्षऱ्या देत होते. सगळ्यांनी या भाषणासाठी येऊन वेळ दिल्याबद्दल धन्यवाद देत होते आणि फोटो काढण्यासाठी उमेदवाराच्या सुरक्षरक्षकांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आपला फोन घेऊन आपले उमेदवाराबरोबर छायाचित्रे काढून देत होते आणि ... आणि नशिबाने मला सुद्धा छायाचित्र घेण्याची संधी मिळाली.

निवडणुकीचा निकाल सगळ्यांसाठी बराच धक्कादायक होता.जरी डेमोक्रॅटिक पक्ष जिंकला नसला,तरीही हा सगळा अनुभव इतका सुखद होता. कुठेही धक्काबुक्की नाही. प्रचार संपल्यावर मी अमेरिकेतील निवडणूक प्रचारातील शिस्तप्रिय आठवणी घेऊन वेळेत घरी पोहचले..
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com