ओरी चिरैया, नन्ही सी चिडिया...

ओरी चिरैया, नन्ही सी चिडिया...

मुलगी नाही मुलगाच आहे माझा... 
आपल्या मुलीविषयी असं अभिमानाने सांगण्याची पद्धत आहे आजकाल. त्यातला अभिमान ही गोष्ट योग्यच, पण मुलगाच आहे असं का सांगायचं? तिच्या मुलगी असण्यात काय प्राॅब्लेम आहे?   

पण आपल्यात भिनलेली पुरुषप्रधान संस्कृती असं डोकं वर काढते अनेकदा. परिस्थिती बदलतेय असं मान्य करुनही.

कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात, तरीही त्या स्वतंत्रपणे यशस्वी असू शकतात हे आपण सहजी मान्य करतो, मग ही दोन भिन्न लिंग स्वतंत्रपणे समर्थ असू शकतात हे आपल्याला सहजपणे का मान्य होत नाही?

कदाचित मुलगी लग्न झाल्यावर दूर जाते हे मनात असल्यामुळे हे होत असावं... तेच ते, मुलगी म्हणजे परक्याचं धन वैगरे. पण आज ती परिस्थिती खरंच आहे? मुलगी लग्नानंतरही आपल्या आईवडिलांच्या संपर्कात असतेच. अनेक घरात तर कुलदीपक म्हणून जन्माला आलेल्या दिवटा आपल्या आईवडिलांना अंधारात सोडून पसार होतो. त्यावेळी दोन घरातला दुवा ठरलेला हा दिवाच प्रकाश देत असतो, आई वडिलांची खऱ्या अर्थानं काळजी घेत असतो. अशा वेळी ही माझी मुलगी नाही, मुलगाच आहे असं म्हणणं हे कौतुक आहे की आणखी काही हे आपण समजून घ्यायला हवं. 

 मुलं स्वतःच आकाश शोधतातच. मुलीही शोधणार. पण मुलींना आपल्या अंगणाची ओढ जरा जास्त असते, म्हणूनच तिला परत बोलावलं तर ती परतून येतेही...

ओरी चिरैया, नन्ही सी चिडिया,

अंगनामे फिर आजा रे...

अर्थात आज परिस्थिती बदलतेय. मुलगी झाली हो म्हणूनन गळा काढणं कमी झालंय. पण या बदलाचा तिचा वेग अंमळ मंदच आहे. त्यामुळे अधूनमधून काहींच्या हटवादीपणामुळे पुनःपुन्हा अंधार दाटून येतोच. महिलांवरचे अन्याय वारंवार बातम्यांमध्ये दिसतात ते त्यामुळे. पण आजच्या स्त्रीच्या क्षमतांवर विश्वास ठेवल्यास ती या परिस्थितीवर नक्कीच मात करेल. 

अंधियारा है घना, और लहू से सना

किरणों के तिनके, अंबरसे चुनके

अंगनामे फिर आजा रे... 

आपल्या मुलांवर कळत नकळत काही अन्याय आपण करत असतोच, त्यात मुलींवर थोडे जास्तच. पण कोणतीही व्यक्ती दूर गेल्यानंतरच तर तिची किंमत कळते, आणि आपल्या चुकाही. पण महत्वाचं तेच आहे, आपली चुक कळणं आणि ती मान्य करणं.

हमने तुझपे हजारो 
सितम है किये
हमने तुझपे जहाँ भरके 
जुल्म किये
हमने सोचा नही, 
तू जो उड जायेगी
ये जमीं तेरे बिन, 
सूनी रह जायेगी
किसके दम पे सजेगा 
मेरा अंगना

हे गाणं कोणत्याही सिनेमातलं नाही. आमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातलं आहे. शब्द आणि स्वर होते स्वानंद किरकिरेचे आणि संगीत होतं संदीप चौटाचं. किमान वाद्यमेळ आणि शब्दांना सर्वौच्च महत्व, यामुळे हे गाण थेट काळजात घुसतं आणि तरीही प्रत्येकाला त्यातून गवसणारी गोष्ट थोडी वेगळी असू शकते. 

हे गाणं अर्थातच लेकीविषयी आहे. पण अनेकदा जाणवतं असं, की आपल्या मुलीसाठी सारं आकाश देऊ करणारे आपल्या पत्नीने मात्र स्वयंपाकघराचं ``साम्राज्य`` सांभाळावं अशी अपेक्षा करतात. तिच्याकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पहायची सवयच नसते त्यांना. मुलीला तिला समजून घेणारा जोडीदार मिळावा अशी अपेक्षा मात्र असते त्यांची.    

तेरे पलकों मे सारे 
सितारे जडू
तेरी चुनर सतरंगी बनू
तेरी काजल मे 
काली रैना भरु
तेरे मेहंदीमे 
कच्ची धूप मलू
तेरे नैनों सजा दू 
नया सपना

आपल्या मुलीच्या स्वप्नाची अशी काळजी करतानाच, आपण आणखी कुणाच्या (मग ती पत्नी असेल बहिण असेल किंवा वहिनी असेल) स्वप्नावर पाय तर देत नाहीना हेही पहायला हवं. तिच्यावर अन्याय तर करत नाहीना, हेही तपासायला हवं.  कारण तीही कुणाची तरी मुलगी आहेच ना!

 हे चुक आहे हे एकदा प्रत्येकाला कळलं की जगातल्या प्रत्येक बापाची लाडकी लेक सुखी होईलच!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com