Loksabha 2019: तुम्हीच 'राजे' आहात आता.. पुढचे 72 दिवस!

सायली क्षीरसागर
मंगळवार, 12 मार्च 2019

कधीही आपल्या विभागात न फिरकलेल्या खासदार मंडळींची पुन्हा एकदा ताई, काका, नाना दादा अशी नावं होर्डींग्जवर झळकतील. पण शेवटी सगळ्या गोष्टी या मतदार राजाच्या हातात असल्यानं तोच ठरवेल कोण आपल्याला हवंय आणि कोण नकोय!

लहानपणी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकवलं होतं, मोठ्यांकडून ऐकलं होतं... संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर, लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव! कळायला लागलं, तसं अटल बिहारी वाजपेयी आदर्श पंतप्रधान वाटायचे, मनमोहन सिंह संयमी वाटायचे, तर आता मोदी आक्रमक वाटतात... दिल्लीला संसदेत गेल्यावर लोकसभा-राज्यसभा सभागृहातील ते भारावून टाकणारं वातावरण हे लोकशाहीचं महत्त्व सांगतं. आणि पुन्हा पडतो तो, आपण निवडून दिलेला खासदारही इथेच बसून आपले प्रश्न मांडत असेल का, हा 'साधा' प्रश्न!

एप्रिल 2014, लोकसभा निवडणूक... मोदी लाट आणि पहिलं मतदान... सगळंच जमून आलं होतं. घरातले सगळे 'सजग' नागरिक असल्याने त्यांनी मतदार यादीत नाव लगेच नोंदवलं. निवडणूकीपूर्वीच्या याद्यांमध्ये आपलं नाव आहे का यापासून मतदारसंघातील उमेदवार कोण या सगळ्याबाबत प्रचंड उत्सुकता होती. अचानक भारताचे 'जबाबदार' नागरिक होऊ घातल्याची भावना निर्माण झाली होती. घरातल्या लोकांची चर्चा (नाही म्हटलं तरी घरातल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव असतो), आजूबाजूच्या लोकांची मतं, जिथे राहतो तिथल्या सोयी आणि सद्यस्थिती! कशाचाच कशाला मेळ नव्हता... होती ती फक्त 'मोदी लाट'! कोण निवडून येणार, त्या ठिकाणी कोणाचा 'वट' आहे हे सगळं माहिती असूनही केवळ मोदी लाटेच्या प्रभावामुळे त्यावेळी बऱ्याच गोष्टी गृहीत धरून मतदान केलं होतं आणि आता पुन्हा तोच सगळा विचार करून वेगळा दृष्टीकोन समोर ठेऊन मतदानास तयार आहे.

काल-परवा लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि हा फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून झर्रकन सरकला. आता सगळ्या पक्षांची लगबग सुरू झाली ती उमेदवार जाहीर करण्याची... आता पक्षांतरं, टीका-टीपण्णी, जाहीरनामे, श्रेय घेणं-देणं या गोष्टी सुरू झाल्या आहेत. नाराज कार्यकर्ते पक्ष सोडून चाललेत, तर इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपले सगळे सोर्सेस पणाला लावतायंत... तरी अखेरीस पक्षश्रेष्ठींचा आदेश 'सर आँखोंपर' असं म्हणत, ठरलेला निर्णय स्वीकारत सगळे कामाला लागलेत. आपल्या कार्यकर्त्याला जिंकवून देण्यापासून ते पाडापाडीच्या राजकारणापर्यंत सगळ्या गोष्टी आता दिसतील. 

कोणत्याही निवडणूकीपूर्वी आपण मतदार म्हणून विचार करतो की, आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार किती 'पात्र' आहे; मग तो कोणत्याही पक्षाचा असो! जो सुजाण मतदार असतो तो हेही बघतो की, उमेदवाराची मजल ही फक्त होर्डिंगबाजीपुरतीच आहे की, खरंच त्या ठिकाणी काही कौतुकास्पद काम होतंय. काही वेळा निवडक मतदारसंघात त्या उमेदवाराचं फक्त नाव बघूनच आपण डोळे झाकून मतदान करतो, तर काही ठिकाणी अशा उमेदवारांची नावे जाहीर होतात ज्यांची 'अ'पासून ओळख शोधावी लागते! 

Image may contain: one or more people and text

सोशल मीडियाने या निवडणुकीच्या राजकारणात मोठी उडी घेतली आहे. सोशल मीडिया आणि त्यावरचे खूप सारे 'दिग्गज' लेखक! ते सांगतात की कोण किती पाण्यात आहे आणि कोणी कसं राजकारण करायला हवं... सगळेजण आपापली मतं मांडतायंत. 'मोदी किती ग्रेट' आणि 'राहुल गांधी किती आदर्श' यावर गप्पा रंगतायंत. यातही शेवटी आपण विसरतो की, घरबसल्या मोदी-गांधींची मापं काढण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील खासदारसाहेबांनी 'किती' आणि 'कशी' कामं केली आहेत? याकडे नीट लक्ष दिलं तर समजेल, की आपलं आणि त्या खासदाराचंही भविष्य याच कामांवर अवलंबून आहे.

लोकसभा निवडणूक म्हणजे देशभर दोन महिने नुसता प्रचारसभांचा आणि घोषणांचा सुकाळ असेल. मेट्रो ते गल्लीतील कामांपासून सगळ्या गोष्टींचा दाखला आपल्याला दिला जाईल. अचानक साक्षात्कार झाल्यासारखी रस्ते आणि पाईपलाईनसाठी खोदाखोदीची कामं सुरू झालेली दिसतील. कधीही आपल्या विभागात न फिरकलेल्या खासदार मंडळींची पुन्हा एकदा ताई, काका, नाना दादा अशी नावं होर्डींग्जवर झळकतील. पण शेवटी सगळ्या गोष्टी या मतदार राजाच्या हातात असल्यानं तोच ठरवेल कोण आपल्याला हवंय आणि कोण नकोय!

इतर ब्लॉग्स