LokSabha2019: निवडणूकीच्या तोंडावर फेसबूककडून पक्षपातीपणा

facebook
facebook

फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधीत तब्बल 687 फेसबूक पेज आणि अकाऊंट्सवर कारवाई करून ती हटवली. कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीसाठी अत्यावश्यक झालेल्या सोशल मिडियामध्ये फेसबूकचे महत्त्व अधिक आहे. त्यातही निवडणूकांच्या प्रचारासाठी त्याची गरज अधिकच असते. परंतु, ऐन लोकसभा निवडणूकीच्या रणधूमाळीत अशी कारवाई होण्यामागेही काहीतरी षडयंत्र नक्की असावे अशी शंका घेण्यास वाव आहे. या फेसबूक पेज व अकाऊंट्सवरून आक्षेपार्ह, द्वेष पसरविणारा मजकूर प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून ही कारवाई केल्याचे सांगितले गेले आहे. 

मागील दोन वर्षांपासून सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सातत्याने लिहिणाऱ्यांचे अनेक फेसबूक पेज व अकाऊंट्सवर फेसबूककडून कारवाई करण्यात आली आहे. 
त्यातील काही उदाहरणे
- बोलता हिंदुस्थान 
- जनता का रिपोर्टर - रिफात जावेद
- जनज्वार - प्रेमा नेगी, अजय प्रकाश
- यूट्यूबर ध्रुव राठी

आदींच्या फेसबूक पेजवर कारवाई करून ती बंद करण्यात आली होती. या सगळ्यांमधील समान धागा म्हणजे हे सगळेजन नरेंद्र मोदी, भाजप यांच्या विरोधात सातत्याने लिखान करणारे, मत मांडणारे, मोदी सरकारच्या धोरणांची, भाषणांची चिकित्सा करणारे लोक आहेत.  आता तर फेसबूकने थेट काँग्रेससारख्या मोठ्या राष्ट्रीय पक्षालाच टार्गेट केले आहे. देशातील सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाच्या फेसबूक पेज व अकाऊंट्सवर कारवाई होत असेल तर छोट्या-मोठ्या बातच वेगळी.

फेसबुकच्या सामाजिक मानकांनुसार द्वेष, हिंसा, गुन्हेगारी, मानहानी, अश्लिल छायाचित्र, नागरिकांना त्रास होणाऱ्या पोस्ट, लैंगिक शोषणासंबंधीच्या पोस्ट टाकणे आक्षेपार्ह समजले जाते. अशा स्वरुपाच्या पोस्ट आढळल्यास फेसबूक त्या व्यक्तीचे खाते किंवा पेज बंद करु शकते. हे योग्य जरी असले तरी ही कारवाई निवडक किंवा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच का केली जाते हा खरा प्रश्न आहे. ध्रुव राठी हा तरुण यूट्यूबर मोदींच्या धोरणांची चिकित्सा करण्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. निवडणूकीच्या तोंडावर मोदी सरकारच्या अनेक धोरणांची गंभीर चिकित्सा करण्याचे काम त्याच्याकडून सातत्याने सुरु असताना 18 मार्च रोजी फेसबूककडून त्याच्या फेसबूक पेजवर 30 दिवसांची बंदी घालण्यात आली. निवडणूकीच्या तोंडावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे जगभरातून फेसबूक विरोधी सुर उमटल्यानंतर ही बंदी उठविण्यात आली. आज घडीली ध्रुव राठींच्या यूट्यूब चॅनेलचे 17 लाखाहून अधिक नियमित दर्शक असून त्याने 170 पेक्षा अधिक व्हिडिओ यूट्यूब वरून प्रसारित केले आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत. इतरही फेसबूक पेज व अकाऊंट्सवर मोदी व भाजपवर टिका केली जाते. त्यांच्यावरही वेळोवेळी बंदी घालण्यात आली होती.

नरेंद्र मोदींनी 2014 ची लोकसभा निवडणूकीत सोशल मिडीयाला शस्त्र म्हणून वापरले. त्यांना यश मिळवून देण्यात सोशल मिडीयाच्या सर्वात मोठा वाटा आहे. मोदींची प्रतिमा उंचावण्यात सोशल मडियाचा आतापर्यंत सर्वात प्रभावी वापर केला होता, अजूनही केला जात आहे. परंतु, आता विरोधकांच्याही हाती हे प्रभावी शस्त्र लागले. त्यानीही त्याच सोशल मडियाचा वापर प्रभावीपणे सुरु केल्यानंतर मात्र त्यांच्याकडे आक्षेपार्ह मजूकर आढळून येऊ लागले आहेत. फेसबूकने जगाला एकमेकांशी जोडले असले तरी ती एक भांडवली कंपनी आहे आणि तिचा मालक मार्क झुकेरबर्ग एक भांडवलदार आहे. आणि कोणत्याही भांडवली कंपनीचा मुख्य हेतू नफा कमवीने हा असतो. यासाठी असे भांडवलदार हे नेहमी सत्तेत असणाऱ्यांच्या बाजूचे असतात यात नवीन सांगण्यासारखे काही नाही. 

फेसबूक आणि व्हॉट्सअॅप या दोन्ही सोशल मिडीयाचा मालक एकच आहे. यावरून फिरणाऱ्या फेक न्यूज मुळे युरोपातील काही देशांनी फेसबूकच्या पक्षपाती पणावर प्रश्न उपस्थित केला होते. या देशांनी स्थापन केलेल्या समीतीसमोर स्पष्टीकरण देण्याची वेळ झुकेरबर्गवर आली होती. त्याचवेळी मोदी सरकारने फेसबूक व व्हॉट्सअॅप वरील फेक व्हिडिओ, न्यूज यातून झालेल्या मॉब लिंचिंग, द्वेष पसरविणाऱ्या पोस्टमुळे निर्माण झालेले तणावग्रस्त वातावरण सुधारण्यासाठी फेबबूकला केवळ तांत्रीक सुधारणेचा सल्ला दिला होता. द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ सोशल मडिया वापरणारा प्रत्येक माणसाला दिवसातून एक वेळातरी दिसत असतील. त्यावूरून पुढील काळात किती फेसबूक पेज व अकाऊंट्सवर कारवाई होणार हे पाहण्यासारखे असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com