कारणराजकारण : स्वार्थाचा विकास; बाकी भकास

सम्राट फडणीस
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

कौशल्य विकास वगैरे कागदावर असतो. अनुदानासाठीचा. बाकी सब झुठ. काँग्रेस असो किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी..राजकीय पक्षांना जमीनींमधला स्वार्थ भावतो. स्वार्थाचा विकास होतो.. 

ही चकचकीत चाकण एमआयडीसी आणि डोंगरांमधले ग्रामस्थ यांच्यात भौगोलिक अंतर 5 किलोमीटर आणि सामाजिक, आर्थिक अंतर हज्जारो किलोमीटरचं आहे.

कंपन्या आल्या. उद्योग उभे राहिले. त्यात रोजगार कुणाला मिळाला? स्थानिकांना अशक्यच. कारण, उद्योगांच्या उपयोगाची कौशल्ये स्थानिक पातळीवर नाहीयत. त्यामुळं रोजंदारीवरचा मजूर यापलिकडं स्थानिकांना काही किंमत नाही. 

मग, उद्योग का उभे राहतात इथं? 

जमीनीसाठी. पाण्यासाठी.

कौशल्य विकास वगैरे कागदावर असतो. अनुदानासाठीचा. बाकी सब झुठ. काँग्रेस असो किंवा भाजप किंवा राष्ट्रवादी..राजकीय पक्षांना जमीनींमधला स्वार्थ भावतो. स्वार्थाचा विकास होतो.. 

भामचंद्र डोंगररांगांमधले ग्रामस्थ १९१९ मधलं जीणं जगताहेत आणि एमआयडीसीत १५ लीटरचं पाणी कमोडच्या एका फ्लशमध्ये वाहून जातं.

karanjvihire

आंबू गावचा सरकारी अॅम्ब्युलन्सवरचा ड्रायव्हर म्हणाला, वीस किलोमाटरच्या प्रवासाला २ तास लागतात. ताशी १० किमी वेग. 

कशामुळं? 

खड्ड्यांमुळं. 

या ड्रायव्हरनं 4 महिन्यांपूर्वीची धक्कादायक आठवण सांगितली. आंबूहून करंजविहिणेला गर्भवतीला अॅम्ब्युलन्समधून आणत होते. खड्डे इतके की रस्त्यातच डिलिव्हरी झाली...नर्सनं जीव वाचवला बाळाचा आणि आईचा...

हीच गोष्ट मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे शहरात घडली असती तर... ?

आजची निवडणूक एवढ्या एका मुद्द्यावर झाली असती. शहरापासून दूर खेड्यात हे रस्त्यावरचं बाळंतपण झालं...कुणाला काही पडलं नाही. कुणाचं काही अडलं नाही.

हा मुद्दा मांडायचा कारण #लोकसभा निवडणुकीचा प्रचार. मोदी वाईट की राहुल पप्पू यापलिकडं मतदार म्हणून आपण जायला हवंय. मजबूत सरकार येईल की नाही माहिती नाही; पण मजबूत लोकशाहीसाठी प्रचाराचे मुद्दे धोरणांकडं नेणारे हवेयत हे नक्की.

इतर ब्लॉग्स