कारणराजकारण : होय...मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी पण...

शरयू काकडे
सोमवार, 22 एप्रिल 2019

"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी परिसरातील हा रहिवासी. सकाळच्या #कारणराजकारण मालिकेदरम्यान आम्ही वडगावशेरी मतदारसंघातील काही भागातील नागरिकांशी संवाद साधला.

"मी उज्वला गॅस योजनेचा लाभार्थी आहे. मला पहिला सिलिंडर मिळाला तेवढंच... त्यांनंतर मला काहीच नाही मिळालं. मी फोन करून थकलो... फेऱ्या मारून थकलो... माझी बायको आता चुलीवरच जेवण बनवते...धुरामुळे तिचे डोळे खराब होतायेत..पण काही पर्याय नाही. " वैतागून एक नागरिक आम्हाला सांगत होता. येरवड्यातील पर्णकुटी परिसरातील हा रहिवासी. सकाळच्या #कारणराजकारण मालिकेदरम्यान आम्ही वडगावशेरी मतदारसंघातील काही भागातील नागरिकांशी संवाद साधला. या लोकांशी बोलून जाणवत होते सरकारने योजना आणल्या पण त्या गरजुंपर्यंत पोहोचल्याच नाहीत. त्यांचे रोजचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. गेल्या 5 वर्षात मोदी सरकारने गरीबांसाठी कित्येक योजना आणल्या... आज त्याचा गवगवा केला जात आहे.. पण सत्य परिस्थिती मात्र वेगळीच आहे... योजनांचे लाभार्थी फक्त कागदावरच आहेत... प्रत्यक्षात मात्र गरजु अजूनही सुविधांपासून वंचितच आहे.

गेल्या 10 वर्षात पुण्याच्या आजूबाजूची उपनगरे झपाट्याने विस्तारली. वडगावशेरी मतदार संघ... देखील असेच उपनगर. विमाननगर, येरवडा, लोहगाव, वडगावशेरी, खराडी ,वाघोली हे भाग कॉस्मोपॉलिटन म्हणून ओळख निर्माण करत आहे. पण प्रत्यक्षात गावकी भावकी जपणाऱ्या संस्कृतीतील पुढाऱ्यांमुळे या भागाचा अपेक्षित विकास झाला नाही. गेल्या काही वर्षात या भागात कित्येक कंपन्या आल्या... उद्योग आले. येथील रहिवाशांना काही प्रमाणात रोजगाही मिळाले. पण सुविधा मात्र अजूनही अपुऱ्या आहेत. येथे एकीकडे मोठमोठ्या कंपन्या, सोसायटी, उच्चभ्रू परिसर तर एकीकडे झोपडपट्टी अशी स्थिती आज या भागाची झाली आहे. येथील पाणी, गटार, स्वच्छता, कचरा, रस्ते या प्रश्नांवर अजूनही ठोस उपाय झालेले नाहीत.

विमाननगर भागातील नागरिकांना सध्या राजकारण्यांची सुरू असलेली चिखलफेक नको वाटतेय. "2014 पूर्वी भाजपने 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले त्याचे काय झाले? आणि आता काँग्रेस दारिद्र्य रेषेखालील लोकांना वार्षिक 72000 रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र त्यासाठी पैसे कोठून आणणार?" असा सवाल येथील मतदारांनी विचारला. मतदारांना आकर्षित करणारे आव्हाने नको तर दिलेली आश्वासन पूर्ण करणारे सरकार हवे आहे. वडगाव शेरी भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. तो प्रश्न सुटावा एवढीच माफक अपेक्षा या मतदासंघातील नागरिकांची आहे पण तो कधी सुटेल याचे उत्तर मात्र मिळत नाही.

आयटी कंपन्यांमुळे काही भागाचा विकास झाला तर काही भागात मात्र मुलभूत सुविधांचा देखील अभाव दिसत आहे. अपुरा पाणी पुरवठा, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, धोकादायक विद्युत तारांचे जाळे, कचरा अशा सर्वच सुविधांचा अभाव खराडीतील थिटे वस्तीत दिसला. येथे स्वच्छतेच्या अभावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यावर कोणीच दखल घेत नाहीये. जलपर्णीमुळे परिसरात वाढलेले डासांचे प्रमाण रोगराईला आयतेच आमंत्रण देत आहे. माणसे कमी आणि डास जास्त अशी परिस्थितीत असूनही उपाययोजना मात्र शून्य."या भागातील विजयी उमेदवार गेल्या 5 वर्षात इकडे फिरकले सुध्दा नाही." अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली.

एकूण काय तर सत्ताधारी मते मिळेपर्यंत खोटी आश्वासन देऊन मतदारांनी दिशाभूल करतायेत... नंतर आश्वासनांची पूर्तता सोडा पण साध्या सुविधा देखील पुरवत नाहीत. काही मतदारांना तर उमेदवारांची नाव देखील माहीत नाहीत, तर काही भागात मतदारांचा कल हा व्यक्तीपेक्षा, त्याच्या कामापेक्षा पक्षाला मानणारा आहे. हे चित्र पाहता येत्या निडणुकीमध्ये युती, आघाडी आणि इतर पक्षांमध्ये चुरशीची लढत होईल हे नक्की. पुन्हा एकदा मतदार मनात कित्येक अपेक्षा घेऊन उमेदवारांना मत देतील पण त्यानंतर हे चित्र बदलेल की नाही हे याची शाश्वती मात्र कोणालाच नाही असे स्पष्ट दिसते.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या