राष्ट्रवादीची 'युद्धनीती' मावळ-शिरूरमध्ये यशस्वी होणार? 

maval_parth_pawar.jpg
maval_parth_pawar.jpg

युद्ध असो वा निवडणूक ती जिंकण्यासाठी तत्कालीन परिस्थिती पाहून रणनीती आखावी लागते. विरोधकांच्या बालेकिल्ल्यावर विजयाची पताका फडकवायची असेल तर, या व्यूहरचनेत वारंवार बदल करावे लागतात. याच निवडणूक व्यूहरचनेचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर या लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आखलेल्या निवडणूक नीतीत येतो. या निवडणूक नीतीची काटेकोर अंमलबजावणी मावळ आणि शिरूर या दोन्ही मतदारसंघात दिसू लागली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसने घड्याळ्याच्या काट्यावर केलेल्या अचूक नियोजनाला यश मिळणार की, राष्ट्रवादीचे हे "दर सेकंदाचे' नियोजन ; 'धनुष्यबाण' अचूकपणे भेदणार हे 29 एप्रिलच्या मतदानानंतर स्पष्ट होईल. 

मावळातील निवडणूक प्रचार आता हातघाईवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्वाचा विजय सुकर व्हावा, यासाठी पक्षाची अख्खी फौज मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाली आहे. पक्षाची सारी पुण्याई आणि नेत्यांची एवढी फौज राष्ट्रवादीच्या इतर कोणत्याही उमेदवाराच्या नशिबी खचितच आली असेल. पार्थ पवार यांचा ज्या अनेक कारणांसाठी हेवा केला जातो, त्यातील पक्षाचा सर्वाधिक पाठिंबा हेही एक कारण आहे. लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच नेते आता आपापल्या मतदारसंघातून मोकळे झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे अशी पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज मावळ जिंकण्यासाठी पिंपरीपासून पनवेलपर्यंत पसरली आहे. थेट भिडण्यापासून गनिमी काव्यापर्यंतच्या युद्धशास्त्राची प्रत्येक कला वापरून हे नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तेवढ्याच ताकदीने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे देखील त्यातच ताकदीने आणि तितक्‍याच नेटाने या विरोधकांचा प्रतिकार करीत आहेत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची रसद बारणे यांना मिळत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा धडाका पाहता शिवसेनेसाठी ही लढाई सोपी उरली नाही. त्यामुळे त्यांना प्रचारात आणखी बळ वाढवावे लागणार हे नक्की.

सुरवातीपासून पार्थ यांची उमेदवारी राज्यात चर्चेत विषय ठरली. त्यांच्या उमेदवारीवरून बराच गदारोळ झाला. घराणेशाहीचा आरोपही करण्यात आला. कौटुंबिक कलहाचे तर्क-वितर्क काढण्यात आले. पण पार्थ यांची उमेदवारी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यूहरचनेतील एक महत्त्वाचा भाग होता, हे आता स्पष्ट झाले आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मावळमध्ये 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव करून शिवसेनेने विजय मिळवला होता. या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीने विजयासाठी भरपूर प्रयत्न केले होते. मावळातील पहिल्या पराभवानंतर गेल्या निवडणुकीत उमेदवारही बदलून पाहिला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात कोठेही कमी पडायचे नाही असेच ठरविले होते. त्यामुळे मावळमध्ये उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता होती. विलास लांडे वगळता अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवडमधील बहुतेक समर्थक हे भाजपात गेल्याने याठिकाणच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह होते. शेकाप महाआघाडीत सहभागी असला तरी त्यांच्याकडेही ताकदीचा उमेदवार नव्हताच. नेतृत्वाची नेमकी ही पोकळी अजित पवार यांनी हेरली. पक्षाला अनुकूल नसलेली मावळची जागा वेगळा प्रयोग केला तर जिंकता येऊ शकेल हे ओळखून अजितदादांनी पार्थ यांना मावळच्या मैदानात उतरवले. त्यातून दोन गोष्टी साध्य करण्यात आल्या. एक तर माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्याने पवार कुटुंबीयांतील तीन उमेदवार आले नाहीत आणि दुसरी म्हणजे पक्षाच्यादृष्टीने सर्वात अवघड जागा लढविण्याचा निर्णय घेऊन अजित पवार यांनी पक्षासाठी आपण कोणताही धोका पत्करण्यास तयार आहोत हे दाखवून दिले. अजितदादांचा मुलगाच उमेदवार असल्याने पक्षाची यंत्रणा कधी नव्हे एवढी मावळात कामाला लागली. शरद पवार यांनीही या मतदारसंघातील प्रचार यंत्रणेवर बारीक लक्ष ठेवले आहे. जर पार्थ उमेदवार नसते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कोणत्याही उमेदवाराला एवढी ताकद पक्षाकडून मिळाली नसती. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांची एकहाती सत्ता राहिली. याकाळात त्यांनी अनेकांना बळ दिले, विविध पदे दिली. सध्या त्या वैयक्तिक संबंधांची जाणीव ठेवावी, अशी साद दादा त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना घालत आहेत. या जुन्या गोतावळ्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशी आशा आहे. शेकापची यंत्रणाही अजितदादांमुळेच सक्रिय झाली आहे. 
शरद पवार हे महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका घेण्यावरून निवडणूक आयोगावर टीका करीत असले तरी, मावळ आणि शिरूरमध्ये त्याचा राष्ट्रवादीला फायदाच झाल्याचे दिसते. शिरूरच्या जागेबाबतही राष्ट्रवादीचा उमेदवार बदल योग्य ठरला असल्याचे प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यावर जाणवते. या वलयांकित नव्या चेहऱ्याभोवती मतदारसंघातील प्रचार फिरवण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. शिवसेनेच्या दोन दिग्गज खासदारांसमोर आता राष्ट्रवादीचे हे नवे चेहरे काय कमाल करणार हे 29 एप्रिललाच स्पष्ट होईल. पण मावळ आणि शिरूरच्या निवडणूक युद्धनितीतून राष्ट्रवादी यापुढील अशाच पद्धतीने 'प्रयोगशील' असेल हे स्पष्ट होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com