Loksabha 2019: 'पार्थ पबमध्ये दिसतो; आदित्यही तेच करतो'!

Loksabha 2019: 'पार्थ पबमध्ये दिसतो; आदित्यही तेच करतो'!

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचा प्रचार ऐन भरात आहे. मात्र, एकमेकांवर टीका करताना अनेकजण पातळी सोडून टीका करत आहेत. राजकारणातील सभ्यता, सुसंस्कृतपणा संपला की काय, असे वाटावे, अशी स्थिती आहे. काही वाचाळवीरांनी तर ताळतंत्रच सोडले आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक, एकमेकांचा आदर असायला हवा. वैयक्तिक भांडणे असल्यासारखी टीका पाहून वैमनस्य वाढते. त्याहून वाईट बाब म्हणजे ज्या लोकांसमोर ही टीका केली जाते, त्यांनाही ते ऐकताना काहीही वाटत नाही किंवा कुणी नेत्यांना सांगू शकत नाही की तुम्ही चुकीची भाषा वापरत आहात.

काही उतावीळ कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून उमेदवाराचे वैयत्तिक जीवन चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात लढत होत आहे. सोशल मीडियावर शिवसेना ऑफिशियल नावाच्या पेजवर राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या खाजगी जीवनातील फोटो अपलोड करून अनेक प्रश्न विचारले आहेत. 

खरंतर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराची पातळी खालावली आहे. सर्वसामान्यांत याबद्दल तीव्र नापसंती आहे. सत्ताधारी, तसेच विरोधी पक्षांकडून जाहीर सभांमधून आगपाखड केली जात आहे, परंतु सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांबाबत कोणीच ‘ब्र’ काढत नाही. भावनिक मुद्द्यांचे राजकारण करताना वैयक्तिक टीकाटिप्पणी करून चारित्र्यहननाचे प्रयत्न केले जात आहेत खरंतर निवडणुका या मुद्यांवर लढवल्या जातात हे राजकीय पक्ष विसरले आहेत. मुद्यांवर काही बोलायला जागा शिल्लक राहिली नाही कि विरोधी उमेदवाराच्या खाजगी जीवनावर हल्ला करायचा हा अलीकडच्या काळातील लोकप्रिय ट्रेंड. 

पार्थ पवार हे आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करत आहेत. ही पिढी आधुनिक शिक्षण घेतलेली आहे. पार्थने लंडनमधल्या पबमध्ये काय करावं हे कुणालाच ठरवाण्याचा अधिकार नाही. त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स असो की नसोत, तो कोणतं कॉकटेल पितो किंवा नाही, यापेक्षा तो निवडून आल्यास काय करणार आहे, या प्रश्नांवर अधिक चर्चा करावयाला हवी. आता, हेच युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्याबाबतीत पाहायचे झाल्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर आदित्य यांचे मुंबईतले नाईट लाईफचे फोटो व्हायरल करण्यास सुरवात केली आहे. असे फोटो सार्वजनिक केल्यामुळे शिवसैनिकांचीही अडचण होऊ लागली आहे. आदित्य यांचेही खासगी आयुष्य असेल. आदित्या यांनीही पार्थप्रमाणे मौजमजा करावी. त्याचे कोणालाच काही देणे घेणे नसावे. आपण, त्यांना प्रश्न विचारावेत ते विकासाच्या मुद्यांवरच !

कोणताही राजकीय पक्ष असे वाईट कृत्य करणार नाही अशी अपेक्षा. कोणत्याही पक्षांचा नेता हा सगळ्यात सुरुवातीला मनुष्य आहे विसरू नका. व्यक्तिगत जीवन कसे जगावे हा प्रत्येकचा खासगी प्रश्न आहे.  त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष अशा गोष्टी करण्यापेक्षा मुद्द्यांवर आणि विकासकामांवर  निवडणुक लढेल अशी अपेक्षा !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com