महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आढावा

मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे अन्यथा गुजरात ने किंवा केंद्राने ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉसमोपॉलिटिन आहे ती कुण्या एका भाषिकांची नाही असे इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी हि  मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे हि बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे, तो वाचला कि मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे ते कळते.

1मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र हे राज्य भाषावार प्रांतरचनेच्या तत्वानुसार निर्माण झाले आहे, त्यामध्ये सर्व मराठी भाषिक प्रदेशाचा अंतर्भाव करणेत आला आहे. भाषावार प्रांतरचना कशासाठी करावी यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे मंथन झाले आहे .त्यापैकी समान भाषासूत्र, समतावादी संस्कृती, समान आर्थिक दर्जा, क्रमवार जोडलेले भूविभाग भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे मानले गेले आहेत. एक भाषासूत्र हे एकात्मता व लोकशाही मूल्याला बळकटी देणारे आहे त्यानुसार राष्ट्राचा विकास घडवून आणणे योग्य ठरते.

भाषावर प्रांतरचनेच्या मागणीच्या विचारासाठी जे कमिशन नेमले गेले त्यांच्याद्वारे 'केंद्रशासित मुंबई, द्विभाषिक राज्य, त्रैभाषिक राज्य असे तोडगे या कमिशन द्वारे सुचविले जावू लागले, 1955 पासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे रूपांतर जनआंदोलनात झाले, यांत कोणतीही संघटित शक्ती नव्हती तर मराठी जनतेच्या प्रक्षुब्ध भावनांचा उत्स्फूर्त असा आविष्कार होता, महाराष्ट्रातील कॉंग्रेसच्या नेत्यांनी या चळवळीतून आपले अंग काढून घेतले पण शेतकरी कामगार पक्ष, प्रजासमाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेडुल्ड्य कास्ट्स फेडरेशन, लाल निशाण गट, हिंदू महासभा, जनसंघ इत्यादींचा समावेश होता. एस. एम. जोशी, भाई एस. ए. डांगे, आचार्य अत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, ना.ग .गोरे, जयंतराव टिळक, उद्धवराव पाटील, भाई दाजीबा देसाई, दादासाहेब गायकवाड इत्यादी समर्थ व झुंजार नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाची धुरा नेटाने वाहिली.

राष्ट्रीय कॉंग्रेस ने 1920मध्ये 'नागपूर' येथील अधिवेशनात या मागणीला प्रथम मान्यता दिली, इ.स. 1938 च्या मराठी साहित्य संमेलनात 'मराठी भाषिकांचे वेगळे महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे 'अशा आशयाचा ठराव वि.दा.सावरकरांनी मंजूर करून घेतला, त्यानंतर 1946 साली बेळगावच्या साहित्य संमेलनात गं.त्र्यं.माडखोलकरांनी याच मागणीचा ठराव मांडून तो मंजूर करून घेतला. ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु प्रांताची स्वतंत्र रचना करताना निश्चित कोणत्याही मूलभूत तत्वांचा आधार घेतला नव्हता त्यामुळे ब्रिटिश काळातील प्रांतरचनेत कसलीही तात्विक आणि मार्मिक भूमिका ठरवलेली नव्हती त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची एकसूत्रता निर्माण झाली नाही त्यातूनच कोणत्यातरी विशिष्ट तत्वाचा, घटकांचा आधार घेत देशातील प्रांतांची पुनर्रचना करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी पुढे आली.

भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. तसेच प्रत्येक भाषिक समुहाचे, जनतेचे वास्तव्य विशिष्ट आणि भौगोलिकदृष्ट्या एका सलग प्रदेशात आहे. त्यामुळे भाषा हा घटक प्रमाणभूत मानला जावून प्रांतिक पुनर्रचनेत भाषेचा आधार घेण्याचा विषय पुढे आला. भाषेच्या आधारावर प्रांताची स्वतंत्र निर्मिती करावी व प्रत्येक भाषेचे वेगळे राज्य स्थापन करावे असा विचार काही विचारवंतानी व्यक्त केला. लवकरच अशा अर्थाची मागणी निरनिराळ्या प्रदेशातील लोकांच्याकडून करण्यात येवू लागली, अशा प्रकारच्या मागणीलाच भाषावार प्रांतरचनेची मागणी असे म्हंटले गेले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देवून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाई यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाउंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 105 जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी 105जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. या लढ्यात तेव्हढ्याच ताकदीने मैदानात उतरले ते महाराष्ट्रातील रणमर्द मराठी शाहीर, शाहीर आण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर गवाणकर, शाहीर नामदेव कापडे, शाहीर शरद मुठे, कविवर्य वसंत बापट, कवी सुरेश भट , डॉ.सुधीर फडके आदींच्या लेखणीने क्रांतीला बळकट धार प्राप्त झाली. मराठी शाहिरांनी मराठी माणसाचा, मराठी भाषिकांचा द्वेष करणाऱ्या आणि स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीस विरोध करणाऱ्यांचे वाभाडे लेखणीद्वारे काढले, या मराठी शाहिरांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, महाराष्ट्रात लोकचळवळीचा वणवा पेटविला. शाहिरांनी रचलेली गाणी, पोवाडे, लावण्या महाराष्ट्रातील घराघरातून जाहीर कार्यक्रमाद्वारे प्रसारित झाल्या. महाराष्ट्रावर अन्याय होत आहे याची जाणिव प्रत्येक मराठी माणसाला होत गेली, अशाप्रकारे मुंबई सह महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचे मराठी माणसाचे स्वप्न अखेरीस साकार झाले.

महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली देसाईंना हटवून मुख्यमंत्रीपदाची धुरा यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन विसाव्या शतकाच्या सुरवातीला भाषावार प्रांतरचनेची आपण मागणी केली त्यासाठी लढा दिला, हौतात्म्य पत्करले आणि एकविसाव्या शतकात आपणवर मराठी भाषा बुडू लागली आहे, नष्ट होऊ लागली आहे अशी हाकाटी करण्याची वेळ आली, मराठी भाषा टिकविण्यासाठी लढा देण्याची वेळ आली हा दैवदुर्विलास आहे, मराठीत एक म्हण आहे' आपली ज्वारी दुसऱ्याला दळायला द्यायची आणि पाटलाची ज्वारी गाणे म्हणत दळायची' हया प्रवृत्ती पायी हे घडले आहे, स्वतः च्या मातृभाषेला कमी लेखून परकीय भाषेला जगातील सगळ्यात श्रेष्ठ भाषा  समजून जवळ करण्याच्या मानसिकतेतून हे घडले आहे. 

मातृभूमी आणि मातृभाषा स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत हे कदापिही नाही विसरले पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेमागिल इतिहासाबद्दल प्रत्येक मराठी माणसाच्या मनांत जाज्वल्य अभिमान असला पाहिजे तरच मराठी भाषेला गतवैभव प्राप्त होईल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com