वाटणीने केले शेतीचे वाटोळे !

Farmer
Farmer

शेती हा दिवसेंदिवस अवघड होत चाललेला धंदा बनला आहे. वरवर पाहता दिसायला सोपा पण प्रत्यक्ष करायला उतरल्यावर अत्यंत कठीण असा हा व्यवसाय झाला आहे. कोरडवाहू-जिरड शेती म्हणजे निसर्गाच्या नावाने खेळायचा जुगारच झाला आहे. कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने कोरडवाहू शेतीचे तीन तेरा होतात आणि सावकाराचा कर्जाचा डोंगर उभा रहातो. बागायती शेतीची तऱ्हा त्याहून वेगळी. लहरी निसर्गाने शेतीचे नुकसान केले. शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळवून न देणाऱ्या राज्यकर्त्यांनी नुकसान केले. शेतकऱ्यापेक्षा उद्योजक-व्यापाऱ्यांचे हित पाहणाऱ्या सत्ताधीशांनी तर शेतकऱ्यांची धुळधाण उडवली. सहावा-सातवा वेतन आयोग घेऊन शेतीवर शहरामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणाऱ्या बड्या बाबूंनी शेतकऱ्यांना बुडविले .या बरोबरच विभक्त कुटुंबपद्धतीने आणि वाटणीने शेतीचे आणि शेतकऱ्याचे वाटोळे केले आहे असे मला वाटते. 

पाश्‍चिमात्य जीवनशैलीची ओढ लागलेल्या मराठी माणसाने संयुक्त कुटुंब पद्धतीने हळूहळू सोडून देऊन त्रिकोणी ( पती, पत्नी, मुले) अशी पद्धती स्वीकारली. भाकरीसाठी कुटुंब सुटले. भाकरीसाठी गाव सुटले. भाकरीसाठी विभक्त कुटुंबाची शहरात वणवण सुरू झाली. सगळ्यांचे शेतीवर भागू शकत नव्हते आणि भागत नाही. पण शहरी जीवनाची ओढ म्हणूनही अनेक जण शहरात गेले. मात्र जे गावात राहिले तेही एकविचाराने, एकजुटीने नाही राहिले. संयुक्त कुटुंबपद्धती लयाला गेल्याचा खरा फटका बसलाय तो शेतीला आणि शेतकऱ्याला. 
पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत संयुक्त कुटुंबपद्धतीत कुटुंबाकडे पाच-पन्नास एकर शेती असे. शेतात चार-दोन विहिरी असत. पाण्याचा अंदाज बघून 4-5 एकर ऊस, 2-3 एकर केळी अशी पिके घेतली जात. शिवाय तूर, कापूस, उडीद, मूग, गहू, जवस, ज्वारी अशी पिके कधी स्वतंत्र डौलाने उभी असत. कपाशीत तुरीचे पट्टे असत. बरड अन् पाणी कमी असलेल्या जमिनीत जवस- करडई निघे. 

कपाशीला भाव कमी आला तर तुरीची तेजी भरपाई करून जात असे. घरच्या ज्वारीने वाड्यातील धान्याची कणगी भरून जाई; वरती गाई-गुरांसाठी 10-15 हजार कडब्याच्या पेंढ्याची गंजी लागत असे. उसाच्या, केळीच्या पैशांवर संयुक्त कुटुंबात दोन-चार वर्षांतून एक शुभमंगलही पार पडत असे. शहरामध्ये नोकरीसाठी, व्यवसायासाठी जाणाऱ्याला भरल्या घरातून आर्थिक मदत दिली जात असे. चार भावात एखादा भोळा भाऊ, उनाड पुतण्या सांभाळला जाई. वडीलधारी माणसे, पाव्हणे-रावळे आणि लेकराबाळांनी वाडे गजबजले असत. सुखाचे स्वागत आणि संकटाचा सामना एकजुटीने होत असे. शेतीचे धोरण एकविचाराने ठरत असे. 

संयुक्त कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली. लेकरा-बाळांनी भरलेले वाडे ओस पडले. घरासमोरच्या पटांगणात भिंती पडल्या. ओसरी आणि माड्याही दुभंगल्या. स्वयंपाकघरापासून ते देवघरापर्यंत पडलेल्या भिंतींनी घरे दुभंगली. मने दुभंगली. एकमेकांच्या सुखादुःखाला कोणी धावून जाईना. सल्लामसलत होईना. वाड्याच्या गच्चीवर डिश टीव्हींच्या छत्र्यांचे पीक आले आणि तुकड्या-तुकड्यांत वाटल्या गेलेल्या शेतातील पिकांनी मात्र माना टाकल्या. भव्यदिव्य वाड्यांना पाहता-पाहता झोपडपट्टीचे बकाल स्वरूप आले. कधी परिस्थितीने, तर कधी राग-लोभाने जमिनीचे तुकडे पडू लागले. हे वाटण्या होण्याचे लोण पिढ्यान् पिढ्या कुटुंबाच्या आणि संयुक्त शेतीच्या चिरफाळ्या करीत गेले. वाटणीच्या चक्रात 50 एकराचे पाच एकर केव्हा झाले हे कळले नाही. 
आता तर वाटण्या सुरू आहेत गुंठ्यात! पूर्वी 50 एकरात 1-2 विहिरी असत नंतर दोन-तीन एकरात विहिरी दिसू लागल्या. पुढच्या पिढीत विहीर एक पण तीन भावाच्या तीन मोटरपंप बसू लागले. विहिरीत एव्हढं पाणी कुठून येणार! पण वीजमंडळाने लोडशेंडिंगची कृपा केली. मग वार लावून पाणीवाटप सुरू झाले. पुढच्या पिढीने आणलेल्या बोअरिंग मशिनने रानाची चाळणी केली. महिनाभरापूर्वी खळाळून वाहणारे बोअरवेल लहान भावाने 20 फुटांवर दुसरा बोअर घेताच गुळण्या टाकू लागले. (कोरडे पडू लागले.) कधीकाळी खळाळणाऱ्या विहिरी आणि बोअर पाहता-पाहता कोरडे झाले. एक-दोन एकर शेतीसाठी बैलजोडी ठेवणे परवडेना. बैलजोडी विकून ट्रॅक्‍टर मशागतीला आले पण शेतीचे शेणखत गेले. एक-दोन एकरासाठी सालदार, महिनादार ठेवणे परवडेनासे झाले. 
संयुक्त कुटुंबाचा ट्रॅक्‍टर घराबरोबर बाहेरचा धंदा आणीत असे. चार पैसे नफा बाजूला पडे. आता स्पर्धेतून एका वाट्याला चार दरवाजे झाले. स्पर्धेतून चार दरवाजांसमोर चार ट्रॅक्‍टर झाले. चारीही ट्रॅक्‍टर कर्जबाजारी झाले. काही ट्रॅक्‍टरचे कर्ज जमिनीवरही स्वार झाले. पाहता पाहता एक-दोन एकरांचे एकाकी पडलेले मालक रस्त्यावर आले! 

आता तुम्ही म्हणाल, संयुक्त कुटुंब पद्धतीने एकत्रित शेती करणारे फार सुखात आहेत का? एकत्रित शेती करणाऱ्यांचेही हाल झाले, पण त्यांनी एकत्र बसून विचार केला. शेतीच्या उत्पन्नाच्या जोरावर काहीजणांना शहरात नोकरी उद्योग-व्यवसायाला पाठवून दिले. हवामानातील बदलांनुसार आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार पिके बदलली, त्रास झाला, नुकसान झाले, पण एक-दोन एकर शेतीपेक्षा तिघाचौघांनी मिळून केलेली पाच-पंचवीस एकर शेती अधिक फायद्याची ठरली आणि ठरते आहे. निदान एकविचाराने एकत्र बसून एकजुटीने केलेली शेती विकण्याची वेळ तरी आली नाही. 
मला तरी वाटते की विभक्त कुटुंबपद्धतीने आणि वाटणीने शेतीचे आणि शेतकऱ्याचे नुकसानच झाले. तुम्हाला काय वाटते? 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com