लढा दुष्काळाशी: ...तर महाराष्ट्राचा वाळवंट होईल (ब्लॉग भाग-1)

सचिन बडे
रविवार, 5 मे 2019

- महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही
- नवीन आहे ती दुष्काळाची वाढत असलेली धग
- जगाशी स्पर्धा करण्याच्या नादात निसर्गसंपदेचे अतोनात नुकसान

महाराष्ट्राला दुष्काळ तसा नवा नाही. दर तीन-चार वर्षांनी महाराष्ट्र मोठ्या दुष्काळाला सामोरे जातोय. नवीन आहे ती दुष्काळाची वाढत असलेली धग आणि कमी होत चाललेला दोन दुष्काळातील काळ. उदारीकरणानंतर जगाशी स्पर्धा करण्यासाठी सुरु झालेल्या अनियंत्रीत विकासाने निसर्गसंपदेचे अतोनात नुकसान केले. हरित क्रांतीने शेतकऱ्याच्या दारात हायब्रीड बियाणं आणि रासायनिक खतांचा ढिग घातला. यातून जमिनीची प्रचंड हानी झाली.

विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्यापासून जगात सुरु झालेल्या विकास युद्धामुळे जल, वायु अन् जमीन याची अतोनात हानी झाली. त्याचे परिणाम आता जाणवायला सुरवात झाली आहे. निसर्गाचे चक्र झपाट्याने बदलत आहे. त्यामुळेच हिमवृष्टीने कैलास हदरतोय, पुरात गंगेचा प्रदेश वाहतोय, ब्रम्हपुत्रेचं पात्र बदलतयं, दख्खनेतील नद्या आटताहेत, वादळांनी समुद्रकिनारा झपला जात आहे. दुष्काळाची वारंवारिता वाढत असून सहा-सात वर्षांनी पडणारा दुष्काळ तीन-चार वर्षावर आलाय, पुढच्या काहीच वर्षात तो दोन वर्षावर येण्याची भिती आहे. गेल्या दहा वर्षात दुष्काळ पडण्याचे प्रमाण वाढलं आहे.

जागतिक पर्यावरण झपाट्याने बदलत आहे. हिमनग मोठ्या प्रमाणात वितळत आहेत. पृथ्वीच्या तापमाणात देखील वाढ होत असतना आपण पँरिस कराराला धाब्यावर मारलेलं आहे. याचे परिणाम जगासह भारतात देखील जाणवत आहेत. काही वर्षापुर्वी पर्यावरण आणि शेती यावर काम करणाऱ्या राजस्थानमधील एका संस्थेने मराठवाड्याच्या जमिनीचा आणि बदलत्या पर्यावरणाचा अभ्यास करुन एक रिपोर्ट सादर केला आहे. त्यामध्ये 2050 पर्यंत मराठवाड्यातील अर्धी जमीन नापीक झालेली असेल आणि पावसाचे प्रमाण सरासरीच्या निम्याहून कमी असेल असे सांगितलेले आहे.

गेल्या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा खुप कमी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात तर अगदीच थोड्या प्रमाणात पाऊस पडला. या भागात खरीप हंगामातील पेरण्या झाल्या मात्र, पावसाअभावी पिकं जळून गेली, त्यामुळे परतीच्या पावसावर अवलंबून असणारा रब्बी हंगाम पुर्णपणे कोरडाच गेला. ऑक्टोबर महिन्यापासूनच पाणी टंचाई सुरु झाली. यावर्षीचा जानेवारी सूरू होईपर्यंत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. जनावरांचे बाजार तुडुंब भरु लागले. मात्र त्यांना विकत घेणारा कोणी मिळेना. जनावरे जगविण्यासाठी सरकारला ठिकठिकाणी चारा छावण्या उभाराव्या लागल्या. त्यामूळं शेतकऱ्याची जनावरं जगू शकली. जंगली प्राणी पाण्याच्या शोधात गावात येत आहेत. या प्राण्यांच्या मृत्यूचा आकडा हा नक्कीच मोठा असेल.

राज्यभरात सरकारने 1200 चारा छावण्या सुरु केल्या आहेत. यातील सर्वाधिक मराठवाड्यात आहेत. या छावण्यामध्ये लाखो जनावरे आहेत. गावाला पर्यायी गावं या छावण्यामुळं तयार झालीत. यावर्षीचा मान्सून चालू होईपर्यंत या गावांचा मुक्काम छावणीवरच. हजारो टँकरच्या मदतीने अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र आपली तहान भागवत आहे. हे असं किती दिवस. यातून कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त सरकारवर अवलंबून काही होणार नाही. निसर्गाचा होणारा ऱ्हास रोखला पाहिजे, बदल्या ऋतू चक्रानुसार शेतीत बदल करावे लागतील. या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे खुप थोडा वेळ शिल्लक आहे. आता योग्य पाऊल उचललं नाहीतर, येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा वाळवंट झालेला असेल.

इतर ब्लॉग्स