लढा दुष्काळाशी: निसर्गाच्या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच (ब्लॉग: भाग- 2)

सचिन बडे
सोमवार, 6 मे 2019

- दुसऱ्यावर अवलंबून असणं कायम अस्थिरता निर्माण करणारं असतं.
- अस्थिरता कोणालाच स्थैर्य देत नसते.
- निससर्गाच्या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यालाच
- शेतकऱ्याचं अवलंबीत्व निसर्गचक्रावर जास्त अवलंबून
- या अस्थिरतेपोटी गावं ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.

दुसऱ्यावर अवलंबून असणं कायम अस्थिरता निर्माण करणारं असतं. अस्थिरता कोणालाच स्थैर्य देत नसते. या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसतो. आपण सर्व निसर्गावर अवलंबून असतो. या शेतकऱ्याचं अवलंबीत्व जास्त असतं. त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपाचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यावर होत असतो. हे यावर्षीच्या दुष्काळावरुन जाणवतं. पहाटेपासून रात्रीपर्यंत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाच्या प्रकोपाने अस्थिर केलयं. या अस्थिरतेपोटी गावं ओस पडण्याच्या मार्गावर आहेत.

दुष्काळ पडला की त्याचा फटका फक्त शेतकरी, जनावरे, शेती यानांच बसत नाही तर, सबंध गावगाड्यावर याचा परिणाम होत असतो. गावावर अवलंबून असलेल्यानांही त्याचा फटका बसतोच. गावातल्या लोकांचं स्थलांतर वाढतं. शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण थांबतं, लग्न सोहळे कमी होतात. सणावाराच्या खर्चावर कात्री येते. शेतकरी चार- पाच वर्षासाठी कोलमोडतो. त्याची नाजुक असलेल्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडतो. याचा फटका गावतल्या बलुतेदारीवर होतो. शेतीवर अवलंबून असणाऱ्या आलूत्या-बलूत्यांची आर्थिक गणिताची बेरीज वजा होत जाते.

टकलं पडलेली डोंगर, उघडी पडलेली जमीन, ओसाड गाव, भेगाळलेले तलाव, सुरुकुत्या पडलेली चेहरे, लिंबाच्या फाटक्या सावलीत बसलेली म्हातारी कोतारी माणसं, हे दृष्य सध्या दुष्काळानं होरपळून निघालेल्या प्रत्येक गाव-वाड्याची आहेत. गावांच स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिकणारी पोरं नोकरी-धंद्यासाठी शहराची वाट धरत आहेत. शहरात शिकणाऱ्या पोरांना घरातून मिळाणाऱ्या पैशाला कात्री लागलेली आहे. वयात आलेल्या पोरीची सोयरीक दुष्काळापायी शेतकरी बाप पुढं ढकलतोय. अशी अनेक उदाहरणं सध्या सर्रासपणे दिसायला लागलीत.

सध्या गावात साठी ओलांडलेल्या म्हाताऱ्यांच्या चर्चेचा विषय दुष्काळ हा आहेच. यावर्षीच्या दुष्काळाची तुलना 1972 दुष्काळाशी होते. त्यावेळच्या परिस्थितीची आणि यावर्षीच्या परिस्थितीची तुलना करताना आजोबा इतिहास सांगतात, 72 साली अन्नाचा दुष्काळ होता, विहिरींना पाणी होतं. जनावरांना डोंगरात वाळलेला का व्हयना पण चारा होता. झाडांचा पाला खाऊन नदीच्या पाण्यावर गुरं जगायची. इंदिराबाईनी (तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी) दुष्काळात लोकं जगविण्यासाठी अन्नधान्याची सोय केली. लोकांना फुकट दिलं तर त्यांना फुकट खायची सवय लागलं म्हणून लोकांना रस्त्याची खडी फोडण्याचं काम देऊन हाताला काम आणि पोटाला सुकडी दिली. आता तुमी ज्या रस्त्यांनी जातायना तो रस्ता आम्ही दुष्काळात केलायं. तव्हाच्या दुष्काळाची आणि आताच्या दुष्काळाची स्थिती लई येगळीये. आता सगळ्याच गोष्टीचा दुष्काळये, उदास चेहरा करत आजोबा सांगत ह्या गोष्टी सांगत होते.

तुला सांगतो म्हणून एक आजोबा म्हणाले, 2003 ला पण, असाच दुष्काळ पडला. तव्हा गावातले झाडं वाळून गेली. शेत उघडली पडली. गावातल्या सगळ्या आमरया नाहीशा झाल्या. त्यावर्षीच्या दुष्काळानंतर आमरया फक्त लोकांचा आठवणीतच राहिल्या. आंब्याच्या आढ्यांनी (रास) घरं भरायची. चार-चार महिने आंब्यांनी घरं भरलेली असायची. आता खायला मिळानात. अशा सगळ्या जुन्या आठवणी ते जाग्या करत सांगत होते. अनेक दुष्काळ पाहिलेल्या, त्यातून सावरलेल्या म्हाताऱ्यांच्या सुरुकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर यंदाच्या भीषण दुष्काळाची वेगळीच धग जाणवत होती.

इतर ब्लॉग्स