शत्रूला रणांगणावर भाजून काढणारा... 

aapachi
aapachi

कारगिल युद्धादरम्यान हिमालयाच्या कुशीत रशियन बनावटीच्या हेलिकॉप्टरांना उडण्यासाठी मर्यादा आल्या. त्यानंतर आता दोन दशकांचा प्रवास झाला असताना सीमा तेवढ्याच असल्या तरी त्यावरील धोके आणि रणनीती बदलली. केवळ हल्ला करण्याची आणि शत्रूला भाजून काढण्याच्याच मुख्य भूमिकेतील अपाचे 64 इ हेलिकॉप्टर ताफ्यात सामील होणे हे भारतीय वायुसेनेच्या लढाऊ क्षमतांमध्ये निश्‍तिच वाढ करणारे ठरणार आहे. 

एमआय 17 आणि एमआय 35 हे रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर सध्या भारतीय वायुदलात मुख्यत्वाने काम करतात. त्यांच्या माध्यमातून लष्करी तुकड्यांची हलवाहलव आणि प्रसंग पडल्यास हल्ल्याला प्रत्युत्तर देत सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या क्षमतांमुळे भारतीय वायुदल गेली अनेक दशके त्यांच्यावर अवलंबून राहिले आहे. देशांतर्गत आणि परदेशी भूमीवर त्यांनीही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. मात्र आता काळाच्या ओघात होणारे सामरिक बदल आणि बदलते युद्धतंत्र लक्षात घेऊन या हेलिकॉप्टरांना "अपाचे 64 इ' चा पर्याय भारताने स्वीकारला. अमेरिकेच्या बोईंगने तयार केलेले हे आकाशात घोंगावणारे शस्त्र अफगाणिस्तान आणि इराक या युद्धांमध्ये चांगलेच तावून सुलाखून निघालेले आहे. 

उच्च तापमानात दणदणीत कामगिरी करून आपले भय शत्रूच्या मनात बसवणाऱ्या "अपाचे 64 इ' चा वापर राजस्थान आणि उच्च तापमान असलेल्या भागात मोठ्या क्षमतेने केला जाऊ शकतो. लष्कराची हालचाल न करता केवळ दोन पायलट "अपाचे 64 इ'च्या क्षमतांमुळे शत्रूच्या रणगाड्यांच्या फळीला रणांगणावर भाजून काढण्याची क्षमता ठेवतात, हे महत्त्वाचे आहे. गेल्या वीस वर्षांची तुलना केली तर भारतीय सैन्याच्या ताब्यातील लढाऊ विमानांची संख्या कमी होत गेली तर हेलिकॉप्टरांची संख्या सातत्याने वाढती राहिली आहे. नौदल, वायुदल आणि हवाईदलाकडे वर्ष 1998 पासून असलेल्या एकूण हवाई क्षमतेमध्ये 23 टक्के हेलिकॉप्टर होते. ही संख्या वर्ष 2019 मध्ये 36 टक्‍क्‍यांवर गेली आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलासाठी हेलिकॉप्टरचे महत्त्व वाढत आहे, हेच दिसते. मात्र त्यात "फायर पॉवर' असलेल्या हेलिकॉप्टरांची संख्या नगण्य होती. केवळ हल्ला करून शत्रूला बेचिराख करण्याचा एकमेव धर्म असलेले हेलिकॉप्टर पहिल्यांदाच भारतीय सैन्यदलाच्या भात्यात आले आहे. 

मान हलवा.. बंदूक हलवा... 
"अपाचे 64 इ'मध्ये असलेल्या अनेक महत्त्वाच्या गुणांपैकी एक असलेली 30 मिलिमीटर चेन गन ही पायलटच्या ताब्यात राहणाऱ्या प्रभावी शस्त्रापैकी एक आहे. पायलटच्या हेल्मेटशी थेट कनेक्‍ट असलेल्या या बंदुकीला चालवण्यासाठी पायलटला वेगळे काम करण्याची गरज नाही. पायलटच्या हेल्मेटला जोडलेली असलेही ही बंदूक पायलटचे डोके ज्या दिशेला फिरेल त्या दिशेला ती वळते. नेम धरण्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नसल्याने याची मारकक्षमता वाढते, हे सिद्ध झाले आहे. 

दोघेच लावतील रणांगणाचा निकाल 
अपाचे हेलिकॉप्टर हे केवळ दोन पायलटच्या साथीने उडणारे हेलिकॉप्टर असून ते एका वेळेला साधारण साडेचारशे किलोमीटरचा पल्ला अगदी शत्रूच्या नजरेत न येता गाठू शकते. रणगाड्यांच्या ताफ्याला बेचिराख करण्यासाठीच्या पुरेशा अँटी टॅंक मिसाईल अपाचे घेऊन उडू शकतो आणि अचूक हल्ल्यातून त्यांचा समाचारही घेऊ शकतो. स्लिम डिझाईन असल्याने अडचणींच्या ठिकाणीही हे हेलिकॉप्टर वेगाने हालचाल करते. पूर्वांचलातील हिमालय पर्वत रांगांचा या हेलिकॉप्टरच्या क्षमता ठरवण्यासाठी खास अभ्यास करण्यात आला होता. त्यामुळे डोंगराळ भागात रणांगणाचा निकाल लावण्यात "अपाचे 64 इ' महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणार, हे नक्की. 

अचूक माहिती देणारी रडार यंत्रणा 
"अपाचे 64 इ'च्या डोक्‍यावर असलेले रडार हे त्याच्या सर्वांत प्रभावी शस्त्रांपैकी एक आहे. आपल्या ठराविक परिघात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अचूक मोजमाप हे रडार करू शकते आणि त्या गोष्टीचा आकार किती आहे, हेदेखील सांगते. त्यानंतर या टिपलेल्या गोष्टींचे वर्गीकरण करून ते पायलटसमोर ठेवले जाते, ज्यातून शत्रू आणि त्याचे ऍसेट ओळखून ते भेदतात येणे शक्‍य होते. दिवसा आणि रात्रीच्या वेळेत शत्रूचा अचूक अंदाज घेण्यासाठी या हेलिकॉप्टरच्या नाकावर असलेली यंत्रणा या हेलिकॉप्टरची क्षमता वाढवते. 

अंतिमतः रशियावरील आपली निर्भरता भविष्यात कमी होऊ शकते याचा स्पष्ट संदेश या 22 हेलिकॉप्टरांच्या खरेदीतून दिला जाऊ शकतो. पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेल्या संबंधांमध्ये यामुळे कटुता निर्माण होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. चीनसारख्या बलाढ्य शत्रूवर वचक ठेवण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टरचे असणे महत्त्वाचे असेल. भारतीय वायुदलाच्या ताब्यात असलेले अपाचे कालांतराने लष्कराच्या एव्हिएशन विभागालाही बळ देणार आहे. एकंदरीत पाहता, या हेलिकॉप्टरचे येणे भारताच्या लढाऊ क्षमता अधिक बळकट करण्याचे काम करणार आहे, हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com