मधमाश्यांना जीवदान देणारा अवलिया!

सिद्धी जाधव
शुक्रवार, 17 मे 2019

या अवलियाला आणि त्याच्या मधमाश्यांना संवर्धनाच्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून अशा लाखो/ करोडो मधमाश्यांचा संवर्धन/ प्राण वाचावे व असे अमित गोडसे प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येत तयार व्हावेत. अमित गोडसे त्याचे कार्य आणि वेबसाईट लिंक खालील प्रमाणे. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि मधमाश्यांचं संवर्धन करा. 

आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा धूर केला आणि त्यांना हाकलवून लावलं. दोन दिवसांनी अचानक पुन्हा त्यांचा वावर सुरु झाला. आम्ही दोघेही पुन्हा बेचैन झालो. या वेळेस मात्र त्या हॉलच्या खिडकीतून स्टुडिओच्या दिशेनं जात होत्या. आम्हाला काही कळेना.. विक्रांतने पुन्हा धूर केला आणि त्यांच्या मागे लागला. आम्हाला थोडी गडबड वाटली म्हणून तो स्टुडिओच्या दिशेनं गेला आणि त्याची जोरात हाक आली.. सिद्धी लवकर ये! हे बघ काय. पाहतोय तर मधमाश्यांची लाख दीडलाखांची फौज 2 फुटांचा पोळं बांधण्याचं काम शांतपणे करत होत्या. आम्ही दोघेही उडालो. धस्स झालं, आत्ता काय? घाबरून / वैतागून आत्ता ह्यांची विल्हेवाट लावायची या हेतूने पेस्टकंट्रोल वाल्यांना फोन केला, त्यांनी 2000 रुपये सांगितले आम्ही तयार झालो आणि दुसऱ्यादिवशी सकाळी येतो असे सांगून फोने ठेवून दिला.

हे सगळं करत असताना विक्रांत पटकन म्हणाला त्यांना आपण कसे वाचवू शकतो म्हणजे कोणी संवर्धन करणार असेल का? माझा माश्यांवर रिसर्च चालूच होता त्यात त्यांच्याबद्दल फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टी लिहिल्या होत्या. जगाच्या पाठीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस जेमतेम 4 वर्षेच जगू शकेल असे आल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे. हे सगळं वाचून आम्ही खाडकन जागे झालो आणि चार दिवसांपूर्वी आमच्यासोबत झालेला पुण्यातील किस्सा आठवला. आम्ही आमचा मित्र अभिनव काफरेकडे गेलो असता त्यांच्या सोसायटीमध्ये असंच कोणीतरी पेस्ट कंट्रोल करून लाख एक माश्या मारून टाकल्या होत्या. इथे भरदिवसा माणसं मारली जातायत माशांचं काय? लाखो जीव तडफडत मरत होते आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यामुळे लाखो मेलेल्या माश्यांचा खच पडलेला पाहून अतिशय वाईट वाटले, बहुतेक तो प्रसंग आठवून विक्रांतला त्यांचं संवर्धन करण्याचं डोक्यात आलं असणार. माझा रिसर्च सुरु असताना मला एका बी किपर अमित गोडसे, आयटी क्षेत्रातील (कॅपजेमिनी) नोकरी सोडून पूर्णवेळ या कामासाठी वाहून घेणारा.. मधमाश्या संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून दिलेला हा तरुण समोर आला. मध काढण्याची, मधमाश्यांना पळवून लावण्यापेक्षा कमी संहारक आणि अधिक शाश्वत पद्धत असू शकते अशी त्याची खात्री होती. त्याच अनुषंगाने त्याने पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र तसेच खादी ग्रामोद्योगतर्फे महाबळेश्वर येथे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात रीतसर प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुण्यात मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. 

त्याला फोने केला अतिशय नम्र आणि शांतपणे त्याने आवश्यक माहिती जाणून घेतली. यावर त्याने 4000/- रुपये घेईन असे सांगितले. जीव वाचवण्याचे 4000/- आणि जीव घेण्याचे 2000 /- आताच्या जगात जीव वाचवण्यापेक्षा जीव घेणं किती स्वस्त झालंय. तसं कामसुद्धा जोखमीचं होतं. त्यात तो पुण्याहून मुंबईला येणार होता. शेवटी त्यानेच पैसे कमी केले 3000 /- मध्ये उद्या 12 वाजेपर्यंत येतो म्हणाला. त्याला पैशांपेक्षा माशांचा जीव महत्वाचा वाटला असणार, नक्कीच! 

Amit Godase

आम्ही कलाकार हळव्या मनाचे, पैसे गेलेतरी चालतील पण आपण त्यांना वाचवायचं असा आम्हीही निर्णय घेतलेला आणि लगोलग अमितला येण्यास सांगितले. आज तो बरोबर सांगितल्या प्रमाणे 12 वाजता स्टुडिओवर आला. आल्याबरोबर आमची थोडी चर्चा झाली. काही मिनिटांतच आम्ही चांगले मित्र बनलो. शेवटी एक विचारी माणसं काही ना काही कारणाने आपल्याला भेटतातच. त्याच्या विलक्षण कामाबद्दल जाणून घ्यायला आम्ही दोघेही उत्सुक होतो. 

अंगावर कोणत्याही प्रकारचं आवरण न घालता फक्त चेहऱ्यावर मास्क टोपी घालून तो बाल्कनीत उतरला. पहिल्यांदा त्याने केवळ धुराच्या साहाय्याने त्यांना दूर करून हलक्या हाताने माशांना गोंजारत तो थेट पोळ्यापर्यंत पोहचला. नुकतेच बनत असलेले पोळ त्याने करवतीने कापलं. नंतर त्या जागेवर त्याने जेल लावून ती जागा काही महिन्यांसाठी सुरक्षित केली. आत्ता तिथे पुन्हा माश्या येणार नाहीत आणि 10 किलोमीटर बाहेर त्या आपली नवीन जागा शोधतील आणि तिथं पोळ बांधायला सुरुवात करतील. हे सगळं तो एवढ्या सध्या सोप्या पद्धतीने हाताळत होता आम्ही दोघे सुद्धा त्याच्याबरोबर तिथेच होतो. एकही माशी आम्हाला चावली नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का बसला नाही आणि लाख दीडलाख माश्यांचे जीव वाचले. मधमाशांबद्दलची एवढी भीती आपल्या मनात लहान पानापासून बिंबवलेली असते की, त्यांना पाहूनच त्यांना मारण्याचा विचार पाहिला आपल्या डोक्यात येतो.

Amit Godase

एवढं सगळं शांतपणे होत असलेलं पाहून मी त्याला विचारलं.. त्यांनी आपल्यावर हल्ला का नाही केला? कारण बहुतांश वेळा आपण त्यांच्या कामात अडथळा आणला तर ते आपल्यावर हल्ला करतात हे पाहून आणि वाचून माहित होतं. तो म्हणाला... आपण त्यांना त्रास द्यायच्या उद्देशाने काही करत नव्हतो आणि हे त्यांना कळत. दुसरं म्हणजे आपण त्यांना अलगद /शास्त्रोक्त पद्धतीने हाताळलं हेच जर आपण त्यांच्यावर जबरदस्ती किंवा वार केला असता तर त्यांनी आपल्याला फोडून काढलं असतं एवढं नक्की! हे सार इतकं विलक्षण होत की, आम्ही दोघेही भारावून गेलेलो. जीव घेणं जरी स्वस्त असलं तरी जीवनदान देण्याचा सुखद अनुभव त्या पैशांपेक्षा मोलाचा वाटला. आपल्याबरोबर निसर्ग वेगवेगळे प्रसंग घडवून आणतो त्यावेळेस आपण त्यावर कसे प्रतिसाद देतो की, प्रतिकार करतो हे माणूस म्हणून आपल्याच हातात असतं.

Amit Godse

याचा उद्देश एवढाच की, या अवलियाला आणि त्याच्या मधमाश्यांना संवर्धनाच्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून अशा लाखो/ करोडो मधमाश्यांचा संवर्धन/ प्राण वाचावे व असे अमित गोडसे प्रत्येक शहरात लाखोंच्या संख्येत तयार व्हावेत. अमित गोडसे त्याचे कार्य आणि वेबसाईट लिंक खालील प्रमाणे. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि मधमाश्यांचं संवर्धन करा. 

अमित गोडसे, पुणे. 
+91 83083 00008

https://www.beebasket.in/online-media/

इतर ब्लॉग्स