Election Results : उत्तर भारतात मोदींची भगवी लाट

Narendra Modi
Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत तीनशेपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही उत्तर भारतातील सर्वच राज्यात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. उत्तर प्रदेशातही त्यांनी महागठबंधनला रोखून ठेवले.

उत्तरप्रदेशात 80 पैकी 63 जागांवर आघाडी मिळवित भाजपने सप-बसप महागठबंधनचा, तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांचा पराभव केला. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव पराभूत झाल्या. मायावती यांच्या बसपला 11 जागा, तर यादव यांच्या समाजवादी पक्षाला केवळ पाच जागा मिळाल्या. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी वगळता पक्षाला एकही जागा मिळविता आली नाही. त्यामुळे काँग्रेस व त्यांच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या दहा जागा घटल्या. त्या जागा बसपच्या पारड्यात पडल्या. सपचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव निवडून आले.

काँग्रेस निष्प्रभ
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस सत्तेवर आले. गुजरातमध्येही दीड वर्षांपूर्वी त्यांनी चांगली लढत दिली. या चार राज्यात 2014 च्या निवडणुकीत भाजपने 91 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. या दोन्ही राज्यात भाजप व काँग्रेस अशीच थेट लढत होती. यावेळीही भाजपने 91 पैकी 88 जागा जिंकल्या. काँग्रेसला मध्यप्रदेशात एक, तर छत्तीसगडमध्ये दोन जागा मिळाल्या. मोदी यांनी गुजरातमध्ये प्रचाराची सांगता करताना राज्यातील सर्व 26 जागा भाजपला देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. गुजरातबरोबर राजस्थानमध्येही सर्व 25 जागी भाजपचे उमेदवारच आघाडीवर आहेत. मध्यप्रदेशात 29 पैकी 28, तर छत्तीसगडमध्ये 11 पैकी नऊ जागा भाजपला मिळाल्या.

बिहार, झारखंडमध्ये मोदी लाट
बिहारमध्ये मोदी यांच्या कार्यकाळात सर्वांधिक विरोध झाला होता. निवडणुकीत मात्र बिहारमधील 40 पैकी 39 जागा भाजप-जद(यू)- लोजप आघाडीला मिळाल्या. भाजपने 17, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जद(यू)ने 16, तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने सहा जागा मिळविल्या. काँग्रेसला एका जागेवरच समाधान मानावे लागले. तर लालूप्रसाद यादव यांच्या राजदला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव याच्या नेतृत्वाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी पक्षांना सात जागा मिळाल्या होत्या.
झारखंडमध्ये 14 पैकी भाजपला 11 व त्याच्या मित्रपक्षाला एक जागा मिळाली. गेल्या निवडणुकीतही भाजपला 12 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाला प्रत्येकी एक जागा मिळाली.

दिल्ली (7), हिमाचल प्रदेश (4), उत्तराखंड (5), हरियाना (10), चंदीगड (1) येथील सर्व जागा भाजपला मिळाल्या. गेल्या वेळी, हरियानातील तीन जागा विरोधकांना मिळाल्या होत्या. यंदा त्याही भाजपने हिसकावून घेतल्या. हरियानात येत्या ऑक्‍टोबरमध्ये महाराष्ट्राबरोबरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्‍मीरमध्ये भाजपच्या तीन जागा कायम राहिल्या, पण तेथे उर्वरीत तीन जागांवर पीडीपी ऐवजी नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे.

पंजाबमध्ये 13 पैकी काँग्रेसने आठ जागा मिळविल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागेत पाचनी वाढ झाली. पंजाबात गेल्या निवडणुकीत अकाली दलाला चार, तर भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या. यंदा दोन्ही पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या. आपने गेल्या वेळी चार जागा जिंकल्या होत्या, त्यांना यंदा एका जागेवर समाधान मानावे लागले. देशभरात आपचा एवढा एकच खासदार निवडून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com