योगमय जीवन!

Dr. Samprasad Vinod
Dr. Samprasad Vinod

योगमय जीवनाचा एक आदर्श दीपस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रख्यात योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद हे एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आहे. अभिजात योगसाधनेला महत्त्व देऊन तो ‘योग’ दैनंदिन जीवनात उतरावा, यासाठी अखंड प्रयत्नशील असणाऱ्या डॉ. विनोद यांच्या योगसाधनेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा मुक्त संवाद.
 
‘डॉक्टर’ बनण्याचे भौतिक शिक्षण घेताना ‘योग’मार्गाकडे कसे वळलात?
माझे वडील महर्षि न्यायरत्न विनोद (अप्पा) जेव्हा आजारी होते, तेव्हा मी अवघ्या २० वर्षांचा होतो आणि एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होतो. अप्पांचे निधन झाले, तेव्हा मृत्युविषयीच माझ्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली. त्या जिज्ञासेने मी व्यापलो गेलो. मी मग गुपचूप स्मशानभूमीत जाऊन बसायचो आणि जळणारी प्रेतं पाहत बसायचो. मरण्याविषयीच्या जिज्ञासेच्या शोधातून जीवनाविषयीचा एक नवा आयाम मला मिळाला. याच दरम्यान, रमणमहर्षि, ओशो, जे कृष्णमूर्ती यांचे विचार ऐकले आणि वाचले. मरणावरती ध्यान केंद्रित झाले. त्यातून जगण्याची दृष्टी मिळाली. यातून मी ध्यानाकडे आकर्षित झालो. त्यानंतर पतंजलींची योगसूत्रे समोर आली. त्यांचे वाचन करताना अनुभव, प्रयोगातून ते समजून घेऊ लागलो, तसतशी त्याची एक निराळीच गोडी निर्माण होत गेली. 

सलग वर्षे योगसाधनेचा हा प्रवास आणि अभिजात योगसाधनेची दृष्टी याविषयी थोडे सांगा? 
प्रस्थापित मार्गांनी योगाचा अभ्यास न करता स्वत: वाचून त्यावर प्रत्यक्ष प्रयोग करणे आणि अनुभवातून जाणून घेणे यावर मी भर दिला. स्वभाव वृत्तींचा परिचय जवळून येत गेला. मन हे आपलाच घटक असेल तर त्याच्याशी भांडून काय उपयोग आहे? काहीही सिद्ध करण्याचा आटापिटा न करता समजून घेण्याची भूमिका असेल, तर अधिक चांगल्यारितीने ‘योग’ समजू शकतो, असे लक्षात आले. प्रामाणिकपणे पडताळून पाहण्याची सवय लावली, तर मन शांत होते असे लक्षात येत गेले. पोथीनिष्ठ अनुभवातील निष्ठा जखडून टाकते. योग हे साधन म्हणून अध्यात्माच्या खोलात जाणे ही नैसर्गिक प्रवृत्ती असल्याने वरवरचे काही नको, जे हवे ते अभिजात असावे, शाश्वत असावे, सत्य असावे या भूमिकेतून शोध घेत गेलो.

पारंपरिक योगअभ्यासामध्ये ‘सिद्धी’ म्हणून ती प्राप्त करण्याचा आटापिटा ठिकठिकाणी जाणवत होता आणि तो मार्ग मला मान्य होत नव्हता. मानण्यापेक्षा जाणण्यावर अधिक भर दिला. अंतरंग जाणून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. अंतिम सत्याचा शोध घेण्याचाच प्रयत्न केला. अभिजात योगसाधनेची सुरवात तिथून होत गेली. तोंडात बोटं घालतील असे शरीर कमावता येईलही, परंतु आंतरिक परिवर्तनाचे काय? आपल्याच अंतरंगात योगसुत्रांची सत्यासत्यता पडताळून पाहणे, त्यानंतर जे सत्य समोर येईल यावर जी निष्ठा निर्माण होईल, ती अनुभूतीजन्य ज्ञानावर आधारित असेल हे लक्षात येत गेले. हीच रुची टिकून राहिल्याने आज ५० वर्षे झाली तरी मी योगसाधनेचा आनंद घेत आहे. 

सर्वसामान्यांपर्यंत योग आणि अभिजात योगसाधना कशी पोहोचणार? 
कोणतीही गोष्ट जेव्हा समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोहोचते, तेव्हाच ती उपयोगी असते. त्याप्रमाणे लोकलमधून प्रवास करणाऱ्या माणसापर्यंत योग पोहोचावा आणि तो त्याच्या जीवनाचा भाग व्हावा असे मला मनापासून वाटते. योग हा निव्वळ व्यायामप्रकार नसून ती एक जीवनशैली आहे, हे समजून ते रुजणे महत्त्वाचे आहे. ध्यानमयता कशी असावी हे शिकले, तर आपल्या दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनातही काही प्रमाणात मन शांत राखणे साध्य होऊ शकते. आतून बदल झाल्याशिवाय बाहेरचे बदल तात्कालिक असतात हे ध्यान आणि योगाद्वारे समजत गेले, तर आंतरिक परिवर्तन निश्चितपणे होत जाईल.  

आजच्या संदर्भात ‘योग’ विपर्यस्त स्वरूपात समोर येतोय का? आजच्या ताणतणावांनी भरलेल्या जगात ‘योग’ महत्त्वाचा कसा?
योगाची उपलब्धता सार्वत्रिक झाली आहे आणि त्याचा प्रसार होतो आहे ही चांगलीच गोष्ट आहे, पण अभिजात योग हे अनुभूतीजन्य ज्ञान आहे. अभिजात योगसाधना हे ‘स्व’ला जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यासाठी धकाधकीच्या आयुष्यातील काही प्राधान्यक्रम बदलावे लागतील. वेळ देऊनच त्याची अनुभूती घेता येईल. योग हे क्षेत्र तरी स्पर्धेपासून दूर राहावे. स्वानंदाय स्वान्तसुखाय ठेवावे. हे अतिशय मौलिक असे ज्ञान आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीने प्रसार, प्रचार झाला, तर ते वाहून तर जाणार नाही ना, याची चिंता वाटते. अभिजात योगसाधना टिकवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. 

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com