बरे होण्याचीच मानसिकता मारणारा नवा मानसिक आजार

शिवानी खोरगडे
मंगळवार, 25 जून 2019

हा आजारच असा आहे की त्यातून बाहेर पडण्याची इच्छाच मारुन टाकेल. या आजाराने ग्रस्त तुम्ही स्वतःपासून केव्हाच दूर गेले असाल. माणुसकीपासून दूर गेले असाल. संवेदना आणि वैचारिक पातळी दोन्ही संपलेल्या असतील आणि तुमच्याही हातून चोरीचा संशय असलेल्या एखाद्या तबरेजचा खून होईल...!

जमशेदपुरमधली घटना कालपासून मुद्दाम तीन-चार वेळा वाचली. म्हणजे अचानकच स्वतःच तीन-चार वेळा सर्च करुन वाचली. जात किती माणसाच्या आत्म्यात पेरली असेल याचं ही घटना उदाहरण. तसंही देशात अशी उदाहरणं कमी नाहीत. काही महिन्यांपूर्वी घडलेली हैदराबादमधली प्रणय आणि अमृता या नवविवाहितांसोबत घडलेल्या कृत्याची आठवण झाली. प्रणयचा जीव घेण्याचं कारणही जातच. 'जात'... जिला आपण स्पर्श करु शकत नाही, श्वासातून आत-बाहेर करु शकत नाही, जिचा उपयोग दैनंदिन कामात होऊ शकत नाही, जिला आकार नाही, जिला आवाज नाही, जी अदृश्य आहे... तिचं भांडवल केलंय आपण? अशा जातीची ठेकेदारी करतोय आपण?

राम नामाचा जप मनातला विश्वास आणि बुध्दीतला आत्मविश्वास वाढवण्यासाठी करायचा असतो, असं आईनं लहानपणापासून शिकवलं. माझ्या घरामागं हनुमानाचं मंदिर आहे. मला लहानपणी तिथं दर शनिवारी आई दिवा घेऊन पाठवायची. विदर्भात खूप वादळवाऱ्याचा पाऊस येतो... शेजारी उभी राहून वीज कडाडली की काय वाटावं असा विजेचा रुद्रावतार मी पाहिलाय... आमच्या परिसरात वीज पडल्याच्या घटनाही दरवर्षी घडतात. तेव्हा आई, बाबा, मी अन् भाऊ 'जय हनुमान' म्हणत घराच्या मागच्या दरवाज्यातून मंदिराकडे अजूनही बघत बसतो. पण या दोन्ही नावातलं पावित्र्य आणि आस्था आज लोकांनी फक्त 'जाती'मुळं ठेवलेली नाही. 

आईनं नेहमी शिकवलं, शाळेनं नेहमी शिकवलं ती धर्मनिरपेक्षता. पण आज ती समाजात कुठेच दिसत नाहीये. म्हणजे मुस्लीम लोकच हे गायींची कत्तल करुन विकतात, खालच्या जातीत लग्नं केलं तर समाज तोंडात शेण घालतं, काही खालच्या जातीतील लोक तर अस्पृश्य असतात... अशा गोष्टी समाजात बिंबवल्या गेल्या आहेत, इतक्या की जसं आपण श्वास घेतो... जसं हाताला पाच बोटं असतात... तहान लागल्यावर पाणी पितो... भूक लागल्यावर जेवण करतो... इतकं नैसर्गिक वाटावं, इतकं स्ट्रॉंगली 'जात' बिंबवल्या गेली आहे आणि दुर्दैव असं की आपल्यापैकी बहुतेकांनी हे बिंबवणं स्वीकारलही आहे. 

जातीचं राजकारण.. जातीचा बोलबाला.. जातीचा दरारा.. जातीचं वर्चस्व.. जातीतील विषमता.. जातीय तेढ.. जात जात जात. आजार झालाय... मानसिक स्तरावर पसरणाऱ्या या आजाराला बळी पडलात तरी तुमचे बरे होण्याचे काहीही चान्सेस नाहीत. कारण हा आजारच असा आहे की त्यातून बाहेर पडण्याची इच्छाच मारुन टाकेल. या आजाराने ग्रस्त तुम्ही स्वतःपासून केव्हाच दूर गेले असाल. माणुसकीपासून दूर गेले असाल. संवेदना आणि वैचारिक पातळी दोन्ही संपलेल्या असतील आणि तुमच्याही हातून चोरीचा संशय असलेल्या एखाद्या तबरेजचा खून होईल...!

इतकी भयंकर असते का 'जात'? याबाबतीत आपण पुन्हा नव्यानं साक्षर होण्याची गरज नाही का वाटत? मुळात जातव्यवस्थेला आपला हेतू साध्य करायला जमाव लागतो, हे जातीच्या ठेकेदारांनी चांगलंच ओळखलंय. पण ठेकेदारांना आपण ओळखू शकलेलो नाही. हे ठेकेदार तुमच्या आमच्या सारखेच सामान्य दिसतात. कदाचित ते तुमच्या आसपासही असतील, तुम्ही त्यांना रोज किंवा कधीतरी भेटतही असाल... पण सभ्यतेचा मुखवटा चढविलेले हे ठेकेदार लवकर लक्षात येणार नाहीत. पण ते आहेत... त्यांची संख्या वाढतेय... म्हटलं ना, हा आजार आहे. मानसिक स्तरावर पसरणारा.. बोलण्यातून, ऐकण्यातून, वागण्यातून तुमच्या विचारात उतरणारा.. आपण काय करु शकतो? सद्सद्विवेकबुध्दी जागृत ठेवू शकतो. आपल्या विचारांवर आपल्यावर झालेल्या संस्कारांचा नेहमी पगडा असतो. पण आपण आपली वैचारिक पातळी निर्माण करु शकू, एवढी अक्कल येण्याच्या वयात येतोच ना आपण... म्हणजे घरचे सांगतात, 'अरे सिगारेट ओढू नकोस..' तरी आपण सिगारेटचा नाद काही सोडत नाही. हा, हीच ती वेळ. जेव्हा आपण आपल्यावर झालेले संस्कार विसरतो आणि आपल्याला हवं तसं करतो. या वेळी धर्म, जात या गोष्टींचा आजार होणार नाही, याची काळजी आपण माणुसकीखातर घेऊ शकतो. अजून काय करु शकतो? सुचतंय का काही तुम्हाला? आणि सूचत असेल हा जातीचा आजार संपवण्याचा उपाय तर सगळ्यांना सांगा, आवर्जून. 

इतर ब्लॉग्स