'आपण एकाच गावचे की हो'

 'आपण एकाच गावचे की हो'
'आपण एकाच गावचे की हो'

तरूण पिढी वडिलधारी माणसांचे ऐकत नाही, अशी तक्रार आपण नेहमी ऐकतो. पण "त्याचं ऐकलं पाहिजे', असे अनुभवांती रिचर्ड वर्मा यांना वाटते. ते अमेरिकेचे भारतातील राजदूत होत. 16 जानेवारी 2015 रोजी त्यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नावाची शिफारस ओबामा यांच्याकडे केली होती, ती हिलरी क्‍लिंटन यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार व व्हर्जिनियाचे सिनेटर टिम केन यांनी. केन हे भारतप्रेमी.

राजदूतपदाची सूत्रे हाती घेण्याआधी वर्मा ओबामा यांच्या मंत्रिमंडळात विधी व न्याय खात्याचे साह्यक मंत्री होते. तत्पूर्वी सिनेटमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केले. ज्येष्ठ राष्ट्रीय सल्लागार पदीही सांभाळले.

ओबामा यांच्याकडून वर्मा यांना आमंत्रण आले, तेव्हा त्यांचे वडिल कमल वर्मा यांनी सांगितले, की ओबामा यांना भेटशील, तेव्हा आपण मूळचे पंजाबमधील जालंधरचे आहोत, असे निश्‍चित त्यांना सांग. "" मी मुळीच तसे करणार नाही व सांगणारही नाही,"" असे उत्तर चिडून रिचर्डने दिले. वस्तुतः आपल्या मुलाला चांगले पद मिळणार, याचा आनंद वाटून वडिलांनी तसा आग्रह धरला होता. रिचर्ड वर्मा म्हणाले, "" माझ्या वडिलांना कुठेही भारतीय माणूस दिसला,की त्याच्याबरोबर बोलण्याची संवय होती, मग तो टॅक्‍सीवाला असो, अथवा कुणीही. ते म्हणायचे,"इंडिया इज ए स्मॉल प्लेस, एव्हरी वन नोज द अदर परसन." ओबामांना भेटताच आपण मूळचे कुठले आहोत, हे त्यांना सांगणे मला अप्रस्तुत वाटत होते.""

""नंतर 2013 मध्ये भारताचे त्यावेळचे पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी वॉशिग्टनला भेट दिली. त्यावेळी ओबामा यांनी मला बोलावले. मी व्हाईट हाऊसमध्ये गेलो, तेव्हा ओबामा यांच्या देखत डॉ सिंग यांनी माझ्याकडे पाहात विचारले, "" तुम्ही तर भारतीय दिसता, मूळचे कुठले?"" मी म्हटलो, ""जालंधरचा."" त्यावर स्मितहास्य करीत डॉ सिंग ओबामा यांच्याकडे पाहात उद्गरले, ""म्हणजे आपण एकाच गावचे की. इट्‌स ए स्मॉल वर्ल्ड "" ओबामांनाही त्यांनी ते सांगितले. अन्‌ सारेच हसू लागले."" रिचर्ड वर्मा यांना वडिलांचा आग्रह आठवला.

भारत अमेरिका मैत्री संघापुढे 6 डिसेंबर 16 रोजी केलेल्या भाषणात हा किस्सा सांगताना ते म्हणाले, ""यापासून मी एक धडा घेतला की वडिलांचे म्हणणे मुलाने ऐकले पाहिजे."" भारतात आल्यानंतर त्यांनी 21 मे 2015 रोजी जालंधर जिल्ह्यातील आपल्या आप्रा या मूळ गावाला भेट दिली.

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिब्लिकन पक्षाचे, तर वर्मा डेमॉक्रॅटिक पक्षाचे. ""भारतात काम करण्याची संधि मिळताना मला माझ्या आईवडिलांची आठवण झाली. सन्मान मिळाला, याचेही समाधान वाटते."" डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्याने मैत्रीत अंतर निर्माण होणार काय, या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणतात, "" जॉन एफ केनडींच्या काळात आपण अगदी निकट आलो होतो. परंतु, नंतरच्या काळात काहीसे दुरावलो. गेल्या दहा वर्षात आपले संबंध पूर्ववत झाले असून, विशेषतः गेल्या दोन वर्षात केनेडी व नेहरू यांच्या काळातील संबंधांइतके आपण निकट आलो राहोत. आपल्याला एकमेकांची गरज आहे. अमेरिकेत असलेल्या भारतीयांची संख्या तीन लाखावर गेली असून एकमेकांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोनही बदलला आहे.""

रिचर्ड वर्मा यांनी सादर केलेली आकडेवारी उद्बोधक आहे. ""केवळ दोन वर्षांच्या अवधीत अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्याने तब्बल आठ वेळा भारताला भेट दिली, असे यापूर्वी कधी घडले होते का? आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारत एक मोठी सत्ता आहे, असे आम्ही मानतो. दुतर्फा व्यापार गेल्या आठ वर्षात तिपटीने वाढला असून, 110 अब्ज डॉलर्सवर जाऊन पोहोचलाय.50 अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्री अमेरिकेकडून भारत खरेदी करीत आहे. गेल्या वर्षी भारतीयांना अमेरिकन दूतावासाने 11 लाख व्हीसा दिले. हा एक उच्चांक होय. सध्या 66 हजार भारतीय विद्यार्थी अमेरिकेत शिकत आहेत. गेल्या दोन वर्षात ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वेळा भेटी झाल्या. त्यापैकी तीन शिखर परिषदा होत्या. मैत्री वृद्धींगत करण्यासाठी दुतर्फा 40 समन्वय गटांतर्फे 100 निरनिराळ्या क्षेत्रात वाटागाठी चालू आहेत. इतिहासातील दूषित पूर्वग्रहांना आपण मागे सोडले आहे. शासनाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती सोपविताना भारताची प्रतिमा कितीतरी उंचावलेली आहे. अमेरिकेच्या इंडिया कॉकस (समर्थक)च्या सदस्यांची संख्या 365 वर गेली, हे घट्ट मैत्रीचे द्योतक होय. भारत व अमेरिकेच्या 1.6 अब्ज लोकसंख्या असलेली दोन लोकशाही राष्ट्रे जगाला नवे वळण देऊ शकतील""

वर्मा हे भारतातील 25 वे राजदूत. यापूर्वी आपल्या कारकीर्दीत भारतातील सर्वाधिक ठिकाणांना भेटी देण्याचा उच्चांक माजी राजदूत चेस्टर बॉउल्स यांनी गाठला होता. त्यांनी भारतातील 43 शहरे व स्थळांना भेटी दिल्या.त्यांच्याशी वर्मांची तुलना होऊ शकेल काय? वर्मा यांनी आजवर 29 पैकी 27 राज्ये व पासष्ठ शहरे, स्थळे यांना भेटून तो उच्चांक मोडलाय. त्यांना लोक प्रश्‍न विचारू लागलेत की राजदूताचे कार्य प्रामुख्याने दिल्लीत असते. तुम्ही इतके हिंडता, यावरून तुम्हाला दिल्लीत काही काम नाही, असे दिसते. यावर वर्मा म्हणतात, ""राजदूतांनी देशभर फिरावयास हवे. जनतेचा, शहराचा कानोसा घ्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा, मैत्री वाढवावी. त्यासाठी दिल्लीतच ठिय्या मारून बसण्याची काही एक गरज नाही!"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com