शीला दीक्षित : एका पर्वाचा अस्त

शीला दीक्षित : एका पर्वाचा अस्त

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांचे काल दुपारी दिल्लीतील फॉर्टिज एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये निधन झाले अन्‌ दिल्ली कॉंग्रेसमधील खंबीर नेतृत्वाचे एक पर्व संपले. त्यांच्या निधनाने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या इतके अनुभवी, राजकारणात मुरलेले पर्यायी नेतृत्व पक्षाला सहजासहजी मिळणार नाही, याचीही जाणीव काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व त्यांच्या निकटवर्तीयांना झाली आहे. माजी राष्ट्रपती कै. शंकर दयाल शर्मा यांचे जावई अजय माकन यांनी अधुनमधून पक्षाचा कारभार हाताळला आहे. तसेच चांदणी चौकातून निवडून येणारे जयप्रकाश अग्रवाल यांनीही स्थानीय काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. तथापि, काँग्रेसच्या राजकारणात दिल्लीकरांच्या सर्वाधिक लक्षात राहणारा काळ म्हणजे 1998 ते 2013. या काळात तब्बल पंधरा वर्षे त्या मुख्यमंत्री होत्या. त्यांचे घराणे गांधी परिवारनिष्ठ होते. सासरे उमाशंकर दीक्षित देशाचे माजी गृहमंत्री व ज्येष्ठ नेते. त्यांची सून म्हणून राजकारणात वावरताना शीला दीक्षित यांचा परिचय प्रथम इंदिरा गांधी, राजीव गांधी व नंतर सोनिया गांधी यांच्याबरोबर झाला. त्यांचा विवाह उमाशंकर दीक्षित यांचे चिरंजीव विनोद दीक्षित यांच्याबरोबर झाला होता. ज्या-ज्या वेळी दिल्लीतील कॉंग्रेसमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली, तेव्हा कॉंग्रेसच्या हायकमांडने शीला दीक्षित यांना जबाबदारी पेलण्यासाठी आमंत्रित केले. येत्या काही महिन्यात दिल्लीतील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या हयात असत्या, तर कॉंग्रेसने पुन्हा दीक्षित यांचा चेहरा भावी मुख्यमंत्री म्हणून मतदारापुढे ठेवला असता. 

कै. उमाशंकर दीक्षित गृहमंत्री तसेच गोव्याचे कॉंग्रेसचे राजकीय निरिक्षक होते. 1970-71 चा तो काळ होता. गोव्याच्या "दैनिक गोमंतक"चा बातमादीर म्हणून मी दिल्लीत काम करीत होतो. त्यावेळी आठवड्यातून किमान तीन वेळा मी त्यांना निवासस्थानी जाऊन भेटत असे. गोव्यातील राजकीय घटनांच्या व दिल्लीतून होणाऱ्या सूत्रचालनाच्या बातम्या त्यांच्याकडून मिळत. संध्याकाळच्या वेळी मी जात असे, तेव्हा शीला दिक्षित रबरी पिशवी घेऊन दीवाणखान्यात येत. त्यात थंड पाणी असे. दिवसभराच्या कामकाजामुळे दीक्षितजींचे डोके भणभणून जाई, ते शांत करण्यासाठी शीलाजी थंड पाण्याची पिशवी उमाशंकर दीक्षित (सासरेबुवा) यांच्या मस्तकावर पंधरा वीस मिनिटे धरून ठेवीत. त्या तशाच उभ्या राहायच्या. त्यामुळे त्यांना बरे वाटे. तशा अवस्थेतच उमाशंकरजी व माझा संवाद चाले. उमाशंकरजी सांगत, की मी गोव्याला जातो, तेव्हा विमानाच्या खिडकीतूनही कोणत्या गावावरून जात आहोत, हे मी सांगू शकेन. गोवा कॉंग्रेसमधील निरनिराळ्या नेमणुका, नेत्यांचा प्रभाव आदींबाबत ते चर्चा करीत. त्यांच्या मृत्यूंनतर शीला दीक्षित यांना मी अनेकदा भेटलो. बोलण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर झळकलेले स्मितहास्य आजही आठवते. 

काल दुपारी येथील इंडिया इंटरनॅशनल सेन्टरमध्ये डॉ. सुजाता केळकर शेट्टी यांच्या "नाईन्टी नॉट आऊट" या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या हस्ते झाले. अर्थतज्ञ विजय केळकर यांची ती कन्या. कार्यक्रमाला माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग येणार असल्याने पोलीस व कमांडोंचा कडक बंदोबस्त होता. तेवढ्यात डॉ. सिंग यांचा अधिकारी धावत आला व ""शीला दीक्षित यांचे निधन झाल्याने डॉक्‍टरसाहेब येऊ शकणार नाही,'' असा निरोप त्याने दिला. कॉंग्रेसवर दुःखाचे सावट तर होतेच. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही अंत्यदर्शनासाठी गेले. 

शीला दीक्षित व दिल्लीचा विकास हे एक जुळलेले समीकरण होते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, केंद्र व दिल्लीत कॉंग्रेसची सरकारे होती. त्यामुळे मतभेदाचे प्रसंग जवळजवळ नगण्य होते. तरीही केंद्राने दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला नाही. त्यामुळे, दिल्लीवर नेहमी नायब राज्यापालाचे वर्चस्व राहिले आहे. आम आदमी पक्षाच्या कारकीर्दीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकीकडे व मोदी सरकार व नायब राज्यपाल विरूद्ध असा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असतो. 

2014 मध्ये त्या केरळच्या राज्यपालपदी होत्या. त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात त्यांनी भाजपला पाय रोऊ दिले नाही. परंतु, दिल्लीतील जनता केंद्रातील सरकारला पार कंटाळली होती. याच काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार विरोधी देशव्यापी आंदोलनात अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्व पुढे आले व त्यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाला बहुमत मिळाले. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकात तब्येत नाजुक असतानाही शीला दीक्षित यांनी पूर्व दिल्लीतून निवडणूक लढविली. तथापि, मोदींच्या झंझावातात त्या पराभूत झाल्या. तीच अवस्था आम आदमी पक्षाची झाली. त्या निवडणुकीत आम आदमी पक्षाबरोबर समझोता करण्याबाबत शीलाजी उत्सुक नव्हत्या. परिणामतः कॉंग्रसला जरी अपयश आले, तरी झालेल्या मतदानात कॉंग्रेसचा दुसरा क्रमांक लागला व आम आदमी पक्षाला दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांपैकी तीन जागांवरील अनामत रक्कम गमवावी लागली. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकीत दिल्लीत तिरंगी सामना होणार, असे चित्र निर्माण झाले. कॉंग्रेसला आता ऐन निवडणुकीत शीला दीक्षितांच्या नेतृत्वाच्या पोकळीची जाणीव होणार आहे. राजीव गांधी यांच्या कारकीर्दीत दीक्षित यांनी पंतप्रधानांच्या कार्यालयातील मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. राहुल गांधी यांनी अलीकडे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली होती. परंतु, खालावणाऱ्या तब्येतीमुळे त्या फार काम करू शकल्या नाही. त्यांचे चिरंजीव माजी खासदार संदीप दीक्षित एक स्पष्टवक्ते म्हणून ज्ञात आहेत. 

2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळी त्यांनी दिल्ली अगदी लखलखीत केली, तथापि, क्रीडांचे व्यवस्थापन व आयोजन यात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचा फटका त्यांच्या व दिल्ली सरकारच्या प्रतिमेला बसला. त्याचा परिपाक म्हणजे, 2013 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकात सत्तारूढ कॉंग्रेसपक्ष पराभूत झाला. शीला दीक्षित हारल्या. 

सोनिया गांधी यांनी दीक्षित यांना प्रदेशाध्यक्षपदी नेमले होते, ते त्यांच्या जबाबदारी पेलण्याच्या कार्यक्षमतेमुळे. तथापि, मृत्यूपूर्वी दिल्लीचे प्रभारी पी.सी.चाको व तीन कार्यकारी अध्यक्षांनी त्यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांच्यात व पक्षात कडवटपणा निर्माण झाला. शीला दीक्षित यांनी ब्लॉक व जिल्हा पातळीवरील निरिक्षकांच्या ज्या घोषणा केल्या होत्या, त्याला या चार जणांनी आक्षेप घेतला. चाको यांच्यानुसार, आपल्याला न कळविता, श्रीमती दीक्षित यांनी 14 जिल्हा व ब्लॉक पातळीवरील 280 निरिक्षकांच्या नेमणुका केल्या. चाको व तीन कार्याध्यक्षांनी राहुल गांधी यांच्याकडे लेखी नाराजी व्यक्त केली. तथापि, दिल्ली कॉंग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी शीला दीक्षितांचे निर्णय योग्य असल्याचे वक्तव्य केले. दीक्षित यांच्या मृत्यूनंतर तरी हा वाद संपुष्टात यावा, अशी अपेक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com