मदतीला धावून जाणारा अजितदादा

Ajit Pawar
Ajit Pawar

राज्याच्या राजकारणात एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची सातत्याने चर्चा होते ते माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा आज (22 जुलै) 60 वा वाढदिवस असून, एक भाऊ म्हणून ते कसे आहेत या विषयी त्यांची बहिण विजया पाटील यांनी लिहिलेला विशेष लेख...

कार्यकर्ता असो वा कुटुंबीय कोणालाही कधीही तातडीची गरज पडली तर त्याच्या मदतीला धावून जाणारा असा माझा अजितदादा.... कोणाचा अपघात झाला असो व कोणावर ऑपरेशनची पाळी आलेली असो, अजितदादांना मदतीसाठी फोन केल्यानंतर त्यांनी मदत केली नाही असे कधी घडतच नाही. तातडीच्या वेळेस कोणी तरी पुढे होऊन निर्णय घेण्याची गरज असते, अजितदादा निर्णय घेण्याच्या बाबतीत अत्यंत तत्पर आहे. पटकन निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा स्वभाव असल्यामुळे अनेकदा अशा निर्णयामुळे अनेकांना मदत होते.

प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणं हा अजितदादांचा स्वभाव आहे. त्यामुळेच त्याने मनाने लोक जोडलेली आहेत. त्याचा स्वभाव हा सतत दुसऱ्याला मदत करण्याचा असतो, आमच्या कुटुंबातील कोणाला काही झालं किंवा त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काही झालं, त्याच्या कुटुंबात काही घडलं तर सर्वात पहिलं धावून जाणारी व्यक्ती अजितदादा असतात.

आमच्या सर्व भावंडांमध्ये आमच्या आईवर सर्वाधिक जीव लावणारा आणि आईला जरा काही झालं तर सर्वाधिक काळजी करणारा हा दादा आहे . कोणतीही नवीन गोष्ट केली की ती पहिली हौसेने आईला सांगायची किंवा आईला दाखवायची हा त्याचा शिरस्ता आहे. दररोज नियमितपणे आईची चौकशी करायची तिला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायची हे दादा करतो . आईसोबतच आम्हा सर्व बहिणी व कुटुंबीयांच्या सतत दादा संपर्कात असतो आणि आम्हालाही कोणताही त्रास होऊ नये याची तो स्वतः पुढे होऊन काळजी घेत असतो.

आजही इतक्या मोठ्या पदावर जाऊन देखील त्याने आपले लहानपण व आठवणी लक्षात ठेवल्या आहेत. आम्ही कुटुंबीय, सर्व भावंड जेव्हा एकत्र जमतो तेव्हा दादा गप्पा मारण्या सोबतच सर्वांच्या गमतीजमती करणं, चेष्टा-मस्करी करणं आणि सर्वांना मनमुराद हसवण आवडतं... त्याच्याकडे नर्मविनोदी स्वभाव आहे त्यामुळे सहजतेने तो वातावरणातला तणाव दूर करतो. सर्वाधिक रमण्याची त्याची जागा म्हणजे आम्ही कुटुंबिय आहोत.

अजित दादा हौशी आहे त्याला प्रत्येक गोष्टीची आवड आहे . कोणतीही गोष्ट करताना ती निवडून आणि आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन घडवून तो करतो. इमारती बांधणे असो वा लॅन्डस्केपिंग असो, एखाद्या आर्किटेक्चर ला लाजवेल किंवा त्याला समजणार नाही अशा पद्धतीने दादा अनेक गोष्टी करत असतो . आर्किटेक्चर ला समजणार नाही अशा गोष्टी तो सहजतेने सुचवून जातो त्यामुळे इमारती उभारताना त्याने दिलेल्या सूचना या भविष्यात मोलाच्या ठरतात.

आमच्या कुटुंबातील कोणताही कार्यक्रम, दिवाळीचा सण असो किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात स्वतः पुढे होऊन सर्व तयारी व्यवस्थित झाली आहे की नाही, टेबल खुर्च्या नीट लागले आहेत की नाही इथपासून ते आलेली प्रत्येक व्यक्ती व्यवस्थित जेवली आहे की नाही हे पाहणे त्याला आवडतं. आलेल्या प्रत्येकाच आदरातिथ्य करणे हे आपले कर्तव्य समजतो, स्वतः उभे राहून प्रत्येकाची काळजी घेणे हा त्याचा स्वभाव आहे . 

कार्यकर्ता असो व कुटुंबातील कुठलाही व्यक्ती असो प्रत्येकाची काळजी ते तितक्याच तत्परतेने घेतात हे मला जास्त महत्त्वाचे वाटते.

रस्त्यात कुठे अपघात झाला तर गाडी थांबवून पहिली अपघातग्रस्तांना मदत करणे हे त्याचे नेहमीचे काम आहे. अपघातग्रस्त कुणीही असला तरी त्याचा जीव वाचणं, त्याच्यावर तातडीने उपचार होण त्याला महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे कितीही व्यस्त कार्यक्रम असला किंवा घाई असली तरी अपघात बघून दादा पुढे निघून गेलाय असं कधी घडत नाही. हा त्यांचा वेगळा स्वभाव आहे वरून कितीही कठोर वाटत असले तरी आतून ते मनाने खूप हळवे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परमेश्वराने असेच समाज कार्य करण्यासाठी उदंड आयुष्य देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
(शब्दांकन - मिलिंद संगई)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com