राज्याचे राजकारण पुन्हा भुजबळ केंद्रीत!

विक्रांत मते
गुरुवार, 25 जुलै 2019

भुजबळ यांनी महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रकल्पावरून लक्ष वळविण्यासाठी टुम सोडल्याचा दावा करताना मी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येचं असल्याचे जाहीर केले खरे परंतु मी शिवसेनेत जाणारचं नाही असे कुठलेही वक्तव्य न केल्याने भुजबळ यांच्या भोवती राज्याचे राजकारण केंद्रीत झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचे वादळ पुन्हा एकदा घोंघावल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे. भुजबळ यांनी महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रकल्पावरून लक्ष वळविण्यासाठी टुम सोडल्याचा दावा करताना मी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येचं असल्याचे जाहीर केले खरे परंतु मी शिवसेनेत जाणारचं नाही असे कुठलेही वक्तव्य न केल्याने भुजबळ यांच्या भोवती राज्याचे राजकारण केंद्रीत झाले आहे.

गुजरातला जाणारे पाणी मांजरपाडा या दहा किलोमीटर बोगद्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होत असतानाच आज सकाळ पासूनचं भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचेचं माजी मंत्री सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश चर्चेला निमित्त ठरला. अहिर व भुजबळ हे माझगाव येथे काही वर्षांपूर्वी शेजारी होते व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अहिर हे भुजबळ समर्थक असल्याचे कारण चर्चेमागे सांगितले जात आहे. अर्थात भुजबळ यांनी मी अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस मध्येचं असल्याचा दावा केल्यानंतर चर्चेचे वादळ शमले परंतु भुजबळ यांनी मी इथेचं असल्याचे वक्तव्य करताना शिवसेनेत जाणार नसल्याचे ठामपणे स्पष्टीकरण न दिल्याने राज्याचे राजकारण पुन्हा एकदा त्यांच्या भोवती केंद्रीत झाले.

Image result for chhagan bhujbal sachin ahir

शिवसेनेकडून याबाबत कानावर हात ठेवण्यात आले परंतु शिवसेना व भुजबळ यांच्यातील भावनिक नाते संपूर्ण महाराष्ट्राला अवगत असल्याने भुजबळ यांच्यासाठी इतर पक्षांपेक्षा शिवसेना कधीही जवळची वाटते. राजकारणातील वैर फार काळ नसते. बाळासाहेब ठाकरे व भुजबळ यांच्यात काही काळ राजकीय वितुष्ट निर्माण झाले. मात्र, कालांतराने दोघांमधील वादाची दरी कमी होत गेली. मातोश्रीवर भुजबळ कुटूंबियांनी बाळासाहेबांची भेट घेतल्यापासून गेल्या दहा-बारा वर्षात अधुन-मधून भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा व्हायची व पुन्हा थांबायची. परंतु, आता नव्याने निर्माण झालेल्या चर्चेला येत्या विधानसभा निवडणुकीची किनार असल्याने चर्चेला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. भुजबळ हे हार मानणारे नाहीत. पडले तरी अधिक जोमाने मुसंडी घेण्याचे त्यांचे कसब जुन्या जाणत्या शिवसैनिकांना अवगत असल्याने भुजबळांचा शिवसेना प्रवेश पक्षाला अधिक उभारी देणारा ठरेल अशी आशा आहे. 

भुजबळ यांचे नाव राज्यातील आक्रमक नेत्यांमध्ये आघाडीवर असल्याने त्यांच्या रुपाने शिवसेनेला मुळ आक्रमक चेहरा मिळू शकतो याबद्दल देखील खात्री असल्याने भुजबळ यांनी शिवसेनेत प्रवेश करावा हे मानणारा देखील एक वर्ग आहे. राज्याबरोबरचं भुजबळ यांचे नाशिक जिल्ह्यातील राजकीय ताकद मोठी आहे. शिवसेनेला नाशिक मध्ये स्थान बळकट करण्याची अधिक संधी मिळेल. अर्थात शिवसैनिकांची इच्छा असली तरी वरिष्ठ नेत्यांनी भुजबळ यांचा मनापासून स्विकार करणे महत्वाचे ठरणार आहे. भुजबळ यांचा खरोखर प्रवेश होईल की निव्वळ चर्चा याबाबत ऑगस्ट अखेरपर्यंत वाट पाहणे महत्वाचे ठरेल.
 

इतर ब्लॉग्स