'फोडाफोडी' हे काँग्रेसचेच पाप!

प्रकाश पाटील
गुरुवार, 25 जुलै 2019

खरेतर ज्यांना काँग्रेसने आमदार, मंत्री केले. भरभरून दिले. प्रतिष्ठा, मानसन्मान दिला त्यांची निष्ठा एका रात्रीत कशी बदलत गेली. सरड्यासारखे रंग बदलत भाजपमध्ये जाताना काँग्रेस लायक पक्ष कसा नाही याचे तारे तोडतात, याचेच आश्‍चर्य वाटते. खरेतर कोणताच पक्ष किंवा त्यांची ध्येयधोरणे वाईट नसतात. आयुष्यभर एखाद्या पक्षात राहिल्यानंतर वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या मंडळींना ना जनाची ना मनाची लाज नसते.

कर्नाटकातील कुमारस्वामींचे सरकार कोसळल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो. तेथील घडामोडींशी आमचा काहीही संबंध नाही, असा दावा भाजपतर्फे केला जात असला तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणे शक्‍य नाही. कुमारस्वामींचे सरकार गेल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भाजपचा जो काही समाचार घ्यायचा तो घेतला आहे. कर्नाटकानंतर आता मध्यप्रदेश आणि राजस्थान रडारवर असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली.

तेथील सरकारे राहतील की जातील हे सांगता येत नाही. मात्र, या दोन राज्यातील युवा नेते सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवरील निष्ठा कायम दाखवत भाजपने मुख्यमंत्रिपदाची दिलेली ऑफर फेटाळून लावली. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करायला हवे. सगळेच नेते विकाऊ नसतात, हे त्यांनी भाजपला आपल्या कृतीतून दाखवून दिले ते बरेच झाले. 

खरेतर ज्यांना काँग्रेसने आमदार, मंत्री केले. भरभरून दिले. प्रतिष्ठा, मानसन्मान दिला त्यांची निष्ठा एका रात्रीत कशी बदलत गेली. सरड्यासारखे रंग बदलत भाजपमध्ये जाताना काँग्रेस लायक पक्ष कसा नाही याचे तारे तोडतात, याचेच आश्‍चर्य वाटते. खरेतर कोणताच पक्ष किंवा त्यांची ध्येयधोरणे वाईट नसतात. आयुष्यभर एखाद्या पक्षात राहिल्यानंतर वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या मंडळींना ना जनाची ना मनाची लाज नसते. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीयूच्या बंडखोर आमदारांचे राजीनामा सत्र मुळीच समर्थनीय नाही. त्यांना कोणाची फूस होती हे ही सांगण्याची गरज नाही. साधनसुचितेचा आणि आदर्शवादी राजकारणाच्या गप्पा मारणारा भाजपही काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण करीत आहे. 

गेल्या साठ वर्षात काँग्रेसने फोडाफोडीचे राजकारण केले. विरोधी पक्षांची सरकारे ज्या प्रकारे पाडली. तोच कित्ता जर भाजपही गिरवत असेल तर काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक तरी काय ? म्हणजेच दोघांची संस्कृती एकच असे मानायचे का ? कर्नाटकात काँग्रेसचे आमदार राजीनामा देतात काय ? मुंबईत येऊन राहतात काय ? त्यांच्यासाठी जागता पहारा ठेवला जातो काय ? हे सर्व जनतेला माहीत नाही असे मुळीच समजण्याचे कारण नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भाजपच्या ताब्यात असल्याने हम करे सो कायदा असा जर कोणी समज करून घेतला असेल तर ते मुळीच समर्थनीय नाही. 

सत्ता काय येते आणि जाते. पण, सत्तेसाठी काँग्रेसने गेल्या साठ वर्षात जे गलिच्छ राजकारण केले त्याची किंमत आज काँग्रेस भोगत आहे. सत्तेचा माज काँग्रेसने केल्याने मतदारांनी त्यांना कसा धडा शिकविला हे आपण पाहतच आहोत. लोकशाहीत लोकांना गृहीत धरता येत नाही. जोपर्यंत त्याची सहनशीलता आहे तोपर्यंत तो सगळे सहन करतो अति झाले की सत्ताधाऱ्यांची माती कशी करायची हे त्याला चांगले माहीत असते. 

मध्यप्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ विरुद्ध ज्योतिरादित्य, अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आहेत. वास्तविक या दोन्ही राज्याचा विचार केला तर दोन तरुण नेत्यांना काँग्रेसने संधी द्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या गळ्यात माळ पडली. देशातील लोकांना हे आवडलेही नव्हते. खरेतर या तरुण नेत्यांनी बंडाची भाषा न करता वडीलधाऱ्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस येथे कशी जिवंत राहील हेच पाहिले.

जर त्यांनी ठरविले असते तर भाजपच्या मदतीने ते मुख्यमंत्रीही होऊ शकले असते. तसे मात्र झाले नाही. काँग्रेस पक्षावर आपल्या पिताश्रींची किती निष्ठा होती. पक्षासाठी त्यांनी किती कष्ट उपसले होते याची जाणीव त्यांना आहे. म्हणूनच त्यांच्या स्वप्नात काँग्रेस सोडण्याचा विचारही येत नाही. एखाद्या संघ स्वंयसेवकांप्रमाणे आपलीही काँग्रेसवर निष्ठा आहे हे त्यांनी देशाला दाखवून दिले. विशेषतः:महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पोरांनी पायलट आणि शिंदेचा थोडा आदर्श घेतला तर बरे होईल. असो. 

ही झाली एक बाजू. पण, कर्नाटकातील घडामोडींनंतर प्रियांका गांधीपासून ते बाळासाहेब थोरातांपर्यत जी मंडळी भाजपच्या नावाने शंख करीत आहेत. तो ही योग्य नाही. तसा शंख करण्यात यांना अधिकार आहे का ? हा ही प्रश्‍न यानिमित्ताने विचारावासा वाटतो. दिल्लीश्‍वरांचा आदेश न मानणाऱ्यांची काँग्रेसने कशी गत केली होती याची असंख्य उदाहरणे देता येतील.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांना काँग्रेसने कसे तुरुंगात डांबले होते. त्यांच्याप्रमाणे भल्याभल्या नेत्यांना राजकारणातून उठविण्याचे षडयंत्र काँग्रेसने गेल्या सहा दशकात केले. याचाच अर्थ जो पक्ष केंद्रात बहुमताने सत्तेवर असतो तो मस्तीचे राजकारण करीत असतो मग तो काँग्रेस असो की भाजप. 

काँग्रेसचा फोडाफोडीचा इतिहास 
- 1980 मध्ये केंद्रातील जनता पक्षाचे सरकार चौधरी चरणसिंग यांना फोडून पाडले 
- चरणसिंग यांना महिनाभरात हटवून निवडणूक घेतल्या. 
-1980 मध्ये शरद पवारांचे पुलोद सरकार बरखास्त केले व निवडणूक घेतल्या. 
- 1991 व्हीपी सिंग यांचे सरकार चंद्रशेखर यांना फोडून पाडले आणि नंतर चंद्रशेखर यांचे सरकार पाडले. 
- एन. टी. रामराव यांचे सरकारही बरखास्त केले होते. 
- नैतिकतेचा कोणताही विधिनिषेध न पाळता लोकशाही मूल्यांना हरताळफासून सत्ता मिळवायची ही काँग्रेसची पद्धत. 
- नैतिकतेचा टेंभा मिरविणाऱ्या भाजपने फोडाफाडी इतक्‍या लवकर अंगीकारली हे दुःख. 
- महाराष्ट्रातही दोन्ही काँग्रेस फोडून नेते आयात करण्याचा धडाका लावलाय. 
- कर्नाटकातील बंडखोरांची जिवाची मुंबई साधनशुचितेचे अवडंबर माजविणाऱ्या भाजप नेत्यांनी केली. 

बसपचे संस्थापक कांशीराम म्हणूनच म्हणायचे की, देशात अस्थिर राजकारण हवे. आघाडीचे सरकार हवे. कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत नसावे. केंद्रस्थानी असलेल्या पक्षांवर मित्रपक्षांचा अंकुश असेल, तरच ते सरळ राजकारण करू शकतात. कांशीराम यांचे मत बहुसंख्य लोकांना पटणारे नसले तरी भारतात बहुमताने सत्तेवर असलेले पक्ष इतरांना जुमानत नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.बहुमतामुळे विरोधकांचा आवाज दाबण्याचे प्रयोग सतत केले जातात आज तेच होताना दिसत आहे.

इतर ब्लॉग्स