सामान्य माणसांच्या आवाजाचा सन्मान...

धनंजय बिजले
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

तथ्यांच्या आधारे चुकांवर अचूक बोट ठेवणे हे रवीश कुमार यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या याच गुणांमुळे कोट्यवधी भारतीयांना ते आपलेसे वाटतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार भारतीय पत्रकारांना नव्हे तर सर्वांनाच दीपस्तंभाप्रमाणे वाट दाखविणारा आहे...

अगर आप लोगोंकी आवाज बन गये है, तो आप पत्रकार है...अशा अगदी साध्या सोप्या शब्दांत रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने रवीश कुमार यांची आज साऱ्या जगाला नव्याने ओळख करून दिली. देशभरातील सामान्यांचा आवाज बनलेल्या रवीश कुमार यांना आज आशियाचा नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. 

अवघ्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत ज्यावेळी सारे न्यूज चॅनेल वाराणसीतील पंतप्रधान मोदींचा रोड शो दिवसभर लाईव्ह करण्यासाठी अटापिटा करीत होते, त्यावेळी एनडीटीव्हीचे रवीश कुमार मात्र दिल्लीतील बेरोजगार तरूणांच्या मुलाखती घेण्यात व्यग्र होते. त्यांच्या मुलभूत समस्या ते मांडू पहात होते. सारे चॅनेल टीआरपीसाठी भारत – पाकिस्तान संबंध, बालाकोट, राम मंदिर अशा प्रश्नांवर ज्यावेळी तावाताने चर्चा घडवून आणत होते. त्यावेळी रवीश कुमार मात्र शांतपणे बेरोजगारी, नदी प्रदूषण, झोपडपट्टीतील प्रश्न, वाहतुक समस्या, पर्यावरणाची समस्या, महागाई अशा सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आवाज उठवत होते. भलेही त्यांचा आवाज क्षीण होता पण एकांड्या शिलेदाराप्रमाणे ते पत्रकारितेच्या मूलतत्वाला जागून काम करीत होते. त्यांच्या या कामाची पोचपावती आज या पुरस्काराने रवीश कुमार यांना मिळाली आहे. 

ravish kumar

खरे पाहिल्यास या आधीही सहा भारतीय पत्रकारांना हा सन्मान लाभला आहे. त्यात अमिताभ चौधरी, बी. जी. वर्गीस, अरूण शौरी, आर. के. लक्ष्मण यांचा समावेश आहे. मात्र रवीश कुमार यांच्या पुरस्काराचे महत्व काही वेगळेच आहे. तब्बल बारा वर्षांनंतर एखाद्या भारतीय पत्रकाराला हा मानाचा सन्मान पुन्हा मिळाला आहे. पी. साईनाथ यांना 2007 मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर कोणत्याही भारतीय पत्रकाराला हा पुरस्कार लाभलेला नव्हता. 

या बारा वर्षांत भारतीय पत्रकारितेला बऱ्याच स्थित्यंतरला सामोरे जावे लागले आहे. या काळात देशभरात जन्माला आलेल्या शेकडो चॅनेल्सनी टीआरपीच्या नावाखाली पत्रकारितेच्या मूळ धर्मालाच हरताळ फासल्याचे चित्र सर्वत्र उभे राहिले होते. लोकांचे मुलभूत प्रश्न टीव्ही च्या पडद्यावरून पूर्ण गायब झाले होते. तसेच सारी पत्रकारिता कोणा एका पक्षासाठी किंवा नेत्याच्या दावणीला बांधल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा काळात स्टीक टू द बेसिक या तत्वाप्रमाणे रवीश कुमार यांनी लोकांचे मुलभूत प्रश्न मांडून सत्ताधाऱ्यांना सातत्याने सवाल केले. त्यांनी केवळ भाजप, काँग्रेस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली नाही तर टीआरपीच्या नावाखाली पत्रकारतेचा मूळ रस्ता सोडलेल्या चॅनेल्सनाही सोडले नाही. गेल्या पाच सात वर्षांत एक भूमिका घेऊन त्यांनी कार्यक्रम सादर केले. आपल्या ब्लॅगमधून सत्ताधाऱ्यांना सतत सवाल केले. मी प्रश्न विचारणारच, कारण माझे ते कामच आहे अशी त्यांची साधी धारणा होती. पण त्यावरूनही त्यांना प्रचंड टीकेचे धनी व्हावे लागले. ट्रोलिंगला कंटाळून अखेर त्यांना ब्लाग लेखन थांबवावे लागले. पण टीव्ही शो मधून त्यांनी आपली भूमिका सातत्याने मांडली आणि सत्ताधारी पक्षाच्या चुकांवर बोट ठेवले. 

रवीश कुमार यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही मुद्दा आकडेवारीनिशी व शांतपणे मांडण्याची त्यांची हातोटी. टीका करताना किंवा मुद्दा मांडताना प्रत्येक वेळी आक्रस्ताळेपणा किंवा आक्रमकताच हवी अशातला भाग नाही. शांत व संयतपणेही टीका करता येते हे रवीश कुमार यांनी दाखवून दिले. तथ्यांच्या आधारे चुकांवर अचूक बोट ठेवणे हे रवीश कुमार यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या याच गुणांमुळे कोट्यवधी भारतीयांना ते आपलेसे वाटतात. त्यांना मिळालेला हा पुरस्कार भारतीय पत्रकारांना नव्हे तर सर्वांनाच दीपस्तंभाप्रमाणे वाट दाखविणारा आहे...

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या