रविश कुमार : 'खानाबदोश' माणसाची कहाणी मांडणारा पत्रकार

गिरीश लता पंढरीनाथ
Friday, 2 August 2019

जंतर-मंतर हे बहुतेक रविश यांचं आवडतं बीट असावं. पुढे याच ठिकाणी आमच्या अनेकदा भेटी झाल्या. रविश यांच्यासोबतच्या भेटींचा अनुभव समृद्ध करणारा असायचा. आपलं इंग्रजी फार उत्तम नाही, याचा जराही गंड न बाळगता आपल्याला जे येतं, ते अधिक प्रभावीपणे मांडण्याची आपली स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली होती.

एनडीटीव्हीचे रविश कुमार यांना आशियाचा नोबेल मानला जाणारा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे एका चांगल्या माणसाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याचे समाधान लाभले. रविश पत्रकारांच्या त्या पिढीतील आहेत, ज्यांनी भारतीय प्रसारमाध्यमांचा जन्म, बाल्यावस्था अनुभवली आहे. माध्यमांच्या क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या प्रणय रॉय यांनी एनडीटीव्ही ग्रुपची स्थापना केली, तेव्हापासून रविश या संस्थेत कार्यरत आहेत. त्यांनी या संस्थेत माध्यमांतील तंत्राची क्रांती अनुभवली आहे. अगदी पत्रांची नोंद करुन त्यांचे वर्गीकरण करण्यापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. या पत्रांचे व्यवस्थित वाचन करुन ती पुढे पाठविणे हे त्यांचं काम... पुढे जेंव्हा ते फिल्डवर उतरले, तेव्हा त्यांच्यातील बातमीदाराचे दर्शन जगाला घडले.

दिल्लीच्या जंतरमंतरवर स्वतंत्र तेलंगणाचे आंदोलन जोरात असताना एनडीटीव्हीचा एक पत्रकार ते कव्हर करण्यासाठी आला होता. त्यावेळी माझ्यासोबत असणाऱ्या एका उत्तर भारतीय पत्रकाराला हे कोण असं विचारताच, त्यानं त्याचं नाव रविश असल्याचं सांगितलं. नंतर आम्ही तिघांनी मिळून तिथंच एका ठेल्यावर चहा घेतला. त्या छोट्या भेटीतच हे पाणी खूपच गहिरं असल्याचं जाणवलं. अगदी साध्या पण प्रभावी भाषेत रविश तेलंगणाची कहाणी सांगत होते. टिव्ही पत्रकाराच्या नजरेतून आंदोलनं कव्हर करण्याची एक वेगळी नजर रविश यांच्या भेटीतून डेव्हलप होत गेली. 

जंतर-मंतर हे बहुतेक रविश यांचं आवडतं बीट असावं. पुढे याच ठिकाणी आमच्या अनेकदा भेटी झाल्या. रविश यांच्यासोबतच्या भेटींचा अनुभव समृद्ध करणारा असायचा. आपलं इंग्रजी फार उत्तम नाही, याचा जराही गंड न बाळगता आपल्याला जे येतं, ते अधिक प्रभावीपणे मांडण्याची आपली स्वतंत्र शैली त्यांनी विकसित केली होती. माध्यमांच्या प्रचंड कोलाहलात रविश यांचं वेगळेपण उठून दिसतं ते याचमुळे... एक दिवस चॅनेल सर्फ करीत असताना 'रवीश की रिपोर्ट' नावाचा कार्यक्रम पाहण्यात आला. या कार्यक्रमात रविश दाखवित असणारी दिल्ली माझ्यासाठी अनोळखी होती. खरंतर ती फक्त दिल्लीची कहाणी नव्हतीच, ती प्रत्येक शहराची कहाणी होती. रविशना भेटणारी माणसं प्रत्येक शहरात प्रत्येकाला भेटणारी, अवतीभोवती वावरणारी... रविशच्या रिपोर्टचा विषय ही साधी माणसं होती.

देशाचा आम-आदमी शहरांत कशा पद्धतीने राहतो? रोजीरोटीच्या शोधार्थ आलेला 'खानाबदोश' माणसाची कहाणी रविश ज्या पद्धतीने मांडत होते, ते अफलातून होतं. रविशना मैगसेसे पुरस्कार मिळणं हे त्या स्वतःचा आवाज नसणाऱ्या, पण जाणिवा जीवंत असणाऱ्या खानाबदोश आम-आदमीचा गौरव आहे असं मला वाटतं.

इतर ब्लॉग्स