संस्‍कृती नागपूजनाची

बंगळुरू येथील नागमूर्ती. या चित्तवेधक मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात.
बंगळुरू येथील नागमूर्ती. या चित्तवेधक मूर्ती पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत असतात.

‘आवास’ रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अलिबाग शहरापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावरील नयनरम्य स्थळ. मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या रेवस, मांडवा या ठिकाणांपासून अगदी लागूनच. या स्थळाचा उल्लेख अगदी स्कंद पुराणातही आहे. अभिजित नावाचा शिवपूजक राजा येथेच स्थायिक झाला होता. या परिसरात श्री वक्रतुंड गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला श्री नागेश्वराच्या म्हणजेच नागोबाच्या जत्रेत या वक्रतुंडाचाही छबिना उत्सव साजरा होतो. प्राचीन काळी इथे नागोबा आणि त्यांचे शिष्य बुधोबा व चांगोबा यांनी समाधी घेतल्याचे सांगितले जाते. या साधूंची स्मृती ‘नागोबा मंदिराने’ जपली आहे. मंदिरात एक जोडी आणि एक स्वतंत्र अशा नागांच्या तीन सुंदर प्रतिमा आहेत. या मंदिराबरोबरच जवळच्या कनकेश्वर मंदिराचाही नागाशी संबंध आहे. कनकेश्वराकडे जाताना उंच डोंगरावर एक विश्रांतीचा टप्पा आहे. दगडी ओटे असलेल्या या टप्प्याला ‘नागोबाचा टप्पा’ म्हणतात. नागपंचमीला बाजूच्या घळीतून नागोबा निघतो, अशी आख्यायिका आहे. खरंतर अशा कथा आपल्या परिसराला नवीन नाहीत. अनेक ठिकाणी थोड्याफार फरकाने ‘नागोबा’च्या आख्यायिका सांगितल्या जातात. सर्प प्रजातीला शेषाचे रूप समजून पुजण्याची प्रथा पूर्वापार चालू आहे. हे नागपूजन प्रतिकात्मक रूपात केले जाते. यातूनच नागशिल्पांची निर्मिती झाली.

केवळ रायगडच नव्हे तर संपूर्ण भारतात नागपूजन होत असते. सध्याच्या काळात जसा नागपंचमी हा सण साजरा होतो, तसा प्राचीन काळात नागांचा उत्सव ‘नागमह’ नावाने साजरा होत असे. हजारो वर्षांत नागपूजेचे केवळ स्वरूप बदलत आले; पण मूळ गाभा तसाच आहे. यक्षपूजेप्रमाणेच नागपूजेचाही हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांशी समन्वय दिसून येतो. नागांना या धर्मांत उपदेवतांची स्थाने मिळाली. मथुरेजवळील सोंख येथे डॉ. हर्बट हर्टल यांनी जे उत्खनन केले, त्यात तेथे कुषाणकाळातील म्हणजे अंदाजे दुसऱ्या शतकातील एक सुंदर नागमंदिर असल्याचा पुरावा हाती आला. हे नागमंदिर विटांचे असून अर्ध-लंबवर्तुळाकार होते. याच परिसरातून अप्रतिम कलाकृती असलेली नागशिल्पेही आढळली. यावरून मथुरा हे कुषाण काळात नागपूजेचे एक मोठे केंद्र असल्याचे सांगता येईल. या काळातील सुरुवातीच्या मूर्तींमध्ये मानवी रूपातील नाग दाखवून त्याच्या पाठीमागे सर्पाची वेटोळी किंवा उभा साप दाखवला जात असे. फर्ग्युसन आणि ओल्डहॅम या तज्ज्ञांच्या मते हे नाग म्हणजे सर्पपूजक मानव असावेत. 

सर्प हे त्यांचे वंशचिन्ह.  पुढे हेच मानव नाग किंवा सापाशी तादात्म्य पावले. नागाशी संबंध असलेल्या देवांना मानव रूपांसह नागरूपांत दाखविण्याची पद्धत इसविसनाच्या आधीपासूनच होती. सांची, अमरावती या ठिकाणच्या बऱ्याचशा मूर्त्यांमध्ये नाग किंवा सर्पफणा असलेल्या स्त्रिया आढळतात. या सापाचा फणा छत्रासारखा डोक्‍यावर उभारलेला असायचा. यातील डोक्‍यावरील सर्प फणांची संख्या त्या पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या सामाजिक हुद्द्यावर अवलंबून होती. या रचनांमध्ये कालांतराने बदल होऊन मानव प्रतिमांच्या मागे सर्पफणा दाखवण्याऐवजी मानवाचे मुखच सर्पाफण्याचे दाखवण्याची पद्धत सुरू झाली. या नागांच्या शरीरावर खवले दाखवणे, मस्तकावर स्वस्तिक किंवा इतर शुभचिन्हे दाखवणे इत्यादी प्रकारही होते. या नागांच्या सळसळत्या जिभाही काही प्रतिमांमध्ये अंकीत केल्या गेल्या आहेत. कुषाणकाळानंतर मात्र नागप्रतिमांमध्ये जुनी वैशिष्ट्ये नाहीशी झाली. पुढच्या काळात वेटोळे घातलेला नैसर्गिक साप सर्वत्र दिसू लागला. याचबरोबर एकाच दगडावर कोरलेले नाग-नागीण शिल्पही तयार होऊ लागले. 

अंबरनाथ येथील सुप्रसिद्ध शिवमंदिराबाहेरच्या बाजूला नदीकाठावर असे शिल्प आहे. या प्रकाराला दक्षिणेत ‘नाग-कल’ म्हणतात. या प्रतिमांमध्ये सध्या आढळणारा सर्वसामान्य प्रकार म्हणजे उभा साप. आवासच्या नागोबा मंदिरातील प्रतिमा याच स्वरूपाच्या आहेत. रायगड किल्ल्यावरील बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या वास्तूवरही असाच एक उभा साप कोरला आहे. नागांचा पाण्याशी जवळचा संबंध असतो. त्यामुळे बऱ्याचशा नागमूर्त्या पुष्करणींच्या किंवा तलावांच्या काठावर आढळतात. 

नाग हे पूजनीय असले तरी काही पौराणिक कथांमध्ये नागांशी संघर्ष सुद्धा झाल्याचे दिसते. श्रीकृष्णाने केलेले कालियामर्दन हे याच संघर्षाचे उदाहरण. भगवान विष्णूचे वाहन गरूड व नागांचे वैर, तक्षकाचा परीक्षिताशी संबंध, जन्मेजयाचा नागयज्ञ व त्यात नागांचा संहार अशी संघर्षांची अनेक उदाहरणे आढळतात. केवळ हिंदू कथांमध्येच नव्हे, तर बौद्ध व जैन कथांतही असे प्रसंग आहेत. असे असूनही शिव, गणेश यांसारख्या देवतांसह त्यांनी धारण केलेल्या नागांनाही सन्मान मिळाला आहे.

सुदैवाने नागांचे पूजन अजूनतरी प्रतिमा रूपातच मर्यादित आहे. नागपूजनाच्या पद्धतीविषयक संत कबीर म्हणतात,
नागपंचमी आवे जदे, कोले नाग माँडती,
दूध दही से पूजती।
साँची को नाग सामें मिल जावे तो,
पूजा फेंकी ने भाग जाती रे।।

थोडक्‍यात, माणसे पूजेसाठी नागाची मूर्ती मांडतात खरे, पण खरा नाग आल्यावर मात्र पळत सुटतात. त्यामुळे केवळ प्रतिमाच नव्हे तर जीवसृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सापांचेही रक्षण व्हावे ही अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com