कोल्हापुरात हुंदके...

सम्राट फडणीस
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मध्यरात्रीपासून समजतंय ते फार भयानक आहे. फार भयानक... पूर ओसरल्यानंतर हज्जारो संसार उभे करावे लागणार आहेत... हज्जारो...

कोल्हापुरात भीषण परिस्थिती आहे. पंचगंगेचा असा भयानक महापूर माहितीतल्या कोणी उभ्या जन्मात पाहिला नव्हता. साऱयांचे सारे अंदाज पाण्यात बुडालेत. हज्जारो लोकं घरंदारं सोडून जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हलताहेत. 'काय नाय भावा. काय प्रॉब्लेम न्हाई. असतंय की कायम. टेन्शन नको घिवू...', काल संध्याकाळी फोनवर दिलासा मिळत होता... मध्यरात्रीपासून तिथं हुंदके आहेत... आवाज खोल गेलेयत... आता फोनही बंद आहेत... बॅटरी संपलीय... लाईट नाहीय... दुध-प्यायचं पाणी... काही काही नाहीय.

आमची परीट गल्ली प्राचीन मानावी इतकी जुनी. नदीकाठापासून 300-400 मीटरवरची. उंचावरची... गल्लीच्या तोंडावर पाणी आलं की महापूर झाला समजायचं. आज गल्लीतल्या 70 टक्के घरांमध्ये पाणी घुसलंय. घरं कशीबशी पाण्यात उभी आहेत. फोनवर सांगणाऱयाचा आवाज कापत होता...

व्हिनस कॉर्नरच्या चौकाजवळ मित्राची लाँड्री पाण्यात बुडाल्याचा व्हिडिओ आत्ता आला. लाँड्रीची पाटी फक्त दिसतेय. तिथं बोटीतून 6-8 लोकांना बाहेर काढत होते. बोट उलटली. कोणी इन्नर घेऊन पोहत आले. बुडत असलेल्यांना बाहेर काढलं गेलं...

क्षणीक्षणी धस्स व्हायला होतंय. अजून काय होणाराय...?

लगतच्या प्रयाग चिखली, आंबेवाडीत काय झालं असेल, कल्पना करवत नाहीय. एनडीआरएफच्या चार-सहा बोटी आहेत, असं सांगताहेत. या दोन गावांमध्ये मिळून किमान 8 हजार लोकांचा जीव आत्ता या क्षणी धोक्यात आहे. या गावांनी आजपर्यंतचा प्रत्येक महापूर पचवलाय. यावेळचा हा महापूर भीषण आहे. इतका अंदाज कुणालाच आलेला नसणाराय. गावातल्या माणसांचं, जनावरांचं काय झालंय समजेना.

कोल्हापूर शहरातल्या नागाळा पार्कात पुरात अडकलेल्या एका घरात महिलेला हार्ट अॅटॅक आलाय. तिच्या सुटकेसाठी काही प्रयत्न चाललेयत. असे मेसेज कुठून कुठून येताहेत. प्रयाग चिखली, आंबेवाडीतलं काहीच समजेना. काल रात्रीपासून...

शिरोळ तालुक्यातली परिस्थिती कोल्हापूर शहरापेक्षा भयानक असणार आहे. संपर्क तुटलाय कित्येक गावांचा. तिथंही पाण्याचे स्थानिक अंदाज चुकले असणार आहेत. गावंच्या गावं कुठं आहेत समजेना झालंय. नृसिंहवाडीत पंचगंगा, कृष्णा संगम. गाव रिकाम झालंय परवाच. कुणी हट्टानं राहिला असेल, तर त्याचं काही समजायला मार्ग नाही. काल रात्री उशीरापर्यंत अपडेट येत होती...कोणी ना कोणी कळवत होतं...पहाटेपासून हळू हळू कमी होत गेलेयत सगळ्यांचे मेसेज...मोबाईल बंद पडताहेत...

कोल्हापूरचं कलेक्टर ऑफिस पाण्यात आहे. सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. 1989 चा महापूर आतापर्यंतचा सर्वात भीषण होता...तेव्हाही अशी परिस्थिती नव्हती. मोबाईल नव्हते; पण तरीही कुठं काही वावगं घडत नव्हतं. 2005 ला स्मार्टफोन नव्हते. परिस्थिती अवघड होती. पण, कंट्रोलमध्ये राहिलेली.

मध्यरात्रीपासून समजतंय ते फार भयानक आहे. फार भयानक... पूर ओसरल्यानंतर हज्जारो संसार उभे करावे लागणार आहेत... हज्जारो...

इतर ब्लॉग्स