शहराबाहेर अडकलेल्या पूरग्रस्तांची व्यथा

sangli
sangli

माझं गाव ६०-७० टक्के बुडालेय. जवळपास ४०० कुटुंब सुरक्षित स्थळी हलवली आहेत. माझ्या घराच्या मागच्या भिंतीला आणि एका बाजूला कमरेपर्यंत पाणी आले होते. ते आता तीन फुटांनी मागे सरलेय. पुर ओसरतोय त्यामुळे आता फारशी चिंता नाही. गावातील काही कुटुंबे आमच्या घरी वास्तव्यास आल्याने पुरस्थिती गंभीर होत असताना आपल्या घरच्यांनी तिथून निघावे, यासाठी जास्त आग्रही देखील करु शकत नव्हतो.

गावातील पर्वतवाडी, मगदुमी, गायकवाड मळा, पवार मळा या वस्त्यांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. काही घरात पाणी गेले आहे. आधीच तेथील लोक जनावरांसह गावातील जिल्हा परिषद शाळा, बाजीराव पाटील सभागृहात रहायला आली आहेत. इतरही ठिकाणी व्यवस्था केलीय. तसेच भोपळे गल्ली, सुतारनेट, रामबापुचे दुकान येथील पाणी हटले आहे. सद्यस्थितीत गुरव गल्ली, परीट गल्ली, सुतार गल्ली, उपाशे गल्ली, कुंभार गल्लीसह गुजरवटीचा भाग नव्हे तर, काहींची अख्खी घरे पाण्याखाली आहेत.

गावात पाणी वाढत असताना बहुतांश घरातील तरुण शिल्लक होते. लाईट सतत जायची, जिथे भेटेल तिथून मोबाईल चार्जिंग करायचे. त्यातही उत्सुकतेने व्हिडिओ कॉलद्वारे सारे चित्र दाखवायचे. व्हिडिओ पाठवायचे. आता पाणी मागे चाललेय तसे पुन्हा मदतकार्य सुरु झालेय. कोणीच फोन उचलत नाही. परिस्थिती काहीच कळत नाही. इकडे औरंगाबाद मध्ये असून नसल्यासारखे वावरतोय. सांगली, कोल्हापूरच्या लोकांना मदतीसाठी फोन, मेसेज येतायत. माझेही मन इकडं रमत नाही.

आमचे ऐतवडे खुर्द हे गाव वारणा नदीच्या काठावर आहे. अलीकडे कृष्णा नदीच्या काठावर म्हणजे किर्लोस्करवाडीजवळ संतगावात बहिण दिलीय. तिचं अख्खं घर बुडालेय. तर पलीकडे पंचगंगेच्या काठावर असलेल्या आणि कोल्हापूरच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शिंगणापूरात माझी आत्ती आहे. तिचेही अख्खे घर बुडालेय. लहान मुलांसह दोघांची कुटुंब १०-१५ जणांची आहेत. तिघे-चौघे असे करत वेगवेगळ्या गावी रहायला गेली आहेत. त्यामुळे चिंता नव्हती. दाजींचे भाऊ गावात होते. पाणी कमी होत असल्याने त्यांचीही भिती आता नाही.

गावाकडून आत्तीच्या गावाला जाताना वाटेत प्रयाग चिखली लागते, ज्या वाटेने आम्ही नेहमी जातो, त्याठिकाणी काल बोटी फिरत होत्या. घराच्या दुसऱ्या मजल्यावर लोक अडकले होते. तसेच कालची ब्रह्मनाळची बोट उलटल्याची घटना त्यातही त्या लहान मुलीचा फोटो, व्हिडिओ बघून काहीच सुचेना झालय.
सध्या इथही करमत नाही. पुर वाढत असताना गेलो असतो तर एकतर वाटेत अडकलो असतो किंवा पुर पाहण्याशिवाय काहीच करु शकलो नसतो. पुर ओसरल्यावर जाऊन येईन. आमचे शेतीचे नुकसान झाले असले तरी, व्यक्तीशः त्याचे टेंशन नाही, कारण आजवर जे दिलय, ते याच नद्यांनी आम्हाला दिलय. तेही भरभरुन....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com