विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा उपाय 

- संजय बालगुडे
Wednesday, 28 August 2019

पुण्यातील सर्व मानाच्या गणपती मंडळांचा पूर्ण यथोचित मान राखला पाहिजे, त्याविषयी शंका नाही. परंतु, ज्या मंडळांना अगोदर जाऊन विसर्जन करायचे आहे, त्यांना त्वरित परवानगी द्यावी. त्यामुळे दोन-दोन दिवस मिरवणुका चालणार नाही. 

पुण्यातील सर्व मानाच्या गणपती मंडळांचा पूर्ण यथोचित मान राखला पाहिजे, त्याविषयी शंका नाही. परंतु, ज्या मंडळांना अगोदर जाऊन विसर्जन करायचे आहे, त्यांना त्वरित परवानगी द्यावी. त्यामुळे दोन-दोन दिवस मिरवणुका चालणार नाही. 

गणेशोत्सवाच्या बैठकांमध्ये 30 ते 40 वर्षे तेच तेच मुद्दे उपस्थित केले जातात. 2000 पासून ध्वनिवर्धकांवरील खटल्याचा विषय प्रत्येक बैठकीत निघतो. उच्च न्यायालयाने 2015 मध्ये राज्यातील महापालिकांना सर्वच उत्सवांबाबत मंडप धोरण तयार करून नियमावली करायला सांगितली होती. ती करताना पुणे महापालिकेने जी समिती केली, त्यात मी सदस्य होतो व सभागृहाने गणपती मंडळांचा कार्यकर्ता म्हणून ते नियम करण्याची जबाबदारी मी व रवी माळवदकर यांच्यावर सोपविली होती. त्याला सभागृहाने सर्व उत्सवांचे प्रमुखांसोबत चर्चा करून मान्यता दिली. त्याची जबाबदारी महापालिका व पोलिस खात्यावर सोपविली आहे, हेसुद्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 

या पार्श्‍वभूमीवर आम्ही एक व्यवहार्य तोडगा सुचवू इच्छितो. मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जन झाल्याशिवाय अन्य मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनाला अनुमती नाही, असा पायंडा कधी आणि कोणी पाडला? या प्रश्‍नात या समस्येचे मूळ दडले आहे. पुण्यातील सर्व मानाच्या गणपती मंडळांचा पूर्ण यथोचित मान राखला पाहिजे, त्याविषयी शंका नाही. परंतु, ज्या मंडळांना अगोदर जाऊन विसर्जन करायचे आहे, त्यांना त्वरित परवानगी द्यावी. मध्य पुण्यातील मुख्य मिरवणूक पूर्वी लक्ष्मी रस्त्यावरून जायची. पुढे मंडळांचे प्रमाण वाढल्यानंतर केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता अशा मार्गानेही मिरवणुका काढण्यास अनुमती दिली गेली. ज्या मंडळांना मानाच्या मंडळांच्या अगोदर विसर्जन करावयाचे आहे, त्यांना परवानगी द्यावी. त्यानुसार या मार्गानेही मंडळांच्या मिरवणुका जातात. पण, कितीही लवकर निघाले, तरी या मंडळांना आपल्या "श्रीं'चे विसर्जन मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्याशिवाय करता येत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने मिरवणूक काढूनही विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ टाळता येत नाही. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरून जाणाऱ्या मंडळांना मानाच्या गणपतींचे विसर्जन होण्याअगोदर विसर्जनाची परवानगी द्यावी. तसेच, अन्य मार्गाने येणाऱ्या मंडळांचे विसर्जन थांबविले जाऊ नये. मानाचे गणपती अलका टॉकीज चौकात येण्याच्या आधीच अन्य रस्त्याने जर काही मंडळे तेथे आली, तर त्यांना बिनदिक्कतपणे विसर्जनाला परवानगी द्यावी. त्यामुळे मिरवणूक लवकर संपायला मदत होऊ शकते. 
 

 

लेखक खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत

इतर ब्लॉग्स