अतिक्रमण कोणाचे? बिबट्या, की माणसाचे!

ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील
रविवार, 8 सप्टेंबर 2019

जंगलात सर्व प्रकारचे प्राणी जगतात. एकमेकांची शिकार करतात. ही निसर्गनिर्मित अन्नसाखळी तोडण्याचे काम होत आहे. ते रोखले पाहिजे. बिबटे पकडून त्यांना कुठेही सोडले, तरी तेथेही त्यांचा उपद्रव होणारच आहे, हे सत्य आहे. त्यामुळे ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत, याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल.

वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत समाजात दोन मतप्रवाह आहेत. माणसांचेच अतिक्रमण जंगलावर झाले, त्यात वन्य प्राण्यांची काय चूक, हा एक मुद्दा आणि दुसरा- वन्य प्राणी थेट गावाजवळील वस्तींवर येऊन हल्ले करतात, त्यात माणसांची काय चूक? घटना घडल्यानंतर, हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झालेल्यांना किरकोळ मदत देऊन वन विभागाकडून बोळवण केली, की संपली त्यांची जबाबदारी. प्रत्यक्षात एखाद्या कुटुंबातील कर्ता जातो, घरची लक्ष्मी सर्वांना उघड्यावर सोडून जाते, एखाद्या बाळाला बिबट्या सहज उचलून नेतो, हे त्या कुटुंबालाच भोगावे लागते. "ज्याचे जळते, त्यालाच कळते,' ही म्हण येथे तंतोतंत लागू व्हावी, अशा हल्ल्याचे गांभीर्य वन विभाग आणि समाजालाही केव्हा येणार, हल्ले टाळण्यासाठीच्या उपाययोजना होणार की नाही, हाच मोठा चर्चेचा मुद्दा आहे.

बिबट्याचे हल्ले धोकादायक
नगर जिल्ह्यातील विशेषतः अकोले, संगमनेर, श्रीरामपूर आदी तालुक्‍यांतील जंगल व उसाच्या पट्ट्यात बिबट्यांचा मोठा उपद्रव आहे. कुरणपूर (ता. श्रीरामपूर) येथे नुकतेच नऊ वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून उसाच्या शेतात नेऊन ठार केले. याच परिसरातील अन्य दोघांवरही हल्ले झाले. ही ताजी घटना. यापूर्वीही अकोले तालुक्‍यात महिलांना, बालकांना बिबट्याने ठार मारल्याची अनेक उदाहरणे आहेत. एखादी व्यक्ती जखमी झाली, तरी रेबीजच्या आजाराचा त्याला धोका असतो. शेतकरी काळजी तरी किती व कशी घेणार? उसाचे मोठे पट्टे सोडून बिबट्या आपल्या भक्ष्याच्या शोधात थेट मानवी वस्तीजवळ येऊन ठाण मांडतो, मग माणसांनी जायचे तरी कुठे? अन्नाच्या शोधात तो भटकतो, हे खरे असले, तरी मानवाच्या ते जिवावर बेतते, हेही दुर्लक्षून चालणार नाही. वन विभागाने योग्य वेळी दखल घेतली, योग्य वेळी पिंजरे लावून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले, तर अशा घटना होणार नाहीत. मात्र, मागणी करूनही संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडत नाहीत, हे विशेष.

रानडुकरांचा पिकांवर डल्ला
अनेक गावांतील शेतकऱ्यांनी मुगाचे पीक घेणे बंद केले आहे. त्याला सर्वांत मोठे कारण म्हणजे रानडुकरे. जंगले वाढली ते चांगलेच आहे; मात्र डुकरांची संख्या मागील पाच-दहा वर्षांत अचानक कशी वाढली, हा संशोधनाचा भाग आहे. विशेषतः नगर, पाथर्डी, श्रीगोंदे, जामखेड आदी तालुक्‍यांत डुकरांचा उपद्रव खूप मोठा आहे. कळप येऊन शेतच फस्त करून टाकतो. ही टोळी मानवाला भीत नाही. कुत्री त्यांना पाहून पळून जातात. त्यांच्यावर उपाययोजना मात्र काहीच करता येत नाहीत. वन विभागाकडे त्यावर उपाय नाही. डुकरांच्या बाबतीत संबंधित अधिकारी हात झटकतात. डुकरांचा बंदोबस्त करणे त्यांच्या अखत्यारीत नसल्याने, या उपद्रवाला कोण रोखणार, हा मोठा प्रश्न आहे. डोंगराच्या बाजूच्या शेतकऱ्यांना ही मोठी डोकेदुखी आहे. मका, ज्वारीचे पीक बहरात आले, की डुकरे तेथे ताव मारतात. त्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर राखण करण्याची गरज पडत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकारदफ्तरी त्यासाठी योग्य तो निर्णय होण्याची नितांत गरज आहे.

वन विभागाने जागरूकता दाखवावी
बिबट्या दिसल्यास ग्रामस्थ प्रथम वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करतात. मागणी करूनही पिंजरे लावले जात नाहीत, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करतात. संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी विविध कारणे देऊन टोलवाटोलवी करतात, दुर्लक्ष करतात, हा बहुतेकांचा अनुभव आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारामध्ये राजकीय लोकही विशेष लक्ष देत नाहीत. अधिकाऱ्यांच्याही काही अडचणी असतील; परंतु शेतकऱ्यांच्या जिवावरच बेतणारा प्रश्न असल्याने अडचणींवर मार्ग काढलाच पाहिजे. पिंजऱ्यांची संख्या, निधीची उपलब्धता, मनुष्यबळ, अशी कारणे अनेकदा पुढे येतात; परंतु ही कारणे दाखवून ती मंडळी मोकळी होते. येथे एखादे कुटुंब उजाड होते, हेही त्यांनी लक्षात घ्यावे.

वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंधने हवीत
वन कायद्यानुसार वन्य प्राण्यांना मारणे किंवा त्यांची शिकार करणे गुन्हा आहे. कायद्याचे पालन करणे सर्वांचेच कर्तव्य आहे. बिबट्यासारख्या प्राण्यांना मारणे ही शेतकरी किंवा कोणत्याही शिकाऱ्याच्या हातची गोष्ट नाही; परंतु बिबट्याचे अन्न असलेली हरणे व तत्सम प्राण्यांची शिकार रोखणे आवश्‍यक आहे. "जीवो जीवस्य जीवनम्‌' या उक्तीप्रमाणे एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असतो. हरीण, ससे आदी प्राणी वन्य प्राण्यांचे भक्ष्य आहेत. त्यामुळे शिकार करून त्यांची संख्या कमी करण्याचे काम मानव करतो. त्यातून वन्य प्राण्यांना मानवी वस्तीकडे वळावे लागते, हीच खरी समस्या आहे. अनेक जंगलांमध्ये हरणांची शिकार होते, प्राण्यांची तस्करी होते. त्यांच्यावर विशेष कारवाई केली जात नाही. लोकांनीच एखाद्याला पकडून दिले, तर वन विभाग पुढे येतो, अन्यथा स्वतःहून जंगलात लक्ष ठेवून कारवाई केल्याची उदाहरणे दुरापास्तच असावीत. अशा शिकाऱ्यांच्या मुसक्‍या आवळल्या पाहिजेत.

जंगलात सर्व प्रकारचे प्राणी जगतात. एकमेकांची शिकार करतात. ही निसर्गनिर्मित अन्नसाखळी तोडण्याचे काम होत आहे. ते रोखले पाहिजे. बिबटे पकडून त्यांना कुठेही सोडले, तरी तेथेही त्यांचा उपद्रव होणारच आहे, हे सत्य आहे. त्यामुळे ते मानवी वस्तीकडे येणार नाहीत, याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरेल.

इतर ब्लॉग्स