'शुद्ध देसी रोमान्स' ते 'वॉर' असा आहे वाणी कपूरचा प्रवास !

स्नेहा गांवकर
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

अभिनेत्री वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिने काही मोजक्‍या हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. वाणी आता 'वॉर' या बिग बजेट चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनबरोबर काम करताना दिसणार आहे. त्यानिमित्त तिच्या प्रवासाविषयी... 

अभिनेत्री वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिने काही मोजक्‍या हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. वाणी आता 'वॉर' या बिग बजेट चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनबरोबर काम करताना दिसणार आहे. त्यानिमित्त तिच्या प्रवासाविषयी... 

मी माझ्या करिअरची सुरुवातच मॉडेलिंगपासून केली. मॉडेलिंग क्षेत्रात असताना मी माझा पहिला चित्रपट केला आणि तो चित्रपट होता "शुद्ध देसी रोमान्स'. यशराज फिल्म्सचा हा चित्रपट होता. या चित्रपटामुळे माझं संपूर्ण आयुष्यच बदललं. मला लहानपणापासूनच चित्रपट पाहण्याची आवड आहे. "चालबाज', "गाईड'; तसेच राज कपूर यांचे चित्रपट हे माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले आहेत. हिंदी चित्रपटांबरोबर मी तेलुगू चित्रपटातही काम केले. यशराज फिल्म्स निर्मित "अहो कल्याणम' या तेलुगू चित्रपटासाठी मी ऑडिशन दिले. त्यांना माझं काम खूपच आवडलं आणि त्यांनी माझी या तेलुगू चित्रपटासाठी निवड केली. 

मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आयुष्यात प्रत्येकालाच स्ट्रगल हा करावाच लागतो. मलाही करावा लागला. अभिनयक्षेत्रात आल्यानंतर मलाही बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. माझा पहिलाच चित्रपट नावाजलेल्या यशराज फिल्म्सचा होता. याचा मला सर्वात मोठा आनंद आहे. करिअरच्या सुरुवातीलाच मला योग्य ती दिशा मिळाली. यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते. 

आज खरे पाहता बॉलीवूडमधील बरेच कलाकार स्टारडम अनुभवत आहेत. एखादा चित्रपटाची कथा फारशी प्रभावी नसली तरी त्या चित्रपटातील कलाकारामुळे तो चित्रपट चालतो. एखाद्या कलाकाराच्या नावावर चित्रपट चालणे हेच कलाकाराचे खरे स्टारडम असते. चित्रपटाची कथाही चित्रपटाचा खरा स्टारडम आहे. एका चित्रपटासाठी संपूर्ण टीम तितकीच महत्त्वाची असते आणि त्या चित्रपटाशी जोडला जाणारी प्रत्येक व्यक्ती तितकीच त्या चित्रपटासाठी जबाबदार असते, असे माझे एकूणच चित्रपटांबाबतचे मत आहे. मी आजवर जे चित्रपट केले त्या चित्रपटांमधील प्रत्येक कलाकाराने मला सांभाळून घेतले. मला उत्तम सहकलाकार मिळत गेले. इंडस्ट्रीमध्ये मी नवीन असतानादेखील मला प्रत्येकाने आपलंस केलं. 
अभिनेता हृतिक रोशनबरोबर मी आता "वॉर' चित्रपट करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हृतिकने मला फार साथ दिली. "वॉर'च्या सेटवर मजा-मस्तीचे वातावरण असायचे. त्यामुळे मला कोणताही सीन करत असताना फारसे दडपण आले नाही. आपल्या आजूबाजूला सकारात्मक माणसं असली की आपण कामही अगदी योग्य पद्धतीने करू शकतो. 
"वॉर'मध्ये मी हृतिकबरोबरच डान्स करतानाही दिसणार आहे. हृतिकचे नृत्यकौशल्य साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्याच्याबरोबर एकत्रित नृत्य करणं माझ्यासाठी विलक्षण अनुभव होता. या चित्रपटाची कथा ऐकताच मी या कथेच्या प्रेमात पडले. या चित्रपटात मी मुख्य भूमिकेत नसले तरी चित्रपटामधील माझी भूमिका तितकीच महत्त्वपूर्ण आहे आणि माझ्यासाठी चित्रपटांमधील माझी भूमिका जरी लहान असली तरी माझ्यासाठी ती नेहमी महत्त्वाची ठरते. 

या चित्रपटात हृतिकसोबत काम करताना खूप काही गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. शिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थने ही मला खूप पाठिंबा दिला. सिद्धार्थ आनंद या दिग्दर्शकाची एक गोष्ट मला नेहमी आवडते. चित्रपट चित्रीकरण करताना सेटवरील वातावरण सिद्धार्थने नेहमी हसत-खेळत ठेवले. त्यामुळे अधिक उत्साहाने काम करण्यासाठी नवी ऊर्जा मला मिळत गेली. सिद्धार्थचा चित्रपटातील प्रत्येक भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन ही खूप वेगळा आहे आणि हे प्रत्येक वेळी त्याच्याशी बोलताना जाणवते. 
सध्या वेबसीरिजचा सगळीकडे बोलबाला आहे. मीही बऱ्याच वेबसीरिज पाहते; मात्र माझे पहिले प्रेम कायम चित्रपट असेल. सध्या तरी वेबसीरिजमध्ये काम करण्याचे ठरवले नाही आहे. "वॉर'शिवाय मी "शमशेरा' या हिंदी चित्रपटात अभिनेता करन मल्होत्रासोबत काम करत आहे. 

इतर ब्लॉग्स