विद्येच्या मंदिरी नको टवाळखोरी

crime
crime
गर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व मुलींसाठी सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या "जिल्हा मराठा'च्या न्यू आर्टस, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज व रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आठ-दहा टारगटांनी मुलीची छेड काढली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. जाब विचारणाऱ्या शिक्षकांना दगडफेक करीत जखमी केले. या घटनेमुळे आता विद्यार्थिनी कुठेच सुरक्षित नसल्याचे दिसते. यातून अनेक नवीन प्रश्‍नही उपस्थित होत आहेत. पोलिसांचे दामिनी पथक काय करते? कोपर्डीसारख्या घटना घडूनही नगर जिल्हा जैसे थे कसा राहिला? पोलिस प्रशासनाने कारवाई केली असेल, पण ती कागदावरच राहिली की काय? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरित आहेत.

शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थिनींची सुरक्षा

महाविद्यालयात विद्यार्थिनींची सुरक्षा कायमच चर्चेचा विषय ठरतो. त्यातही ग्रामीण भागातील अनेक पालक मुलींना महाविद्यालयात पाठविण्याचे टाळतात. बारावीपर्यंत शिक्षण घेतले, की केवळ सुरक्षेच्या कारणावरून मुलींना घरी बसविण्याचा किंवा तिचे लग्न उरकून टाकण्याचा पर्याय ग्रामीण पालकांच्या पुढे येतो. एखाद्या महाविद्यालयात घडलेली घटना अनेक मुलींचे शिक्षण बंद करते. याला आळा घालण्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेतला पाहिजे.
अनेक महाविद्यालयांत प्राचार्य संपूर्ण महाविद्यालयाला राउंड मारतात. त्या काळात विद्यार्थी त्यांच्यासमोर जाण्याचे टाळतात. हाच धाक आता बहुतेक महाविद्यालयांत राहिलेला नाही. टारगटांवर वेळीच कारवाई केल्यास रेसिडेन्शिअलसारखे प्रकार घडणार नाहीत. जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांची ठिकाणे असलेल्या गावांमध्ये हीच अवस्था आहे. कर्जत, पाथर्डी, कोल्हार (ता. राहाता) येथेही अलीकडच्या काळात अशा गंभीर घटना घडल्या. केवळ गुन्हा दाखल करण्याचे धाडस पालकांनी दाखविले नाही. त्यातून तेथील टारगट मोकाट सुटले, इतकेच.

बस प्रवासातील असुरक्षितता
मुलींचे छेडछाडीचे प्रकार प्रवासादरम्यान जास्त होतात. त्याचीच परिणती महाविद्यालयात आल्यानंतर होते. काही मुले खास त्याच गाडीने प्रवास करून महाविद्यालयापर्यंत मुलींचा पिच्छा सोडत नाहीत. एखाद्या मुलीबाबत असा प्रकार झाल्यास ती पालकांना कल्पना देत नाही. कारण पुढील शिक्षण बंद होण्याची तिला भीती असते. बसस्थानकावर पोलिसांची करडी नजर हवी. विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी ज्या बसने ये-जा करतात, अशा बसमध्ये पोलिसांनी जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधायला पाहिजे, तरच टारगटांना जरब बसेल. पोलिसांचा धाक राहिला पाहिजे. छेडछाडीबद्दल एखाद्या मुलीने पोलिसाला कल्पना दिल्यास संबंधित मुलांवर कारवाई झाली पाहिजे, परंतु दुर्दैवाने असे घडत नाही. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ महाविद्यालयाची नाही. पोलिस प्रशासनाचीही तितकीच आहे.

"दामिनी' काय करतेय?
पोलिसांनी दामिनी पथक स्थापन करून महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेत भर घातली. महिला पोलिसांची महाविद्यालय परिसरात साध्या वेशात जाऊन गस्त वाढविली, तर टारगटांना शोधून काढणे फार अवघड नाही. महाविद्यालयाजवळ फिरणाऱ्या टारगट मुलांना "दामिनी'मुळे चांगली जरब बसली होती. मात्र, हे पथक अलीकडच्या काळात केवळ फेरी मारून जाते. नंतर टारगटांना पुन्हा रान मोकळे. त्यातही सध्या हे पथक नियमित महाविद्यालयात जाते का, हा संशोधनाचा विषय आहे. जर पथक नियमित जात असते, तर दगडफेकीसारखा प्रकार घडलाच नसता. कारण टारगटांना एका दिवसात धाडस येत नाही. रोज काही ना काही खोड्या करून ते मुलींना त्रास देत असतात. घटना लहान असल्याने ते पोलिसांपर्यंत जात नाहीत. अशा घटनांना आवर घालण्याचे काम "दामिनी'ने करायला हवे. अनेकदा महाविद्यालयाच्या प्रशासनालाही मर्यादा येतात. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात या पथकाची गस्त सातत्याने हवी. बदनामी होऊ नये, म्हणून महाविद्यालयाचे प्रशासन पोलिसांत अशा घटना जाऊ देत नाहीत. त्याचाच परिणाम दगडफेकीपर्यंत मजल जाण्यापर्यंत होतो. त्यामुळेच प्राचार्य, शिक्षकांनीही छेडछाडीच्या घटनांबाबत अधिक गांभीर्याने विषय हाताळून त्याची कल्पना पोलिसांना देण्याची अत्यंत गरज आहे.

राजकीय गटांचे संघटन नकोच
महाविद्यालयात कोणत्याही राजकीय पक्षाचे गट नको. पक्षाचा युवा कार्यकर्ता म्हणून मिरवत अनेक कार्यकर्ते महाविद्यालयातील वातावरण दूषित करतात. एखाद्या पक्षाच्या विद्यार्थी सेलचा अध्यक्ष म्हणून काम करताना महाविद्यालयात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होतात. त्याचा परिणाम महाविद्यालयावर होतो. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशा पक्षप्रणीत विद्यार्थी संघटनांवर चाप बसवायला हवा. आपण काहीतरी वेगळे करतो, या नावाखाली अनेक असे विद्यार्थी नेते एखाद्या विषयाचा गवगवा करतात. यासाठी राजकीय मंडळींचा हस्तक्षेप कोणत्याच महाविद्यालयात होणार नाही, याची काळजी विद्यापीठ स्तरापासून होण्याची गरज आहे.

शाळाही व्हाव्यात सुरक्षित
जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण भागातील शाळाही असुरक्षित आहेत. गावातील गावगुंडांचा शिक्षकांना त्रास होतो. गावातील राजकारणाचा परिणाम शाळांवर होतो. शाळांभोवतीच्या मोकळ्या जागांमध्ये मद्यपींचा अड्डा असतो. पत्त्याचे डाव चालतात. त्यावर नियंत्रण करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरक्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेनेही ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पालकांनीही यात पुढे येण्याची गरज आहे. समाज काय म्हणेल, याकडे दुर्लक्ष करत आपल्या मुलीची काळजी घ्यायला हवी. मुलींना भक्कम पाठबळ दिले, तरच मुली त्यांना येणाऱ्या अडचणी मनमोकळेपणे मांडू शकतील आणि टारगटांचा बंदोबस्त होईल.

छेडछाड, विनयभंग गुन्ह्याचा आलेख
2015 : 375
2016 : 429
2017 : 452
2018 : 629
2019 : 463 (ऑगस्टपर्यंत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com