Pune Rains : नैसर्गिक प्रवाह मोकळे करा

अभिजित घोरपडे, पर्यावरण अभ्यासक
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

पुण्यात सलग तीन दिवस वादळी पाऊस पडतोय. हा लेख लिहिताना गुरुवारीसुद्धा त्याचे वातावरण आहेच. बुधवारच्या पावसाने पुणे शहराला पार गुडघ्यावर आणले. शहराच्या नियोजनावरचा पडदा वर केला आणि पुण्याच्या नागड्या व ओंगळ चित्राचे दर्शन झाले.

पुण्यात सलग तीन दिवस वादळी पाऊस पडतोय. हा लेख लिहिताना गुरुवारीसुद्धा त्याचे वातावरण आहेच. बुधवारच्या पावसाने पुणे शहराला पार गुडघ्यावर आणले. शहराच्या नियोजनावरचा पडदा वर केला आणि पुण्याच्या नागड्या व ओंगळ चित्राचे दर्शन झाले.

पुणे शहरातून बहुतांश रस्त्यांवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास आणि त्यानंतर मध्यरात्रओलांडली तरी हाहाकार सुरू होता. सिंहगड रस्ता, कर्वे पुतळा-वारजे यादरम्यानचा रस्ता, बावधन-पाषाण रस्ता, बाणेर रस्त्याचा काही भाग आणि अनेक रस्त्यांवर ही परिस्थिती होती. धो-धो कोसळणारा पाऊस, रस्त्यांवर साचणारे पाणी, वाहनांच्या धूर सोडणाऱ्या एक्‍झॉस्ट पाइपपर्यंत पाणी पोचण्याची धास्ती, या गदारोळात अडकलेले हजारोपुणेकर कुठे जायचे-काय करायचे, हे समजत नसल्याने भांबावले होते. या साऱ्यात प्रकर्षाने दिसले ते पाणी वाहून जायला वाटच नव्हती.

पावसाची पार्श्वभूमी
पुण्यात यंदा सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला आहे. हे या वर्षीचे वेगळेपण आहेच; पण दरवर्षीच मोसमीपावसाच्या आगमनापूर्वी आणि तो माघारी परतताना वादळी पाऊस पडतो. सर्वाधिक हानी होते ती याचपावसामुळे. २००९ मध्ये आणि त्यानंतर चार ऑक्‍टोबर २०१० या दिवशी पडलेल्या विक्रमी पावसाने पुण्याला लोळवले होते. त्याचे उदाहरण म्हणजे, महापालिका आयुक्तांचे मॉडेल कॉलनीतील घर पाच फूट पाण्यात होते. यापुढेही असा पाऊस पडणार आहे. आता हवामानबदलाचा संदर्भ वाढत असल्याने त्याची तीव्रता अधिक वाढण्याचा धोका आहे.

पुण्यात झालेले बदल
पुण्यातील बहुतांश लहान ओढे-नाले बुजविले गेले आहेत. मोठ्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. विशेषत: उपनगरांमध्ये पाणी वाहून जाणारे मार्ग उरलेलेच नाहीत. ते कशासाठी हवेत, हे अशा वादळी पावसाच्या वेळी समजते. सिंहगड रस्त्याचे उदाहरण द्यायचे तर या रस्त्याच्या दक्षिणेला टेकडीवजा उंच प्रदेश आहे. तिथे पडणारे पाणी वाहून नदीच्या दिशेने जाते. ते जाताना सिंहगड रस्त्याला छेदून जाते. ते वाहून जाण्यासाठी पूर्वी नैसर्गिक प्रवाह होते. आता हे सर्व मार्ग अडवले गेले आहेत. तिथे इमारती, वस्त्या किंवा इतर बांधकामे झाली आहेत. जमिनीचे काँक्रिटीकरणही मोठ्या प्रमाणात झाले आहे.

या आपत्तीचे सर्वांत प्रमुख कारण होते ते पावसाचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था म्हणजेच मार्गच नसणे. हा शहराच्या नियोजनातील  अक्षम्य व धक्कादायक दोष आहे. मंगळवारच्या हाहाकारानंतर सिंहगड रस्त्याची मुद्दाम प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावर पावसाचे पाणी  वाहून जाण्यासाठी उघडे किंवा भुयारी असे मार्गच नाहीतच. हीच स्थिती बहुतांश रस्त्यांवर आहे. पुण्याचे कारभारी, नियोजनकर्ते या प्रश्नांनामुळापासून भिडत नाहीत, तोवर हा गुंता आणखीनच वाढण्याचा धोका आहे. दशकापूर्वी पुण्यातील नैसर्गिक प्रवाहांचे सर्वेक्षण झाले होते. त्याचा अहवालही वाजतगाजत बाहेर आला; पण पुढे काय झाले? बेकायदेशीरपणे वाढलेल्या व वाढणाऱ्या उपनगरांना आवरावे लागणार आहे; नाहीतर पुण्याची आणखी वाताहत व्हायला पुढील काही वर्षे पुरतील. यावर कारभाऱ्यांनी काही केले नाही, तर आपण नागरिक म्हणून या गोष्टींसाठी दबाव टाकला पाहिजे. अन्यथा, पुण्याची मुंबई व्हायला फार वेळ लागणार नाही.

इतर ब्लॉग्स