Happy Birthday Lata Mangeshkar : लतादीदींच्या सप्तसूरांचा झोपाळा!

टीम ई-सकाळ
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

लेकर सुहाने सपनों की कलियाँ, सपनों की कलियाँ
आके बसा दे पलकों की गलियाँ, पलकों की गलियाँ
पलकों की छोटी सी गलियन में
निंदिया आजा री आजा, धीरे से आजा

धीरे से आजा री अखियन में
ते वर्ष होते १९९०चे. माझे बी.एस्सी. झाल्यावर मला एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला तो धुळे येथील एस.एस.व्ही.पी. कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर हॉस्टेलला राहणे आलेच. दिवसा तासिका आणि प्रात्याक्षिके यात वेळ कसा जायचा ते कळत नसे; पण रात्री आईची खूप आठवण यायची. एके रात्री अभ्यास करत असताना शेजारच्या खोलीमधून रेडिओवरील सूर कानावर येऊ लागले. ‘धीरे से आजा री अखियन में, निंदिया आजा री आजा धीरेसे आजा.’ त्या करुण आणि वात्सल्याने ओतप्रोत आवाजाने मी कधी नकळत उठलो आणि त्या खोलीच्या दरवाजात उभा राहिलो मला कळले नाही.  
लेकर सुहाने सपनों की कलियाँ, सपनों की कलियाँ
आके बसा दे पलकों की गलियाँ, पलकों की गलियाँ
पलकों की छोटी सी गलियन में
निंदिया आजा री आजा, धीरे से आजा
राजेंद्रकृष्ण यांच्या या अप्रतिम लोरीला महान संगीतकार सी. रामचंद्र यांनी स्वरसाज चढवलाय. या गाण्याने मला माझ्या आईची आठवण आणली आणि माझ्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. माझी ती अवस्था पाहून मला माझ्या मित्रांनी सावरले आणि खूप धीर दिला. आजही जेव्हा हे गाणे मी ऐकतो, तेव्हा मला हॉस्टेलचे ते दिवस आठवतात. 
- प्रा. जयसिंग गाडेकर, ता. जुन्नर, जि. पुणे 

--------------------------------------------------

'तू ही भरोसा'
मला माझ्या दहावीच्या परीक्षेच्यावेळी नैराश्‍य आले होते. परीक्षा चार दिवसांवर आली होती आणि मी पुस्तक पाहिले, तर सर्व डोक्‍यावरून जात होते. पूर्ण दिवस फक्त आणि फक्त रडण्यात घालवला. एकीकडे अपेक्षांचा डोंगर, तर दुसरीकडे न उमजणारी पुस्तके, मी पत्त्यासारखा कोसळलो होतो. शेवटी बरं वाटावं म्हणून मी यूट्यूबवर गाणे ऐकायला सुरवात केली. लतादीदींच्या एका गाण्याने मला अक्षरशः नैराश्‍यातून बाहेर आणले. ते गाणे म्हणजे, ‘एक तू ही भरोसा, एक तू ही सहारा’, तेव्हा कमीत कमी वीस वेळा ऐकले असेल आणि मला मार्गही यूट्यूबवरूनच सापडला. माझ्या हातात दोन दिवस होते. मी पुस्तकातले पाठ यूट्यूब वरून शिकण्यास सुरवात केली व थोडाथोडका का होईना, माझा त्या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला. मी दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालो. आता मी वेळेच्यावेळी अभ्यास करण्याची सवयही लावून घेतलीय. 
- हर्षवर्धन विसपुते, अमळनेर

​--------------------------------------------------

'लग जा गले'
लतादीदींच्या या दोन गाण्यांनी माझ्या मनात नेहमीसाठी घर करून ठेवलं आहे. या गाण्यांचे बोल कानावर पडताच मला माझ्या लहान बहिणीची आठवण येते. ती आज या जगात नाहीये. आज तिला जाऊन सात वर्षे झालीत. ही आठवण ती दवाखान्यात होती त्यावेळची आहे. ते तिचे शेवटचे दिवस... आम्ही रात्रभर बालपणीच्या आठवणी काढल्या आणि असे करत ती रात्र संपली. दुसऱ्या दिवशी मी घराकडे निघाले; पण काय माहिती कसं, माझ्या तोंडातून अचानक ‘लग जा गले’ हे गाणं निघालं. मी कसंबसं स्वतःला आवरलं, पण बसमध्ये जाताना ‘दो पल का था ख्वाबों का कारवाँ’ हे गाणं माझ्या कानांमध्ये नुसतं ऐकू येत होतं. सलग सात दिवस ही दोन्ही गाणी मला ऐकू येत होती आणि आठव्या दिवशी माझी बहीण गेल्याचा निरोप आला, पण खरंच लतादीदींच्या या दोन गाण्यांमुळे मला नेहमी माझी बहीण माझ्यासोबत आहे असे वाटते. 
- संजीवनी स. लवंगे, परतवाडा, अमरावती

​--------------------------------------------------

भारताची गानकोकिळा लतादीदी
मी एक जळगाव जिल्ह्यातील सामान्य स्त्री आहे, पण मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते की, मला लतादीदी यांच्याबद्दल आज लिहायला मिळत आहे. खरंतर लतादीदी यांचे वर्णन करताना शब्द अपूरे पडतात. त्यांच्या गाण्याने जीवनात दुःखाचे प्रसंग ज्यावेळेस येतात ना, त्यावेळी गाणे ऐकल्यावर सुखद अनुभव येतो. लतादीदींचे गाणे कुठले जास्त आवडते? हे सांगणे जरा कठीणचं. निसर्गाने आकाशात उंच भरारी मारणाऱ्या कोकिळेची उपमा लतादीदींना मिळाली आहे. परंतु, त्या कोकिळेचे गूंज शब्द फक्त वसंतऋतूची चाहूल लागते, त्यावेळेसच क्षणिक काळापर्यंत ऐकावयास मिळते; परंतु लतादीदींचे गाणे सदासर्वकाळ नित्य 24 तास ऐकावयास मिळते. माझ्या हयातीत लतादीदी वयाच्या नव्वदाव्या वर्षीसुद्धा त्यांच्या भरभराटीचा काळ मी अनुभवत आहे.

या पृथ्वीतलावरील साक्षात सरस्वती, लक्ष्मी, सा रे ग म प ध नि ह्या सप्तसुरांची देवता जिला कशाचीही उपमा देऊ शकतात. ज्यांना कशाचीही तोड नाही, अशा लतादीदींना माझा साष्टांग दंडवत. त्यांच्या गाण्यातील एक एक शब्द म्हणजे ब्रह्मनाद. सप्तसूरतील सूर लतादीदींच्या गळ्याच्या रूपात अनुभवण्यास मिळतात. आमच्या चोपडा तालुक्याजवळील शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावी लतादीदींचे आजोळ आहे. जणू काही ते आम्हाला घरचं अंगणच वाटते. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला थाळनेरला त्यांच्या गायलेल्या गाण्यांची संगीत मैफिल होत असते. व त्या मैफिलीने सर्व आजूबाजूची गावे मंत्रमुग्ध होतात.

जीवनात ऊन-पाऊसाप्रमाणे, सुख-दुःख चालूच असतात. अति दुःखात बुडालेल्या एखाद्या व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष जीवनात सुखाचे क्षण दाखविणारा, संगीत जगतातील काळजाला भिडणारा सच्चा सूर म्हणजे लतादीदींचा गोड आवाज. मी साठ वर्षाची गृहिणी आहे. बालपणी विविध भारती, श्रीलंका, जळगाव आकाशवाणी अशा रेडिओवर लतादीदींची गाणे ऐकून मोठी झाली, पण गाणे ऐकून अजूनही समाधान झाले नाही, होतही नाही आणि होणारही नाही. रोज ऐकण्याची मानसिकता, आनंद सुख-शांती-समाधान, न ऐकून बैचेनी. त्यांची गाणे ऐकल्याने आजार बरा होतो. मन:शांती लाभते. मी तर म्हणेन जगातील शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी त्यांचा सूरकंठ मागावा. त्यामुळे आताच्या कलयुगातील आजार नाहीसे होतील. खरोखर लतादीदींच्या कंठात तेवढी ताकद आहे. आणि तो 100% यशस्वी होणारा उपायही. लतादीदी मी आपल्या नव्वदीबद्दल देवाजवळ खूप खूप मागणे मागते की, माझ्या माता, भगिनी, जननी लतादीदींना देव भरभरून आयुष्य देवो आणि त्यांची प्रकृती सुदृढ राहो.

शेवटी मी एवढेच म्हणेन, आकाशी झेप घे रे मानवा, मिळेल लतादीदींचा सप्तसूरांचा झोपाळा.

- शशिकला राजकुमार विसपुते, चोपडा (ता. चोपडा, जि. जळगाव)

इतर ब्लॉग्स