Happy Birthday Lata Mangeshkar : भारताची गानकोकिळा लतादीदी

Happy Birthday Lata Mangeshkar : भारताची गानकोकिळा लतादीदी

नव्वदीतला चिरतरुण स्वर!!

स्वर म्हातारा इतुका न अवघे नव्वदीचे वयमान ....भारतरत्न लता मंगेशकर ....भारतीय  संगीताशी एकरूप झालेलं नाव. आता तर अगदी आवाजाच परिमाण झालेलं नाव म्हंटल तरी चालेल. म्हणजे एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला अगदी लताजींसारखाच आवाज आहे असं म्हंटल की तिलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटावं. अख्ख्या मंगेशकर कुटुंबानेच भारतीय मनामनावर आपल्या जादुई स्वरांनी गेल्या अनेक पिढया अधिराज्य गाजवलय आणि त्यात लताजींचं नाव अग्रगण्य आहे. आमच्या लहानपणा पासून आजपर्यंत सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणांत या  स्वरांनी सोबत केली आहे. त्यांची मराठी, हिंदी आणि इतरही भाषांमधली अनेक गाणी ऐकली आहेत. त्यातली बरीच आवडती गाणी तर सतत ऐकते.आणि सुदैवाने गाता गळा लाभल्याने यातली बरीच गाणी गातेही.  

आता अशी गाणी ऐकण्यासाठी भरपूर साधनं हाताशी आहेत. पूर्वी असं नव्हतं. मोजक्याच लोकांकडे टेप रेकॉर्डर असायचा. बहुतांशी रेडीओवरच गाणी ऐकली जायची. दै. सकाळमध्ये  लताजींच्या गाण्याबद्दलची आठवण लिहायची हा विषय वाचला आणि सहज मनात आलं ते लताजींच्या आवाजात मी ऐकलेलं पहिलं गाणं कुठलं तर ते ज्ञानेश्वर माऊलींची रचना असलेलं लताजींनी गायलेल " पैल तो गे काऊ कोकताहे "  लहानपणी रेडीओवर अनेकदा ऐकलेलं हे गाणं आजही ऐकलं की मनाला भूतकाळात बालपणातल्या त्या स्वच्छंद दिवसात घेऊन जात. त्यावेळी तर या गाण्याचा अर्थही कळत नव्हता. साक्षात माऊलींची रचना, लताजींचा स्वर्गीय स्वर आणि यात बरेचसे उकारांत शब्द असल्याने याच वेगळेपण तर आहेच.

पं. हृदयनाथ मंगेशकरांच संगीत असलेल्या माऊलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या खळे काकांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना लताजींनी गायल्या आहेत. माझी आजी ज्ञानेश्वरांची निस्सीम भक्त होती. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिने ज्ञानेश्वरीच पारायण केलं. माझे वडील देखील ज्ञानेश्वरीच नियमित पारायण करतात. आणि सगळ्याच संतांच्या रचनांचा त्यांच्या बोलण्यात सतत उल्लेख असतो. लहानपणा पासून अस संत साहित्य सतत कानावर पडत असल्याने लताजींनी गायलेल्या या  सगळ्याच रचना अतिशय आवडत्या आणि मनाला भिडणाऱ्या आहेत.  नकळत कुठेतरी माझ्या आजीशी आणि वडिलांशी माझा दुवा जोडणाऱ्या आहेत. मला तर वाटतं या सगळ्या संगीतकारांनी आणि गायकांनी हे खूप मोठं कार्य केलं आहे जे पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत या संत रचना पोहचवत राहील.

लता मंगेशकर नावाच्या स्वरसम्राज्ञीचा हा स्वर आज नव्वदी चा होतोय याचा आनंदच आहे. माऊलींच्याच रचनेतल्या' तयाचा वेलू गेला गगनावरी 'ओळींप्रमाणे दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकरांच्या या कन्येच्या कर्तृत्वाचा स्वरवेल गगनाला भिडलाय.आमचे जीवन सुरेल स्वरांनी  फुलवत बहरणाऱ्या या स्वरलतेचं विनम्र अभिष्टचिंतन आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

- सुचिता संदीप मोघे

======================

माझे लतागीत - 'धीरे से आजा री अखियन मे'

ते वर्ष होते १९९० चे. माझे बी.एस्सी. झाल्यावर मला एम.एस्सी.ला प्रवेश मिळाला तो धुळे येथील एस.एस.व्ही.पी.कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर होस्टेलला राहणे आलेच. घरापासून शेकडो मैल आईपासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. दिवसा तासिका आणि प्रात्याक्षिके यात वेळ कसा जायचा ते कळत नसे पण रात्री आईची खूप आठवण यायची. त्याकाळात होस्टेलवर रेडिओ सिलोन आणि विविधभारतीवर गाणी ऐकत आम्ही अभ्यास करीत असू. एके रात्री अभ्यास करीत  असताना शेजारच्या खोलीमधून रेडिओवर कानावर सूर येऊ लागले. 'धीरे से आजा री अखियन मे निंदिया आजा री आजा धीरेसे आजा. त्या करून आणि वात्सल्याने ओतप्रोत आवाजाने मी कधी नकळत उठलो आणि त्या खोलीच्या दरवाजात उभा राहिलो मला कळले नाही.  
    लेकर सुहाने सपनों की कलियाँ, सपनों की कलियाँ
    आके बसा दे पलकों की गलियाँ, पलकों की गलियाँ
    पलकों की छोटी सी गलियन में
    निन्दिया आजा री आजा, धीरे से आजा
    राजेंद्रकृष्ण यांच्या या अप्रतिम लोरीला महान संगीतकार सी.रामचंद्र यांनी स्वरसाज चढविलाय. या गाण्याने मला माझ्या आईची आठवण आणली आणि माझ्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. माझी ती अवस्था पाहून मला माझ्या मित्रांनी सावरले आणि खूप धीर दिला. आजही जेंव्हा हे गाणे मी ऐकतो तेंव्हा मला होस्टेलचे ते दिवस आठवतात, माझ्या मित्रांची आठवण येते आणि नकळत डोळे पाणावतात. लतादीदींना त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा..  

- प्रा.जयसिंग गाडेकर. 

=========================

भारताची गानकोकिळा लतादीदी

मी एक जळगाव जिल्ह्यातील सामान्य स्त्री.परंतु, मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते की, मला लतादीदी यांच्याबद्दल आज लिहायला मिळत आहे. खरतर लतादीदी यांचे वर्णन करण्यास शब्द संपूर्ण पडतात.भांडार भरपूर भरलेला आहे परंतु शब्दांची मर्यादा ओलांडून चालणार नाही. त्यांच्या गाण्याने जीवनात दुःखाचे प्रसंग ज्यावेळेस येतात ना,त्यावेळी गाणे ऐकल्यावर  सुखद अनुभव येतो. लतादिदींचे गाणे कुठले जास्त आवडते हे सांगणे जरा कठीणचं. निसर्गाने आकाशात उंच भरारी मारणाऱ्या कोकिळेची उपमा लतादीदींना मिळाली आहे.परंतु, त्या कोकिळेचे गुज शब्द फक्त वसंतऋतूची चाहूल लागते त्यावेळेसच क्षणिक काळापर्यंत ऐकावयास मिळते.परंतु लतादीदींचे गाणे सदासर्वकाळ, जळी,काष्टी नित्य 24 तास ऐकावयास मिळते. माझ्या ह्यातीत लतादीदींचा वयाच्या नव्वदाव्या वर्षी सुद्धा त्यांच्या भरभराटीचा काळ मी अनुभवत आहे. ह्या पृथ्वीतलावरील साक्षात सरस्वती,लक्ष्मी,सा रे ग म प ध नि ह्या सप्तसुरांची देवता जिला कश्याचीही उपमा देऊ शकतात. ज्याना कशाचीही तोड नाही अशा लतादीदींना माझा साष्टांग दंडवत.त्यांच्या गाण्यातील एक एक शब्द म्हणजे ब्रम्हनाद. सप्तसूरतील सुर लतादीदींच्या गळ्याच्या रूपात अनुभवण्यास मिळतात.आमच्या चोपडा तालुक्याजवळ शिरपूर तालुक्यातील थाळनेर या गावी लतादीदींचे आजोळ आहे.जणू काही ते आम्हाला घर आंगणच वाटते.त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला थाळनेरला त्यांच्या गायलेल्या गाण्यांची संगीत मैफिल होत असते. व त्या मैफीलीने सर्व आजूबाजूचे गावे मंत्रमुग्ध होतात.

जीवनात ऊन - पाऊस प्रमाणे,सुख-दुःख चालूच असतात. अति दुःखात बुडालेल्यास,एखाद्या दुखी व्यक्तीला मग ती स्त्री असो अथवा पुरुष जीवनात सुखाचे क्षण दाखविणारा,संगीत जगातील काळजाला भिडणारा सच्चा सूर म्हणजे लतादीदींचा गोड गळा. मी साठ वर्षाची गृहिणी आहे. बालपणी विविध भारती,श्रीलंका, जळगाव आकाशवाणी अशा रेडिओवर गायल्या जाणाऱ्या लतादीदींचे गाणे ऐकून मोठी झाली. पण गाणे ऐकून अजूनही समाधान झाले नाही,होतही नाही व होणारही नाही.रोज ऐकण्याची मानसिकता, आनंद सुख-शांती-समाधान, न ऐकून बैचेनी.त्यांची गाणे ऐकल्याने आजार बरा होतो.मनशांती लाभते

मी तर म्हणेल जगातील शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी त्यांच्या सूर कंठ मागावा त्याने आताच्या कलयुगातील आजार नाहीसे होतील.खरोखर लतादीदींच्या कंठात तेवढी ताकद आहे.व ते 100% यशस्वी होणार.
              लतादीदी मी आपल्या नव्वदी बद्दल  देवाजवळ खुप खुप मागणे मागते की माझ्या माता,भगिनी, जननी लतादीदींना देव भरभरून आयुष्य देवो व त्यांची प्रकृती सुदृढ राहो.
             शेवटी मी एवढेच म्हणेन..... भारतीय नारी अशी ही लतादीदींच्या गाण्याची बावरी वाटते त्यांच्या गाण्याचे पंख लावून आकाशी झेप घे रे मानवा.मिळेल लतादीदींचा सप्तसूरांचा झोपाळा,तुम्हांला झोप ही शांत मिळेल, तुमच्या आत्म्याला निवांत स्वप्नात अनुभवाला सप्तसुरांची जादू..... .

शशीकला राजकुमार विसपुते

=====================

प्राथमिक शाळेतील दिवस, शाळेचे पहिले वर्ष इयत्ता १ ली वर्गात होतो. आठवण आहे स्वातंत्र्य दिनाची. खरे पाहता आधल्या दिवशी शाळेत स्वातंत्र्य दिनाची छान पूर्वतयारी चालली होती. मात्र त्या बालवयात स्वातंत्र्य दिनाचा अर्थ लावणे आणि लागणे म्हणजे यक्ष प्रश्नच. रात्रीला झोपी जातांना उद्याबद्दल एक अनमिक हुहूर. झोप लागली ती डोळ्यांना, डोके मात्र जागेच.

अगदी रामप्रहराला मस्त सज्ज होऊन मित्रांसोबत शाळेच्या वाटेवर निघालो आणि उत्साहाने शाळेत आलो. मनात मात्र या दिवसाबद्दल अनंत प्रश्न आणि विचारांची अस्वस्थता, त्या बालवयात स्वातंत्र्य म्हणजे काय? याचा नेमका अर्थ लागत नसल्याने मनाची एक खिन्न अवस्था होती. तोच दिगंतराला भेदत आवाज आला “ ए मेरे वतन के लोगो.....” आणि विजेप्रमाणे क्षणात मनातील मळभ दूर होऊन लतादीदींनी अमर केलेल्या या गीताने माझ्या अंगावर रोमांच शहारले. लता मंगेशकर यांचा या गाण्यातील आवाज खरोखर देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. जस जसे गीत पुढे गेले तस तसे त्या नकळत्या वयातही स्वातंत्र्य म्हणजे  हजारो क्रांतीवीरांच्या ,सैनिकांच्या सळसळत्या रक्ताच्या आहुतीनंतर मिळालेले मोठे वरदान आहे हे कळायला फार वेळ लागला नाही. त्या गाण्याच्या माध्यमातून माझा आणि लतादीदींचा झालेला सुरमयी संवाद आजही माझ्या मन पटलावर चिरतरुण आहे. बालवयात स्वातंत्र्याचा अर्थ लागताना मनाचा उडालेला गोंधळ आणि आलेली खिन्नता घालवण्याची ताकद दीदींच्या कर्णमधुर आवाजात आहे. सरतेशेवटी दिदींनी गायलेले “जब अंत समय आया तो” शब्द देशभक्तीचे नवे आयाम देऊन गेले. 

- रा.म. बावा, उस्मानाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com