असे ही 'राजदूत'!

विजय नाईक
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

''युरोपात तब्बल चाळीस वर्षे शीतयुद्ध चालले. तत्पूर्वी झालेल्या दोन महायुद्धातून युरोप तावून, सुलाखून व होरपळून निघाला. त्यावेळी झालेल्या होलोकास्टची तुलना कोणत्याही अन्य मानवसंहाराशी होऊ शकत नाही. जर्मनीमध्ये लोक शिकलेले होते. तरीही हिटलरच्या काळात साठ लाख ज्यूंची हत्या झाली, ही शरमेची बाब होय. युद्धाची भाषा शहाणपणाची नाही. कारगिलमध्ये झालेल्या युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मी आशा करतो.''

'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडन्ट्‌स' या संस्थेने 30 सप्टेंबर रोजी जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांना वार्तालापासाठी आमंत्रित केले. एरवी, वार्तालापासाठी येणारे बव्हंश राजदूत आपल्या किंमती बीएमडब्लू, ऑडी, मर्सिडिज बेंझ आदी निळ्या अथवा काळ्या रंगांच्या आलिशान गाड्यातून येतात, पण लिंडनर महाशय आले, ते भारतात जवळजवळ मोडीत निघालेल्या लाल अँम्बॅसेडर गाडीतून. ही लाल गाडी जणू काही त्यांचा ब्रँड बनलीय. राजदूत म्हटला की, त्याचा पेहराव उत्तम असणार हे ठरलेले, पण लिंडनर यांनी कोट टाय घातला होता, तरी भारदस्त केसांचे 'पोनी टेल' मात्र झुलत होते. उंची सव्वा सहा ते साडे सहा फूट. बोलणे चालणे अघळपघळ, काहीसे विनोदी, तर मधेच विचारमग्न होत एखादा सुविचार सुनावणारे.

सुरुवातीलाच बोलताना ते म्हणाले, 'मी जर्मनीचा राजदूत आहे खरे, पण काय सांगावे, नियतीने मला कदाचित टॅक्‍सी ड्रायव्हरही बनविले असते. माणसानं आपण आहोत, त्या स्थितीत समाधान मानलं पाहिजे. याचा अर्थ महत्त्वाकांक्षा नसावी असा नाही.' मतितार्थ, पळत्याच्या मागे धावण्याची गरज नाही. लिंडनर यांची रुची केवळ संगीतात नाही, तर भटकंतीतही आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी 'बॅकपॅकर' बनून तब्बल सहा महिने भारताची भ्रमंती केली. 'त्यातून मी बरेच काही शिकलो', असे ते नम्रपणे सांगतात. 

घटनेतील जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केले, त्याबाबत प्रतिक्रिया विचारता लिंडनर म्हणाले, 'ही भारताची अंतर्गत बाब होय. समस्येचे समाधान दुतर्फा वाटाघाटीने करावे लागेल. जम्मू-काश्‍मीरमध्ये आज जी परिस्थिती आहे, ती निवळून लवकर सामान्य झाली पाहिजे. त्यानंतर मानवाधिकाराचे हनन होणार नाही, याची काळजी भारताला घ्यावी लागेल. तेथे मानवाधिकांराचे हनन होत आहे, असा जो आरोप केला जातोय, त्याचा काही पुरावा माझ्याकडे नाही.

Image may contain: 1 person, sitting, outdoor and nature

या समस्येबाबत संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जे मुद्दे मांडले, ते जागतिक व्यासपीठावरील भारताची मुत्सद्देगिरी सफल झाल्याचे निदर्शक आहे. जम्मू काश्‍मीर प्रकरणी तिसऱ्या कुणाचीही मध्यस्थीची गरज नाही, असे आम्हाला वाटते. दहशतवादाविरूद्ध कसे लढायचे, हे संबंधित देशाला ठरवावे लागेल.' 

'जम्मू काश्‍मीर हा नितांत रमणीय प्रदेश आहे. पृथ्वीवरील नंदनवन आहे. आज तेथील लोकांना रोजगारांची गरज आहे. त्याकडे केंद्राला लक्ष द्यावे लागेल. तेथील स्थिती सामान्य आहे, असे सरकार सांगत असले, तरी ती दाखविण्यासाठी अद्याप दिल्लीस्थित राजदूतांना आमंत्रित करण्यात आलेले नाही.' 

'पंजाबमध्ये ड्रोन्सच्या साहाय्याने शस्त्रास्त्र टाकण्यात आली,' असे सांगताना ते म्हणाले की, 'काही वर्षांपूर्वी या तंत्रज्ञानाचा माणसाच्या भल्यासाठी उपयोग होईल, असे मानले जात होते. शस्त्र म्हणून त्याचा वापर होईल, असे वाटत नव्हते. मात्र, काही अलीकडे ड्रोन्सच्या साहाय्याने सौदी अरेबियातील तेलखाणींवर हल्ला झाल्यापासून परिस्थिती आणखी चिघळली आहे.' 

पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान केवळ युद्धाची नव्हे, तर अणुयुद्धाची धमकी देत आहेत, याबाबत बोलताना ते म्हणाले, ''युरोपात तब्बल चाळीस वर्षे शीतयुद्ध चालले. तत्पूर्वी झालेल्या दोन महायुद्धातून युरोप तावून, सुलाखून व होरपळून निघाला. त्यावेळी झालेल्या होलोकास्टची तुलना कोणत्याही अन्य मानवसंहाराशी होऊ शकत नाही. जर्मनीमध्ये लोक शिकलेले होते. तरीही हिटलरच्या काळात साठ लाख ज्यूंची हत्या झाली, ही शरमेची बाब होय. युद्धाची भाषा शहाणपणाची नाही. कारगिलमध्ये झालेल्या युद्धाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी मी आशा करतो.''

Image may contain: 1 person, car and outdoor

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलर वा नाझी नेत्यांशी तुलना करणे चूक आहे. जे लोक अशी तुलना करीत आहेत, त्यांना जगाच्या इतिहासाचे ज्ञान नाही. जगाने इदी अमिन, पोल पॉट यांच्यासारखे मानव संहाराला चटावलेले नेतेही पाहिले आहेत. 

अमेरिकेने माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात इराणबरोबर पाच युरोपीय राष्ट्रांच्या ( जर्मनी, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, चीन) साहाय्याने केलेला अण्वस्त्र प्रतिबंधक समझोता (जेसीपीओए) अध्यक्ष ट्रम्प यांनी धुडकावून लावला. आता अमेरिकेविना तो अमलात आणता येईल काय? असे विचारता, ''अमेरिकेला वगळता तो अमलात आणता येणार नाही. कारण इस्रायलचे अस्तित्त्व नष्ट करण्याची भाषा इराण करीत आहे. दुसरीकडे लेबॅननस्थित हिजबोल्लाने इस्रायलच्या सीमेवर आपली सेना आणली आहे. त्यामुळे केवळ पाच राष्ट्रांना त्याचे समझोत्याचे पुनरूज्जीवन करता येणार नाही,'' असे राजदूत लिंडनर याचे मत आहे. युरोपियन युनियनने इराणला पटविण्याचे प्रयत्न केले, त्यास यश आलेले नाही. 

वार्तालापाच्या अखेरीस वळून ते म्हणाले की, माझी कन्या येथे आली आहे. तिला भेटायचे आहे, पण मी या सुटाबुटात तिला भेटणार नाही. साध्या कपड्यात भेटायचंय. ते कपडेही मी गाडीत आणले आहेत. तिच्याबरोबर बाजारहाट करायचाय. कपडे बदलायला कुठे जागा आहे काय? वार्तालाप इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये होता. तेथील एक राखीव टॉयलेट दाखविता ते म्हणाले, चांगली जागा आहे, असे सांगून त्यांनी रेड ऍम्बॅसेडरमधून जीन्स पॅन्ट आणि साधा टी-शर्ट आणला. थोड्याच वेळात राजदूताचा जामानिमा बदलून ते बाहेर आले. अशा अवस्थेत त्यांना कुणीही हिचहायकर समजले असते. एरवी भारतीय पांढरा शुभ्र पायजमा व नेहरू शर्ट हा त्यांचा आवडता पेहराव. योगाभ्यास करावयास तोच घालतात. त्यांना दिल्लीत 'कूल डिप्लोमॅट' म्हणतात. काही दिवसांपूर्वी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्याबरोबर त्यांनी योगाभ्यास केल्याचे छायाचित्र ट्‌विटरवर टाकले होते. 

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoor

लिंडनर यांच्याप्रमाणे गेले तीन वर्ष दिल्लीत असलेल्या मेक्‍सिकोच्या राजदूत मेल्बा प्रिया यांचा उल्लेख येथे आवश्‍यक आहे. कारण त्या राजदूताच्या आलिशान गाडीतून फिरण्याऐवजी चक्क तीन चाकी रिक्षातून फिरायच्या. 'इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्‌स' या संस्थेने आमंत्रित केल्यावर त्या रिक्षातून आल्या. रिक्षाचा रंग पांढरा होता. त्यावर मेक्‍सिको असे लिहिलेले होते. त्यांच्या या खासियतमुुळे दिल्लीकर त्यांचे चाहते झाले. रोज दहा, पंधरा कि.मी. धावणे अथवा चालणे ठरलेले. मेक्‍सिको सिटीमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले, हे त्यांनी दिल्ली सरकार आणि जनतेच्या मनावर बिंबविले. त्यामुळे त्यांचीही कारकीर्द ध्यानात राहील. 

हे दोन राजदूत एकीकडे व जिबुतीचे राजदूत सैद अबसिए वारासमा दुसरीकडे. चीनची स्थापना होऊन गेल्या आठवड्यात सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने चीनचे नवे राजदूत सुन वेईडाँग यांनी चाणाक्‍यपुरीतील प्रशस्त दूतावासात एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला दिल्लीतील मान्यवर व देश-विदेशाचे राजदूत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला छोटी भेटवस्तू दिली जात होती. राजदूत वारासमा त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना भेटवस्तू दिल्यावरही ते तिथंच उभे राहिले. दूतावासातील चिनी व एक भारतीय महिला कर्मचारी त्यांच्याकडे चकित होऊन पाहू लागल्या.

त्यावर वारासमा म्हणाले, ''आय ऍम अँम्बेसेडर ऑफ जिबुती, यू नो? चायना अँड जिबुती मिलिटरी रिलेशन्स, यू डोन्ट नो? व्हॉट इज धिस, आय वॉन्ट मोअर.'' त्यावर त्या महिलांनी वस्तूंनी भरलेली आणखी एक पिशवी त्यांना दिली. तरीही त्यांचे समाधान होईना. आवाज चढवून ते म्हणाले, ''यू नो आय हॅव चिल्ड्रन, आय वॉन्ट समथिंग फॉर देम.'' ही म्हणजे हद्द झाली. अखेर महिलांनी आणखी एक पिशवी दिली. अर्थात मुलांसाठी त्यात काही नव्हते. त्याप्रसंगी दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या खास नियकालिकाच्या दोन प्रती होत्या. राजदूत महाराज नाराज झाले, पण त्यांचे समाधान करणे महिला कर्मचाऱ्यांच्या हातात नव्हते.

वाचा वेगवेगळ्या विषयांवरील ब्लॉग :

- गांधींचं करायचं काय?

- Happy Birthday Lata Mangeshkar : चमत्कारच!

- आफ्रिकेचे 'बायबल'

इतर ब्लॉग्स