'रिटायरमेंट'नंतर पुण्यात यमराज झालाय 'सेटल'!

पांडुरंग सरोदे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

यमराज झालाय 'सेटल'

खरं सांगू का आमच्या पुण्यात आता "तो' 
दाढी-मुंछवाला यमराज आहे ना तो रिटायरमेंटनंतर "सेटल' झालाय. 
रिटायरमेंटनंतर कोणी गप्प बसलेल कधी पाहिलंय तुम्ही? 
नाही ना, मग यमराज तरी कसे गप्प बसणार ते पुण्यात सक्रीय झालेत, कारण त्यांना सध्या काहीच काम नाही ! 

आकाशातून होर्डिग कोसळून इथेच अनेकजण गेले 
त्यात पत्नीचा दहावा उरकून लेकरांबरोबर येणारा बापही नेला यमराजने 
पुन्हा आकाशातूनच कोसळलेल्या झाडाच्या फांदीने काहींना नेले 
तिथेही अपंगत्वाला चपराक लगावणाऱ्या तिला, बसदुरूस्ती करणाऱ्या त्यालाही नेलं 
मुख्यमंत्र्यांसाठी झाडे कापणारी ती करवत "कॉमन मॅन'साठी कधीच घसरली नाही 

भाकरीत चंद्र शोधणाऱ्या कष्टकऱ्यांनाही साखरझोपेतच त्यानं "संजीवन समाधी' दिली 
अहो, इथे अश्रु ढाळायलाही माणूस शिल्लक ठेवलं नाही हो ! 
अतिवृष्टी, ढगफुटीच्या नावावर पावती फाडणाऱ्या पुराने कित्येकजण मृत्युच्या कुशीत विसावले 
त्यांच्या रक्ताच्या नात्यांना पुन्हा कधीच न भेटण्यासाठी, पुन्हा न परतण्यासाठी.. 

डोंगर-टेकड्या फोडीत, नदी-नाले वळवित बंगले, सोसायट्या, शोरूम बांधायचे 
पण गरीबांनी नाल्यातच राहायच, त्याच पाण्यात किड्यामुंगीसारखं मरायचं 
तरीही त्यांच्याबद्दल दोन-चार दिवसानंतर कुठेही, काहीही ऐकायला मिळत नाही 

मृत्यू काय कोणाच्या हातात असतो काय राव ? 
मृत्यू तर "तो' निसर्गाचाच एक भाग आहे, 
असे म्हणून थेट "रिटायर' यमराजवर ढकलून द्यायचं 
पण निसर्गाला तरी साला, किती दिवस "गुन्हेगार' बनविणार ? 

अहो, आम्ही कधी चुकतच नाहीत का ? 
एकातरी प्रश्नाला उत्तर द्या हो 
का ते उत्तरही अडकलंय "टेंडर"च्या गाळात 
उत्तर कधीच मिळणार नाही, माहीत आहे आम्हाला 
कारण यमराज यमराज रिटायरमेंटनंतर पुण्यात "सेटल' झालाय 
म्हणून इथे आता मृत्यु मोफत अन्‌ होलसेलमध्येच मिळतो !

इतर ब्लॉग्स