खरंच 'थोबाड' बंद केलंय राव

Raj Thackeray
Raj Thackeray

चौकशीनंतर राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले, त्यानंतर ते काय बोलणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. राज आता सरकारवर तुटून पडणार असे वाटत असताना, त्यांनी मात्र "माझं थोबाड बंद होणार नाही' इतकंच शांतपणे सांगितलं. हे चित्र काही महिन्यांपूर्वीचे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा या जोडीवर पुराव्यासह तुटून पडलेले राज विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये मात्र काहीसे शांतच दिसतात. राज यांच्या शैलीमध्ये गेल्या दोन महिन्यांमध्ये झालेला हा बदल महाराष्ट्राच्या जनतेला जाणवणारा आहे. राज्यात थंडावलेल्या विरोधी पक्षात राज ठाकरे यांच्या भाषणाने जाण येईल, असे वाटत असताना, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. राज ठाकरे मोदी-शहा-फडणवीस यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ज्या आक्रमकतेने बोलत होते, ती आक्रमकता गेली कुठे? याचे 'राज' मात्र अद्याप उलगडलेले नाही.

लोकसभा निवडणुकीपेक्षाही मनसेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे प्रचारसभांची राळ उठतील असे वाटले होते. पण त्यांच्या आतापर्यंत झालेल्या सभा ऐकल्यानंतर राज यांनी काहीतरी हातचे राखून ठेवले, असेच वाटते. लोकसभा निवडणुकीत राज्यातील प्रचारसभा गाजविणाऱ्या राज यांना मतदारांनी मतपेटीद्वारे फारसा प्रतिसाद दिला नाही. पण राज्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगला तो राज यांच्या सभांनीच. लोकसभा निवडणुकीत राज यांनी पाठिंबा दिलेल्या कॉंग्रेस आघाडीचा राज्यात दणदणीत पराभव झाला. त्यानंतर काही काळ राज शांत होते. इतर पक्षांप्रमाणे राज यांनीही "ईव्हीएम' मशीनच्याविरोधात बोलण्यास सुरवात केली. ममता बॅनर्जीपर्यंत विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी "ईव्हीएम' विरोधात मोट बांधण्याचा प्रयत्न केला. मुख्य निवडणूक आयुक्तांचीही भेट घेतली. पण देशपातळीवर त्यांना भाजपविरोधात मोट बांधण्यात यश आले नाही. विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या त्यांच्या मागणीलाही कोणी प्रतिसाद दिला नाही. विधानसभा निवडणुका लढविणार की नाही याबाबत राज यांनी संभ्रम कायम ठेवला. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनाही निवडणुकी तयारी करायची की नाही याचा अंदाज आला नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या दबावामुळे राज यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला. 104 उमेदवार त्यांनी जाहीर केले. 

राज लोकसभा निवडणुकीत ज्या तयारीने प्रचारात उतरले होते, "लाव रे तो व्हिडिओ' म्हणून सत्ताधारी पक्षावर पुराव्यानिशी तुटून पडले होते, ती पद्धत मतदारांना आकर्षक वाटली होती. विधानसभेच्या या निवडणुकीत राज ठाकरे आणखी काही पुरावे शोधून राज्य सरकारवर मोदी-शहा यांच्यावर तुटून पडतील असे वाटले होते, मात्र तसे आतापर्यंतच्या सभांमध्ये तरी घडले नाही.

राज यांच्या आतापर्यंत मुंबईत झालेल्या सभा असतील किंवा पुण्यातील सभा असेल, त्यांची एकूणच मोदी-शहा विरोधाची धार बरीच कमी झाल्याचे जाणवते. "ईडी'च्या चौकशीनंतर 'माझं थोबाड बंद होणार नाही', असे बोलणाऱ्या राज ठाकरे यांनी या निवडणुकीत मोदी-शहा यांच्याविरोधात आणखी जोरकस तयारीने उतरणे अपेक्षित होते. शहांवर बुलेट ट्रेनच्या निमित्ताने टीका करणारे राज, मोदीं विरोधात मात्र अपवादानेच बोलले. केंद्र सरकारच्या कारभाराबाबत त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने रान उठवले होते, त्याविषयीही यावेळी अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. 

मराठी, परप्रांतीय या मुद्‌द्‌यांना राज यांनी फारसे महत्त्व न देता बकाल होणारी शहरे, निष्क्रिय स्मार्ट सिटी योजना, रस्त्यांवर पडलेले खड्डे हे मुद्दे उपस्थित केले. हे मुद्दे खरोखरीच महत्त्वाचे आहेत, पण याशिवायही या सरकारला का नाकारायला हवे, याचे ठोस मुद्दे विरोधी पक्षाकडून पुढे येताना दिसत नाहीत. राज ठाकरे यांनी 'मला विरोधी पक्षाची भूमिका बजावायची आहे' असे जाहीर करून इतर विरोधी पक्षांची पंचाईत केली. ठाकरे यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रामाणिकपणे आपली भूमिका जाहीर केली खरी, पण त्याला मतदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो, याबाबत उत्सुकता आहे.

विधानसभा प्रचाराला आता चार दिवसच शिल्लक आहेत, पण अजूनही विरोधी पक्षाला भाजप विरोधात म्हणावे तसे वातावरण तापवता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. दुष्काळ, पूरपरिस्थिती, बेरोजगारी, बंद पडणारे उद्योग, मंदी यावर विरोधक आक्रमकपणे प्रचारात उतरल्याचे जाणवत नाही. या उलट भाजप-शिवसेना युती 'साम-दाम-दंड-भेद' नीतीचा अवलंब करून शेवटच्या क्षणापर्यंत 'इनकमिंग'ला महत्त्व देत प्रचारात उतरलेले दिसतात. राज यांचे मुद्दे नागरिकांना भावतात, युवकांना प्रोत्साहित करतात, पण या निवडणुकीत राज काहीसे थंडच आहेत. त्यामुळे "थोबाड' बंद करण्यात भाजपला यश आले अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com