रझाकारांच्या मुलखात सलोखा जपणारे दोन अवलिये

संकेत कुलकर्णी
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

मिश्र खाद्यसंस्कृतीसाठी औरंगाबाद तसं मुघलकाळापासून प्रसिद्ध आहे. पण इथं पेढे म्हटलं, की एकच नाव ओठांवर येतं, ते म्हणजे अप्पा हलवाई. सव्वाशे वर्षांपासून केवळ पेढा हाच एकमेव पदार्थ बनवून अप्पा हलवाई यांनी केवळ शहरातच नव्हे, तर अगदी आखाती देशांपर्यंतच्या ग्राहकांना लज्जत लावली आहे. या पेढ्यांचा जन्मच झाला मुळात या दोन फकीर अवलियांच्या हुक्कीमुळे.

पार अगदी रझाकारांच्या काळापासून... नाही नाही, रझाकार तर फार अलिकडचे; यादव-तुघलक-मुघल काळातही दख्खनेचं केंद्र असलेल्या देवगिरी-औरंगाबाद परिसरातला हिंदू-मुस्लिम संघर्ष देशभर प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही "दंगलींचे शहर' अशी ओळख औरंगाबादनं कमावली आहे. दंगली हा अगदी "प्रासंगिक' भाग अमान्य नसला, तरी "गंगाजमनी तहजीब' हेही इथलं खास वैशिष्ट्य.
"इस शहर में खुशबू है, हवा मे आबे हयात'
या शाह सिराज औरंगाबादी यांनी वर्णन केल्याप्रमाणे विविध जातिधर्माच्या लोकांमध्ये दिसणारा सलोखा, भाईचारा ही साताठशे वर्षांत होऊन गेलेल्या साधु-संत-फकीर आणि अवलियांचीच देण आहे. बाळकृष्ण महाराज-बनेमियां आणि अप्पा हलवाई यांचं अगदी शंभरेक वर्षांपूर्वीचं उदाहरण हेच आजही याचं जिवंत उदाहरण आहे. तीनशे वर्षांपूर्वीच्या निपटबाबांना जसं औरंगाबादेत सर्वधर्मीयांनी आजही स्मरणात ठेवलं, तसंच बाळकृष्ण महाराज आणि बनेमियां या अवलिया फकीरांच्या दोस्तीचेही किस्से शंभरेक वर्षांपासून इथं सांगितले जातात.

"कसबे बाबरे, परगणे फुलंब्री, तालुके औरंगाबाद, जिल्हे मजकूर सिम्त गर्बी निझाम दक्षिण हैद्राबाद, इलाखे मोगलाईत शके 1734 साली भाद्रपद शुद्ध अष्टमीला दक्षिणी यजुर्वेदी भारद्वाजगोत्री अविघ्नेश मंगलमूर्ती गणेशाचे उपासक नाटूभटजी आणि ललिताबाई यांच्या पोटी बाळकृष्णाचा जन्म झाला.'' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवजन्माचं वर्णन करावं, तशा भाषेत सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वी बाळकृष्ण महाराजांचे शिष्य ज्योतिषी भगवंतराव तोडेवाले यांनी महाराजांच्या चरित्राची सुरवात केली आहे.

औरंगपुरा भागातल्या नागेश्‍वरवाडीत बाळकृष्ण महाराजांचा मठ आहे. इथंच मागच्या बाजूला खोल्यांमध्ये काही कुटुंबं पूर्वापार राहतात. मित्र अभिजितसोबत सायंकाळच्या वेळी तिथं गेलो. नित्यनेमाचे चारदोन जण दर्शनासाठी येत होते. लहान मुलं तिकडं हुंदडत होती. पलिकडं एक जोडपं अंगणात कूलर दुरुस्त करत बसलं होतं. मधूनच एखादा घंटेचा टोल सोडला, तर बाकी एकंदर शांतता होती. सभामंडपात सतरंजीची घडी टाकून एक गृहस्थ येणाऱ्या जाणाऱ्याशी गप्पा करत बसलेले दिसले. अंगात कुडता, खांद्यावर करवतकाठी उपरणं आणि कपाळी गंध. त्यांना अगोदरही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. बहुतेक बिडकीनच्या सरस्वती भुवन शाळेत आम्ही घेतलेल्या पालकत्त्व कार्यशाळेत मुलांकडून स्वागतगीत गाऊन घेतलं होतं, तेच का हे? खात्री करून घेतली. तेच होते. पेशानं शिक्षक आणि छंदानं गायक असलेल्या या प्रमोद जोशी यांनी मग बाळकृष्ण महाराजांचा अवघा चरित्रपटच आमच्यापुढं उलगडून ठेवला.

"अगदी वेडसर वाटणारे, शहरातल्या रस्त्यांवर दिगंबर अवस्थेत पिशाच्चवत्‌ भटकणारे बाळकृष्ण लोकांना दिसत. कधी कानात बोटे घालून मोठ्याने आयती म्हणत नमाज पढ, कुराणातल्या आयती म्हण, तर कधी विष्णुसहस्त्रनाम, वेदमंत्र म्हण, कुणाला जातायेता टपली मार, कधी एखाद्या हलवायाची पेढ्यांची परात उलथून दे, अशा नाना करामती ते करत. कुणी त्यांना वेडे म्हणत, तर काही "अनुभव' आलेले लोक त्यांना संत म्हणत. विदेही अवस्थेत संचार असणाऱ्या बाळकृष्ण महाराजांना कोण हिंदू, कोण मुसलमान, कोण स्त्री, कोण पुरुष याच्याशी काहीही देणंघेणं नसे. बनेमियांशी असलेल्या दोस्तीत दिवस घालवावा आणि आपल्याच धुंदीत मस्त राहावं, असा दिनक्रम असलेल्या त्यांना पुढं अंतकाळ जवळ आला तेव्हा, मुसलमान कबरीत घालून पीर करतील या भीतीनं हिंदू भक्तांनी पुढाकार घेत संन्यासदीक्षा देववली. मरणोत्तर त्यांची समाधी करून त्यावर मंदिर बांधलं.''

शहागंज भागातील सुफी संत हजरत बनेमियॉंशी त्यांची जानी दोस्ती. हे बनेमियॉंही शहागंजात एका मशिदीजवळ राहत. त्या मुघलकालीन मशिदीसमोरच बाबांचा दर्गा आहे. बाळकृष्ण महाराजांच्या मठात येण्यापूर्वी तिथंही गेलो होतो. दर्ग्याबाहेर तंदूर पेटवून दिवसभर नान रोट्या विकणारा दुकान बंद करून गेला होता. मगरीबच्या नमाजाची वेळ होती. दर्ग्याच्या वाड्यात अंधारलेल्या उजेडात एका बाजूला असलेल्या मुघलकालीन मशिदीत पुरुष नमाज पढत होते, तर दर्ग्यात महिला फातेहा पढत होत्या. लाकडी मखरात फुलांनी सजवलेल्या मजारवर लटकणारे शहामृगाच्या अंड्यांचे झुंबर, चौकटीच्या उंबऱ्यावर ठोकलेले कीमती पत्थर पाहत मागं फिरलो, तेव्हा समोरच्या सराईत "कालीन' अंथरून बिछायत मांडलेले काशीफबाबा जॉंनशीन गादीनशीन दिसले. दर्ग्याच्या परंपरेबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी आधी स्वतःचा चांगला परिचय दिला. त्यांचे आजोबा बहादूरखान सज्जादानशीन यांनी बनेमियॉंची बराच काळ सेवा केली. त्यांच्या मृत्यूनंतर तेच या दर्ग्याचे पहिले मुतवल्ली झाले. पुढे त्यांचे पुत्र ख्वाजा मोईनुद्दीन खान सज्जादानशीन झाले. त्यांचे थोरले मुलगे मिन्हाजुद्दीन खान वारल्यावर झियाउद्दीन खान हे सध्या सज्जादानशीन आहेत. तिसरे खाजा वहाजुद्दीन खान सरपरस्त खानखा, काशीफबाबा जॉंनशीन गादीनशीन आणि सर्वात धाकटे मुगजुद्दीन खान नायब मुतवल्ली म्हणून काम पाहतात. "मेरे दो बेटे हैं। बडा अली बॅंक में मॅनेजर है। छोटा अभी एमबीए पढ रहा है। अच्छीखासी तनख्वा है।'' न विचारता हेही त्यांनी सांगून टाकलं.

खुद्द शिर्डीचे साईबाबा इथं येऊन बनेमियांना भेटून, त्यांच्या दैवीपणाची साक्ष देऊन गेल्याचं काशीफबाबांनी सांगितलं. शेगावचे गजानन महाराज इथं मुक्कामी होते, तेव्हा बनेमियांनी त्यांना चिलीम ओढायला मागितली. पण नेमकी तंबाखू संपली होती. अखेर बनेमियांनीच माती भरून चिलमीचा झुरका मारला तेव्हा गजानन महाराजही चकित झाल्याची सुरस कथा, बाबांचा उरूस, संदल आणि इतर चमत्कारांबद्दलही त्यांनी भरभरून सांगितलं. बाळकृष्ण महाराजांच्या मठात एखादा मुसलमान दर्शनाला आल्याचं कधी कुणी पाहिलं नाही. पण बनेमियांच्या दर्ग्यात मात्र हिंदू मोठ्या संख्येनं जातात. "पूरे औरंगाबाद के हर जगह के बम्मन, मारवाडी, गुजराती ऐसे सभी मजहब के लोग यहॉं आके बाबा की सेवा है। जैसे जिसकी श्रद्धा रहती, वैसा उसका काम हो जाता है। किसी का काम जल्दी होता है, किसी का लेट होता है।'' काशीफ बाबांना बनेमियांची महती सांगताना रंग चढला होता. ""बाबा का वनतीस शव्वाल को उरुस होता है। अब इस साल तीन जुलै को है। बडा संदल भी निकलता है। औरंगाबाद में घूमता है। देर रात तक यहॉं कव्वाली चलती है। हैदराबाद, बंबई, पूना, नासिक, मंचेरियाल, मंदम्मरी, गुंटूर, अल्लूर, निजामाबाद के सब लोग आते हैं इधर दर्शनकू। पाच दिन भंडारा चलता हैगरीबों के लिये। यहां की पूरी अवाम में भाईचारा बहोत है। सब के घरों में लडाई झगडे होते रहते, फिरभी सब लोग सुकून से रहते। कोई बम्मन बीमार भी हो गया, तो हमको बुलाते की "बाबा आओ, धागा बांधो। मंतर मारो।' तो वो भी हमारे यहां चलता। हम जाते, उनको फरक पडता।'' असे चमत्कार वगैरेही खूप सांगितले काशीफबाबानं. दर्ग्यात आजारपणावर, कुणाच्या कसल्या-कसल्या तकलीफ दूर व्हाव्यात म्हणून इथं तोडगेही केले जातात. यातही मुसलमानांच्या बरोबरीनं हिंदू आघाडीवर आहेत. पण तो विषय वेगळा. इथं शहरातल्या लोकांत प्रामुख्यानं सांगितल्या जातात त्या बाळकृष्ण महाराज आणि बनेमियांच्या दोस्तीच्या कथा.

"वन्नीससौ सतरा-अठरा का दौर रहा होगा। बालक्रिष्न महाराज और बन्नेमियॉंकी बडी पक्की दोस्ती थी। दोनों एक दूसरे के बिना रहते नहीं थे। बाबा रोज खडकेश्‍वर जाके महाराज के मंदिर में दिनभर बैठते थे। कभी वो दर्गा में आते।'' काशीफबाबा सांगत होते. दिवसभर गावात विदेही अवस्थेत फिरणाऱ्या, एकमेकांशी काहीतरी दुर्बोध भाषेत बोलत-हसत राहणाऱ्या या दोघांचा काही मोजक्‍या ठिकाणी मात्र हक्काचा वावर असे. यांचा गप्पांचा फड लागायचा सराफ्यात गेंदाबाईच्या मकानात, राजाबाजारातल्या पाराजी माळ्याच्या मिठाईच्या दुकानात, गुलमंडीवर मार्तंड सोनाराच्या पेढीवर किंवा पानदरिब्यात लकडे अप्पांच्या ओसरीत. दुय्यम तालुकेदार श्रीनिवासराव नानासाहेब यांनी तर आपल्या हवेलीत त्यांच्यासाठी खास गाद्यागिरद्या घालून ठेवलेल्या असत, असं त्यांचे तोडेवाले यांनी चरित्रात लिहून ठेवलं आहे.

या दोघांच्या दोस्तीची एक अजरामर आठवण आहे. विशेष मिश्र खाद्यसंस्कृतीसाठी औरंगाबाद तसं मुघलकाळापासून प्रसिद्ध आहे. पण इथं पेढे म्हटलं, की एकच नाव ओठांवर येतं, ते म्हणजे अप्पा हलवाई. सव्वाशे वर्षांपासून केवळ पेढा हाच एकमेव पदार्थ बनवून अप्पा हलवाई यांनी केवळ शहरातच नव्हे, तर अगदी आखाती देशांपर्यंतच्या ग्राहकांना लज्जत लावली आहे. या पेढ्यांचा जन्मच झाला मुळात या दोन फकीर अवलियांच्या हुक्कीमुळे.

त्याचं झालं असं, एके दिवशी लकडे अप्पांच्या पत्नीनं घरी खवा घोटून पेढा बनवला. पेढ्यांचा तो थाळ बाळकृष्ण महाराज व बनेमियॉंपुढे आला आणि त्यांनी मुठीमुठीनं रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना तो वाटायला सुरवात केली. झालं. अप्पांकडेही मग रोज पेढा बनू लागला. वाटून उरलेल्या पेढ्यांची विक्री सुरू झाली आणि लकडे अप्पांचे "अप्पा हलवाई' झाले. तिथंच बसून लोकांना पेढेच वाटायची लहर धरली या दोघां फकीरांनी मग. आता वाटण्यातच सगळा पेढा चालला, तर नफा काय राहणार? म्हणून मग अप्पांनी दोन थाळ बनवले. ते बनेमियांनं पाहिलं. सगळा माल वाटून टाकला. अप्पांनी गल्ल्याकडं पाहिलं, तर गल्ला भरलेला. तेव्हा त्यांना एक रुपया देऊन बनेमियां म्हणाले,
"आधी को देख, पूरी को मत देख। आधी भी जाएगी, पूरी भी जाएगी।''
तेव्हापासून अप्पा हलवायाकडं पेढा अगदी प्रमाणातच बनतो. पण तरीही कधी कुणाला पेढा न मिळता माघारी फिरावं लागलं, असं होत नाही. ग्रामदैवत संस्थान गणपती, सुपारी हनुमानासमोर त्यांच्याच पेढ्याला नैवेद्याचा मान आहे. वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असलेले अंमळनेरकर महाराज, मराठवाड्याचे स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा हा आवडता पेढा. बनेमियॉंच्या वास्तव्यामुळे महाराष्टाबरोबरच म्हैसूर, आंध्रापासून अगदी आखाती देशातले मुस्लिम ग्राहकही मोठ्या प्रमाणात हा पेढा घेण्यासाठी येतात. पणजोबा, आजोबा, वडील चंद्रकांतअप्पा यांच्याकडून श्रीमती सुनंदा लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश व कविता लकडे ही बहीणभावांची चौथी पिढी हा व्यवसाय पुढे चालवत आहे.

दोन्ही बाबांच्या मागं त्यांच्या ठिकाणी सुरू झालेली कर्मकांडं आणि धार्मिक कार्यक्रम सोडले, तरी पत्रावळीत किंवा पळसाच्या पानावर बांधून दिला जाणारा हा पेढा खात असताना दुकानात समोरच भिंतीवर लावलेलं दोन्ही संतांचं आणि अप्पा हलवायांचं तैलचित्र पुढं जितका काळ लोकांच्या नजरेला पडेल, तितका काळ या सलोख्याच्या कथा जिवंत राहतील

इतर ब्लॉग्स