चार पावसाळे पाहिलेला ‘बाप माणूस’

Sharad Pawar Mahesh Tilekar
Sharad Pawar Mahesh Tilekar

शरद पवार ही व्यक्ती आहे की एक अदभुत शक्ती हा अनेकांना सातत्याने विचार करायला लावणारा आणि तितकाच सतावणारा प्रश्‍न. छाती ठोकून पवारांना आव्हानं देणाऱ्या मुरब्बी, धुरंधर राजकीय विरोधकांना खुल्या मैदानात चारी मुंड्या चीत करणारा असा हा उमदा पैलवान, राजकीय खेळी करून अनेकांची बीन टाक्‍यांची ऑपरेशन करणारा कुशल सर्जन. वाढत्या वयानुसार, कामातील उत्साह कमी होतो, शरीरातील ऊर्जा हळूहळू संपत जाते, स्मरणशक्ती मंदावते. पण, म्हातारपणाच्या या सर्व मर्यादा ओलांडून ताठ कण्याने उभा असलेला लढवय्या म्हणजे "शरद पवार'. जेव्हा-जेव्हा शरद पवार यांना भेटण्याचा योग आला, तेव्हा त्या भेटीतून मला अप्रत्यक्षरीत्या काहीनाकाही मिळत गेलं. राजकारण हा विषय सोडून त्यांच्याशी गप्पा मारताना राजकारणा पलीकडचे शरद पवार अनुभवाने ही एक माझ्यासाठी नेहमीच आनंदाची गोष्ट असते.

साहित्य, कला आणि संगीताबद्दल या माणसाला असलेलं ज्ञान आणि आवड पाहून कुणीही चकित होईल. समोरचा बॉलर कितीही तरबेज असला तरी बॉल कसा येतोय, त्याप्रमाणे दमदार बॅटिंग करणारे पवार मी पाहिले आहेत. आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मी एका वाहिनीसाठी हिंदी कार्यक्रम केला होता. अभिनेता आयुष्यमान खुराणा त्या कार्यक्रमाचा निवेदक होता. आलेल्या प्रसिद्ध कलाकारांना आयुष्यमान प्रश्‍न विचारून कार्यक्रमाची रंगत वाढवत होता. शरद पवारांनाही मी या कार्यक्रमाला बोलविले होते. आयुष्यमानला एक प्रश्‍न मी लिहून दिला आणि तो प्रेक्षकांमध्ये प्रतिभा पवार यांच्यासह बसलेल्या पवारांना विचारायचा असं सांगितलं. पण, प्रश्‍न वाचून तो मला म्हणाला, ""इतने रथी-महारथी लोगों के सामने पवार सर को ये सवाल करने की मेरी हिम्मत नही है, अभितो मेरा करिअर शुरू हुवा है.'' मग तिथे असलेला दुसरा कलाकार राघव जुयाल याला मी कसा बसा तयार केला. त्याने प्रश्‍न विचारला, ""तुमचं तुमच्या पत्नीबरोबर भांडण होतं का ? आणि झाल्यावर त्यांचा रुसवा घालवण्यासाठी तुम्ही काय करता.'' या खेळकर प्रश्‍नाचं पवारांनी एका वाक्‍यात मिस्कील उत्तर दिलं, ""पत्नीचा रुसवा घालवण्यासाठी मी तिच्या पुढे गाणं गातो, तरुण आहे रात्र अजून ही...'' पवारांचे हे उत्तर ऐकून टाळ्या वाजल्या आणि हशा पिकला.

बारामती नाट्य संमेलनात माझ्या "मराठी तारका' या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. माझा सत्कार करण्यासाठी शरद पवार स्टेजवर आले, सत्कार करून स्टेजच्या मागच्या बाजूने ते गाडीकडे निघाले. तिथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता माझ्याजवळ येऊन म्हणाल्या की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं होतं ते राहूनच गेलं. मी त्यांना घेऊन पुढे निघालो. अंतर खूप असल्यामुळं त्यांना "पवार साहेब' अशी हाक मारली. ती ऐकून मागे वळून ते थांबले. मी आशालता यांची ओळख करून दिली आणि सांगितलं, यांची आपल्याला भेटायची खूप इच्छा होती. त्यावर ते म्हणाले, ""तुमचं संगीत नाटक पाहिलंय.' हे सांगून ते नाटक गोव्यात कुठल्या वर्षी कुठल्या वेळी पाहिलं ते ही त्यांनी सांगितलं. जे आशालता यांनाही आठवत नव्हतं. आठवड्या आधी कुणी भेटलेले आपल्याला आठवत नाही तिथं या माणसाची स्मरण शक्ती बघा किती दांडगी आहे.

मुंबईतल्या वाय. बी. चव्हाण ऑडिटोरियममध्ये मी माझ्या एका कामासाठी गेलो होतो. तिथे खाली शरद पवार यांची गाडी दिसली. तिथे वरती असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये ते आल्याचं समजलं. मी सहज जाऊन भेटू म्हणून गेलो. नेहमीप्रमाणेच तिथे त्यांना भेटायला आलेल्या लोकांची गर्दी दिसली तरी मी माझ्या नावाची चिठ्ठी लिहून आत पाठवली. पाच-दहा मिनिटांनी आधीचे आत भेटायला गेलेले बाहेर आल्यावर मला बोलावले. सियाचिन, लेह-लडाख इथे जवानांच्या मनोरंजनासाठी "मराठी तारका' शो करून आल्याचे मी सांगितले. त्यावर त्यांनी, "हो माहितीये मला तुम्ही जाऊन आल्याचं, तिथं परतापुरच्या पुढं पाकिस्तान बॉर्डरवर पण तुम्ही गेला होतात ना मराठी जवानांच्या तुकडीला भेटायला?' त्यांचा प्रश्‍न ऐकून मी अवाकच झालो, त्यांना सांगताना परतापुरचे नाव घ्यायला मी विसरलो होतो; पण इथे महाराष्ट्रात बसून जिथं मोबाईल, इंटरनेट सेवाही चालत नाही अशा संवेदनशील ठिकाणची खबरबात यांना कशी ? हा प्रश्‍न मला पडला आणि मी समजून गेलो की म्हणूनच यांना शरद पवार म्हणतात. तिथे सियाचिनला 18 हजार फुटांवर ऑक्‍सिजन कमी असतो, अशा ठिकाणी जवानाच्या भेटीला पहिल्यांदा गेलेले पवार हे एकमेव मराठी नेते आहे, असं तिथं सियाचिनला जवानांसाठी "मराठी तारका' कार्यक्रम करण्यासाठी गेल्यावर आम्हाला समजल्याचे मी पवार यांना सांगितले. त्यावर फक्त ते हसले.

अंदमानच्या पुढे 36 तास समुद्रातून प्रवास करून गेल्यावर तिथे असलेल्या एका बेटावर लक्ष्मीनगर नावाची हजारएक मराठी लोकांची वस्ती आहे. तिथं सुनामी आली तेव्हा त्यांच्या भेटीला आणि मदतीला धावून जाणारे पवार हे महाराष्ट्रातील एकमेव नेते असल्याचे तिथल्या गावकऱ्यांनी आम्हाला अभिमानाने सांगितले होते. पवार यांना भेटून मी बाहेर पडलो. लिफ्टमध्ये शिरताना त्यांच्या ऑफिसमधील माणूस धावत निरोप घेऊन आला, "साहेबांनी बोलावलं आहे. मला कळेना पुन्हा का बोलावलं असेल. मी आत गेलो तेव्हा तिथे मी माझा चष्मा विसरलो होतो, तो चष्मा माझ्याकडे देत ते हसत म्हणाले, ""चष्मा इथेच ठेवून चालला होतात तुम्ही, मी फक्त माझाच चष्मा वापरतो. त्यांनी मारलेली ही कोपरखळी मला जाम आवडली आणि डोक्‍यात भुंगा सुरू झाला की माझ्या आधी पण तिथे त्यांना भेटायला लोक येऊन गेले होते. त्यांच्यापैकीच कुणाचा तरी तो चष्मा असेल असे न वाटता तो माझाच चष्मा आहे याची कशी काय त्यांना खात्री झाली ? म्हणजे बोलताना समोरच्या व्यक्तीच्या हालचाली सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत, अशी त्यांची तीक्ष्ण दृष्टी.

माझ्या बायपासच्या ऑपरेशनचे समजल्यावर पवार यांनी मला फोन केला. ऑपरेशन नंतर मिळालेलं आयुष्य म्हणजे मिळालेला बोनस आहे, असं समजा आणि लवकर कामाला लागा. आता आयुष्य आणखी वाढलं आहे तुमचं. त्यांचं हे धीर देणारं वाक्‍य ऐकूनच बळ आलं आणि आठवलं की जेव्हा कॅन्सरसारख्या आजाराने रुग्णालयामध्ये उपचार घेऊन बाहेर पडल्यावर डॉक्‍टरांनी विश्रांतीचा दिलेला सल्ला न मानता पवार नावाचा योद्धा एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा जोशात नागपूरला एका मोर्चात सहभागी होण्यासाठी तडक एअरपोर्टला पोचला. नुसतं फोनवर त्यांच्याशी चार वाक्‍य बोलूनही त्यांच्याकडून मिळालेली ऊर्जा घेऊन मी बायपासनंतर 10 दिवस डॉक्‍टरांनी हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल आणि नंतर महिनाभर आराम असं सांगितलं असताना सातव्या दिवशी घरी आलो. त्यानंतर चार दिवसांनी खासदार संजय राऊत यांच्या ठाकरे चित्रपटाच्या मुहूर्ताला जाण्यासाठी घराबाहेर पडलो आणि त्याच महिन्यात एका वाहिनीवरील कार्यक्रमात "मराठी तारका' टिमसह भाग घेतला आणि तिथं तारकांसह नाचावंही लागलं. हे सगळं करण्यासाठी माझ्यात आत्मविश्‍वास निर्माण करणारी अदभूतशक्ती होती ती म्हणजे ‘शरद पवार’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com