बघता बघता ती अपंग व्यक्ती खड्ड्यात पडली अन्...

मयूर जितकर
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पुण्यात अनेक ठिकाणी खराब, खड्ड्यांनी भरलेल्या ‘दिव्यांग’ रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे. अशा रस्त्यांमुळं छोटेमोठे अपघात होत आहेत. यावर्षी लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकाही नुकत्याच पार पडल्या आहेत. आपापल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या दुरुस्तीकडं लक्ष देतील काय?

सकाळी दहासाडेदहाची वेळ. सोलापूर रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने नेहमीप्रमाणेच गर्दी होती. रेसकोर्सजवळील उजव्या बाजूच्या रस्त्याने काही वाहनचालक ‘शॉर्टकट’चा पर्याय निवडत होते. रात्रीच्या पावसाने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक वाहनचालक या पाण्यातूनच मार्ग काढत होते. एके ठिकाणी चारपाच खड्ड्यांमुळे अख्खा रस्ताच पाण्यात गेलेला.

माझ्यासमोर एक दिव्यांग दुचाकीस्वार होते. त्यांनी या पाण्यात आपली दुचाकी घातली. मात्र, त्यांना खड्ड्याच्या खोलीचा नीट अंदाज आला नाही. रस्त्याच्या मध्यभागी अपेक्षेपेक्षा खूपच खोल, मोठा खड्डा होता. यामुळे या खड्ड्यातून त्यांची दुचाकी एकदम एका बाजूला कलंडून थेट आडवी झाली. ते खड्ड्यात सपशेल आडवे पडले. दुचाकीवरील त्यांची आधाराची काठीही पडली. हे दृश्य पाहताच पाठीमागील वाहनचालक त्यांच्या मदतीला धावले. सर्व वाहतूक एकदम ठप्प झाली. दोघांनी त्यांना सावकाश या गुडघाभर खोलीच्या खड्ड्यातून बाहेर काढले. इतर दोघांनी त्यांची दुचाकी उभी करून तीही बाहेर काढली. पायानं दिव्यांग असूनही सुदैवानं त्यांना कोणतीही मोठी इजा झालेली नव्हती. त्यांची दिव्यांगासाठीची दुचाकी असल्याने तिला मागील चाकाच्या दोन्ही बाजूने आधारासाठी आणखी दोन चाके होती, यामुळेही अपघाताची तीव्रता फार वाढली नाही. अन्यथा, गंभीर अपघातही होऊ शकला असता. मीही भावासोबत मदतीसाठी धावलो. त्यांची विचारपूस करून आधार दिला. त्यांनी हा रस्ताच बंद करायला हवा, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर, आणखी अपघात टाळण्यासाठी आम्ही या मोठ्या खड्ड्याच्या बाजूने दगड रचण्याचे ठरविले. त्यानुसार, दगड ठेवून संभाव्य अपघात टाळण्याची काळजी घेतली.

पुण्यात अनेक ठिकाणी खराब, खड्ड्यांनी भरलेल्या ‘दिव्यांग’ रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे. अशा रस्त्यांमुळं छोटेमोठे अपघात होत आहेत. यावर्षी लोकसभेपाठोपाठ विधानसभेच्या निवडणुकाही नुकत्याच पार पडल्या आहेत. आपापल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या दुरुस्तीकडं लक्ष देतील काय?

यंदा पुण्यात पावसाने कहरच केलाय. पावसाळ्याच्या चार महिन्यात मॉन्सूनने तुफान बॅटिंग केलीच. आता, ऑक्टोबर संपल्यानंतरही पावसाची फटकेबाजी सुरूच आहे. ‘स्मार्ट’ पुण्यातील ‘स्मार्ट’ वाहतुकीची लक्तरे या पावसाने वेशीवर टांगलीयतच, मात्र, रस्त्यांचा ‘स्मार्टनेस’ही उघड केलाय. शहरातील अनेक रस्त्यांची अजूनपर्यंत सुरू असलेल्या पावसाने अक्षरश: दुर्दशा केलीय. अनेक रस्त्यांवर इतके खड्डे पडलेयत की रस्त्यात खड्डे नसून खड्ड्यात रस्ता असल्याचा ‘थ्रिलिंग’ अनुभव घेत पुणेकरांना ड्रायव्हिंग करावे लागतेय. विशेषत: दुचाकीस्वारांचे अशा रस्त्यावर हाल होत असून, दुचाकी चालविताना मोठीच कसरत करावी लागतेय. त्याचप्रमाणं, लहानमोठे अपघातही होत आहेत. रस्त्यावर पाण्यानं भरलेल्या खड्ड्याच्या खोलीचा नीट अंदाज येत नाही. त्यामुळंही अपघातांना निमंत्रण मिळतंय. असाच अनुभव रेसकोर्सच्या मागील रस्त्यावर आज आला. पुण्यात सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक चालक मुख्य रस्त्याऐवजी इतर दुय्यम आणि गल्लीबोळातील रस्त्यांचा वापर करतात. मात्र, त्यामुळं या रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होते. सोलापूर रस्त्यावरील ‘ट्रॅफिक रश’ टाळण्यासाठीही चालकांकडून हाच पर्याय निवडला जातो.

इतर ब्लॉग्स