पुन्हा एकदा दिगू टिपणीस भेसूर हसला  

farmer
farmer

कर्जवसुलीसाठी बॅंकेनं तगादा लावला. त्यातच ओल्या दुष्काळानं शेतात पाणीच-पाणी झालं. परिस्थितीनं छाती दडपायला लागली. पळत जाऊन भिवाजी शेळके नावाच्या शेतकऱ्यानं विजेच्या ट्रान्सफॉर्मरला मिठी मारली अन तो तडफडून मेला. त्याचवेळी "हेक्‍टरी पंचवीस हजार द्या-पन्नास हजार द्या' अशी गर्जना करत सर्व रंगांचे नेते बांध ते मुंबई असा खो-खो खेळत होते. 

याच दरम्यान "मीच येणार', "आम्ही येणार', "महाराष्ट्राला गोड बातमी मिळेल', " "वाघाचं' संवर्धन करू,' "वाद मिटला', "वाद वाढला', "मुख्यमंत्रिपदच पाहिजे', "राष्ट्रपती राजवट येईल', "राष्ट्रवादीबरोबर जाणार' "लिहून द्या'... चा कालवा राजधानीत घुमत होता. भान न राहवून दिगू पोट धरधरून हसला. "सिंहासन'मधला दिगू टिपणीस आठवतोय का ? वाढलेली दाढी, अंगावर खादीचा शर्ट-पायजमा अन खांद्यावर टिपीकल शबनम असा निळू फुले... राजधानी मुंबईत मुख्यमंत्रिपदासाठी चाललेली खेचाखेची-रस्तीखेच अन सामान्य माणसाच्या हाती धत्तुरा, ही स्थिती पाहून प्रेस कॉन्फरन्स चालू असतानाच पत्रकार दिगू उठतो अन हात पुढे करत भेसूर गडगडाटी हसतो. तिथून रस्त्यावर जातो, "अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या घायाळ करणाऱ्या सुरेश भटांच्या ओळी कानी येतात अन सिनेमा संपतो.

तो सिनेमा अन त्यातली राजकीय साठमारी तिथं संपली तरी प्रत्यक्षातली साठमारी चालूच आहे. "अधिक खाता येईल अशी खाती आम्हालाच हवीत', असा हट्ट धरला गेलाय. एका बाजूला दोन बोक्‍यांची मलईच्या गोळ्यासाठी भांडाभांडी चाललीय अन दुसरीकडं विविध प्रश्‍न सोडवणारं सरकार येईल, अशी (भाबडी) अपेक्षा घेऊन महाराष्ट्रातली जनता बसलीये. असं असलं तरी त्या जनतेतले सगळेच जण भाबडे नाहीत, बऱ्याच जुन्या जाणत्या जणांना या बोकेबाजीची माहिती आहे. त्यांना माहितीये की, सरकार कोणाचंही येवो... कंत्राटीकरणाचा-खासगीकरणाचा धोशा लावणाऱ्या, भल्या मोठ्या आंतरराष्ट्रीय लॉबीच्या तालावर नाचत पिळवणूक करणाऱ्या, शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देता केवळ आपल्याला मलई खाता येईल असं पॅकेज देणाऱ्या अन त्यांना कायमचं भिकारी-परावलंबी ठेवणाऱ्यांचाच भरणा त्यात असणार. राज्याच्या समस्या सोडवण्याच्या अस्सल उपायांऐवजी वरवरची मलमपट्टी करणारंच सरकार (पुन्हा) सत्तेवर येणार. सत्ताधाऱ्यांचा रंग कधी तिरंगा तर कधी भगवा...,पण वृत्ती तीच. 

"जागतिकीकरण अपरिहार्य आहे' अशी हाकाटी पिटत कामगारांचे हक्क काढून घेण्याची प्रक्रिया शांतपणानं गेली अनेक वर्षे सुरू आहे. कामगार कायदे "सोपे' केल्यासच उद्योग वाढतील, अशी भूमिका अनेक भाडोत्री कथित तज्ज्ञ मांडत राहतात. आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या हिताच्याच गोष्टी कशा जगभर होत आहेत अन त्यात आपल्या देशातील घडामोडींचाही समावेश कसा आहे, याचं सुरस वर्णन आपल्याला वाचायला-ऐकायला मिळतंच आहे. शेतीमालाला भाव दिल्यास फक्त शेतकऱ्याचंच हित होत नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच मजबूत होते, याची माहिती असूनही सत्ताधाऱ्यांवर बाबूंचा अन आवाज काढण्याची ताकद असलेल्या शहरी नागरिकांचा दबाव येतो, त्यामुळं उत्पन्न मिळवण्याची शेतकऱ्याची संधी डावलली जाते. यावर रामबाण उपाय असलेला स्वामिनाथन आयोग कागदावरच राहतो. मल्टिप्लेक्‍समध्ये बर्गर-पॉपकॉर्न-कॉफीसाठी दोनशे-अडीचशे रूपये मोजणाऱ्यांचे "कंबरडे' कांदा चाळीस रूपयांवर गेला की मोडले जाते. खरं तर महिनाकाठी लागणाऱ्या कांद्याचा हिशोब केला तर ही वाढ काहीच नसते. टोमॅटोचा भाव एक दोन रूपयांपर्यंत अन कोथिंबरीचा भाव पन्नास पैशांपर्यंत उतरला की याच शेतकऱ्याला आपला माल फेकून द्यावा लागतो. काळानुसार इतर गोष्टींप्रमाणेच शेतीमालाच्या वाढीव किमती देण्याची तयारी ग्राहकानं दाखवली तर शेतकऱ्याच्या हाती पैसा येईल अन बाजारात मागणी निर्माण होऊन मंदी पळून जाईल, हे साधं अर्थशास्त्रीय तत्त्व अनेकवेळा मांडलं जातं, पण माध्यमांच्या मार्फत ओरडण्याची सोय हाताशी असलेल्या शहरी मतदारांच्या दबावानं सरकार ते करत नाही. साखर कारखान्यातला पैसा मिळवण्यासाठी राजकीय धेंडांनी साखर कारखाने मिळवले अन त्यासाठी पाणी खाणारं उसासारखं अमाप पीक लावलं. साखर कारखाने महामूर झाल्याने पाणी संपलं अन तेलबिया-डाळींसारख्या गरजेच्या पिकाकडं दुर्लक्ष झालं. कुठं कुठलं पीक घ्यायचं याचं नियोजन करण्याची म्हणण्यापेक्षा अमलात आणण्याची ताकद राजकीय नेतृत्वात नसल्याचंच त्यानं सिद्ध झालं.

मंदीची लाट, जाणाऱ्या नोकऱ्या, वाढणारी बेकारी या समस्यांवर ठोस असताना सरकार केवळ मलमपट्ट्यांमध्ये धन्यता मानते. मराठवाड्यासारख्या मागास भागात उद्योग नेण्याची, तिथून शहरांकडे येणारे लोंढे थांबवण्याची धमक अन कळकळ कुठलंच नेतृत्व दाखवत नाही. अंगावर येऊन कोसळणाऱ्या लोंढ्यांमुळे सुजलेल्या शहरांच्या नियोजनबद्ध विकासाकडं, रचनेकडं कुणीच गंभीरपणं पाहात नाही. नव्या मुंबईसारखी जुळ्या शहराची रचना करण्याचा समावेश मुळात असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचं प्रत्यक्षात काय माकड झालं, ते अनेक शहरवासियांनी पाहिलंच आहे. शहरातील नागरी सुविधांसाठीची आरक्षणं धनदांडग्यांच्या इच्छेप्रमाणं अन फायद्यासाठी बिनदिक्कतपणं उठवली-बदलली जात आहेत. सार्वजनिक वाहतुकीच्या गरजेकडे कुणाचच लक्ष नसल्यानं खासगी वाहनांचा सुळसुळाट झाला अन प्रदूषणाचा राक्षस फोफावतो आहे. युती व्हावी, यासाठी "वाघांचं संवर्धन करू', अशी राजकीय घोषणा मंत्री भंपकपणानं देतात, पण खऱ्या वाघांकडं, त्याचा अधिवास असलेल्या जंगलांकडं दुर्लक्ष करतात. वनीकरणाच्या घोषणा होतात, पण देशी वृक्षांची सर्रास तोड होते अन त्यामुळं माती वाहून जाऊन कोल्हापूर-सांगलीसारख्या ठिकाणी पूर येतात. या समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाय करणारे सत्ताधारी मिळत नाहीत. सत्तेसाठी एकमेकांचा गळा धरला जातो, कुणाशीही हातमिळवणी होते. "गणितं' न जमल्याने राज्याचे सिंहासन सरकारशिवाय चौदा-चौदा दिवस रिकामे राहते. मान्सून संपला तरी वादळानं आलेल्या पावसानं शेती धुतली गेली, उभी पीकं आडवी झाली, कोट्यवधींचं नुकसान झालं, मात्र वरवर काही वर्गाला अप्रिय वाटले तरी मुळातून योजायच्या उपायांऐवजी पॅकेजच्या घोषणेची राळ उडवण्यात धन्यता मानली जाते. या सगळ्यांकडं दुर्लक्ष करत सोशल मीडियात ज्येष्ठ मंडळींपैकी काही जण पवारांच्या बाजूने तर काही जण विरोधात, काही जण भाजपच्या बाजूने तर काही जण विरोधात एकतर्फी मजकूर प्रसिद्ध करण्यात अन तो व्हायरल होण्यात धन्यता मानतात.

या गदारोळात आपल्याला खरंच कुणाचा आधार नाही, असं भिवाजी शेळकेला वाटतं. शेती अवकाळी पावसानं धुतली गेलेली, त्यात पीडीसीसी बॅंकेची चार लाख थकबाकीची नोटीस आल्यानं तो हबकून जातो अन तो "मला जगायचं नाही, मला जगायचं नाही' म्हणत पळत जातो, ट्रान्सफॉर्मर कवटाळतो, विजेच्या धक्‍क्‍यानं फेकला जाऊन जमिनीवर तडफडत राहतो, त्याची बायको त्याला जवळ घेत हंबरडा फोडते, दवाखान्यात नेईपर्यंत त्याला मरणानं गाठलेलं असतं. माध्यमं मात्र तिकडं "संजय उवाच'ची दर्पोक्ती प्रसिद्ध करण्यात व्यग्र राहतात, भाजप-सेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका होतात, आमदार फुटू नयेत म्हणून एका पक्षाचे आमदार "रंगशारदा'मध्ये एकगठ्ठा ठेवल्याची ब्रेकिंग न्यूज देण्याची घाई होते. अशाच एका पक्षाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेला चहा पिऊन माझ्या कल्पनेतला दिगू उठतो, नरिमन पॉईंटजवळच्या फूटपाथवर जातो. सूर्य मावळत आलेला असतो. अचानक त्याला हसू येतं, तो जोरजोरात हसू लागतो. पण, त्याचं हसणं ऐकण्यासाठी तिथं हवा खायला आलेल्यांपैकी कुणालाच वेळ नसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com