रूपेरी ध्रुवतारा

अनिता पाध्ये 
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

अमिताभ बच्चन यांच्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाला ७ नोव्हेंबरला ५० वर्षे पूर्ण झाली. या महानायकाच्या प्रवासात अनेक चढउतार आले. उमेदवारीच्या काळात त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले, तरी तो हरला नाही. डोंगराएवढी आव्हाने सहज पार करत आपल्या अभिनयातले वैविध्य दाखवले. चित्रपटरसिकांच्या मनात घर केले. हा ‘सुपरस्टार’ म्हणजे अभिनयाचे विद्यापीठ झाला. त्या अभिनयपीठाच्या सुवर्णमहोत्सवी कारकिर्दीला सलाम!

सिनेपत्रकारितेची स्टाईल जिने बदलली अशी देवयानी चौबळ ही अत्यंत फटकळ सिनेपत्रकार. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. पण तिने त्या काळी अमिताभबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी उतरत आपली स्वतःची अशी वेगळी जागा बनवेल...’ आजवरचा या महानायकाचा प्रवास पाहता ते खरंच झालेलं दिसतं आहे!

अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीला ७ नोव्हेंबरला तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आजही या अभिनेत्याची लोकप्रियता आणि यश अबाधित आहे. किंबहुना त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. 
ही लोकप्रियता, यश, प्रसिद्धी अमिताभ बच्चनना एका रात्रीत मिळालेली नाही. अपार मेहनत, अभिनयसंपन्नता, व्यावसायिक वर्तन, वक्तशीरपणा आणि योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता या पाच गुणांनी त्यांनी आपलं हे यश मिळवलं आहे. 
‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटातील एका लहान भूमिकेद्वारे अमिताभ बच्चन यांनी भारतीय चित्रपटसॄष्टीमध्ये पदार्पण केले. अनेक जणांना ही गोष्ट माहिती नसेल की या चित्रपटातील सहा हिंदुस्थानींच्या भूमिकांसाठी कलाकारांची निवड आधीच करण्यात आली होती आणि सातव्या हिंदुस्थानीसाठी सर्वात शेवटी अमिताभ बच्चन यांना निवडण्यात आले. पण या चित्रपटाचे निर्माता-लेखक-दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांनी आधी हरिवंशराय बच्चन यांना पत्र लिहून अमिताभ बच्चननी चित्रपटात काम करण्यास त्यांची काही हरकत नाही ना, असे विचारले होते. हरिवंशराय यांनी तार करून ‘हरकत नाही’ असे कळवले, तेव्हाच अब्बास यांनी अमिताभना ती भूमिका दिली होती. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी अमिताभना असे आपल्या वडिलांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवावे लागले होते.
पण तरीही त्यांची वाटचाल सहज सोपी नव्हती. पहिल्या चित्रपटानंतर त्यांचे जवळपास सोळा एक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आपटले होते. तब्बल १६ चित्रपट अयशस्वी होऊनदेखील अमिताभ बच्चनना निर्माता-दिग्दर्शक चित्रपटांत काम देत होते, याचे कारण म्हणजे अमिताभमधील अभिनयक्षमता त्यांच्या लक्षात आली होती. अन्यथा एखाद्या कलाकाराचे दोन-तीन चित्रपट फ्लॉप झाले की त्याला चित्रपट मिळणे बंद होते. 
चित्रपट लागोपाठ अयशस्वी होत असले तरी हार न मानता, अमिताभ मेहनत करत राहिले आणि १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’द्वारे त्यांना यशाची गोडी चाखता आली. हिंदी चित्रपटसॄष्टीमधील नायकाची जी प्रतिमा होती त्याच्या विपरीत ‘जंजीर’मधील नायकाची भूमिका असल्याकारणाने देव आनंद, राज कुमार आदी अनेक तत्कालीन स्टार्सनी हा चित्रपट नाकारला होता. त्याच कारणासाठी अमिताभ बच्चनसुद्धा हा चित्रपट नाकारू शकले असते. कारण आधीच अपयशी असलेल्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत आगळ्यावेगळ्या, चिडका, अरसिक, अनरोमॅंटिक हिरोची (ही भूमिका यशस्वी झाल्यामुळे त्या भूमिकेला ‘अँग्री यंग मॅन हिरो’ असं म्हटलं गेलं) करणे हा त्यांच्यासाठी खरोखरच आव्हानात्मक निर्णय होता. चित्रपट चालला नसता तर त्यांचे उरले सुरले करिअर संपुष्टात येण्याची शक्‍यता अधिक होती. असे असूनही अमिताभ बच्चन यांनी ‘जंजीर’ स्वीकारला आणि त्यांचा तो निर्णय अत्यंत योग्य ठरला. तोपर्यंत त्यांना मिळालेलं अपयश या चित्रपटामुळे धुवून निघालं. 
‘जंजीर’नंतर प्रदर्शित झालेल्या नमक हराम, दिवार, शोले या चित्रपटांतील भूमिकांनी अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन प्रतिमेवर शिक्कामोर्तब केलं. सुरुवातीला लागोपाठ अपयशी होत असलेल्या अमिताभ बच्चनचे चित्रपट ७० व ८० च्या दशकामध्ये लागोपाठ यशस्वी होत राहिले. अमिताभ बच्चन यांना यश मिळालं त्यात त्यांचा दमदार आवाज, अभिनयसंपन्नता हे कारण तर होतेच; परंतु त्यांचे सुसंस्कृत वागणे आणि वक्तशीरपणा यांचाही मोठा सहभाग आहे. कारण त्यापूर्वी अनेक हिरो बनलेले अभिनेते सेटवर दारू पिऊन येत असत, शिवीगाळ करत असत... बहुसंख्य हिरो तर उशिरा सेटवर येत असत. मात्र, नंबर वन हिरो बनल्यानंतरदेखील अमिताभ बच्चन कधीही सेटवर उशिरा गेले नाहीत.
पहिल्या तीन-चार चित्रपटांमध्ये फक्त अँग्री मॅनची भूमिका करणाऱ्या अमिताभनी आपल्या भूमिका, आपली प्रतिमा एकसुरी होऊ नये म्हणून ‘अमर अकबर अँथनी’, ‘डॉन’, ‘शान’, ‘कुली’, ‘लावारिस’, ‘शराबी’ आदी चित्रपटांतून त्यांनी कॉमेडीचा तडकासुद्धा दिला. इतकंच नाही तर ‘चुपके चुपके’, ‘नमक हलाल’मध्ये त्यांनी पूर्णत: विनोदी भूमिका साकारल्या; तर ‘मिस्टर नटवरलाल’मध्ये ‘मेरे पास आओ’ हे गाणे गाऊन ते गायकही बनले. त्यांच्या आवाजाची एक सुमधूर ओळख त्यांच्या त्या गाण्यामुळे झाली. या गाण्यानंतर बालप्रेक्षकांमध्ये त्यांची वेगळीच क्रेझ निर्माण झाली होती. ७० व ८० च्या दशकाच्या सुरुवातीला शान, इमान धरम, बेशरम, देशप्रेमी, पुकार अशा काही अपयशी चित्रपटांचा अपवाद वगळता अमिताभ बच्चन यांची कारकीर्द घोड्याच्या वेगाने पळत राहिली. अर्थात अमिताभ बच्चन यांचे अयशस्वी चित्रपटसुद्धा अन्य हिरोंच्या मानाने बॉक्‍सऑफिसवर अधिक गल्ला जमवत असत.
ऐंशीचं दशक सुरू होताच दोस्ताना, सिलसिला, शक्ती यशस्वी होत नाही तोच १९८३ मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन गंभीररित्या जखमी झाले. त्या काळात त्यांची लोकप्रियता सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने कळली. संपूर्ण देशात आणि विदेशातही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात आल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयासमोर त्या काळात नेहमीच अक्षरशः जत्रा असे. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच बहुतेक काँग्रेसने त्यांना १९८४ मध्ये त्यांना राजकारणामध्ये आणलं. पण राजकारण त्यांना धार्जिणं ठरलं नाही. बोफोर्स प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले. त्यानंतर राजकीय संन्यास घेऊन १९८८ साली हा महानायक पुन्हा अभिनयाकडे परतला आणि ‘शहेनशाह’ हा त्यांचा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर यशस्वी ठरला. परंतु, नंतरच्या काळात त्यांचे चित्रपट अपयशी होऊ लागले. ‘अग्निपथ’ व ‘खुदा गवाह’ने बॉक्‍स ऑफिसवर थोडी फार कमाई केली असली तरी ‘इन्सानियत’ला अपयशाचं तोंड पहावं लागलं. हिरोच्या भूमिका करण्याचं आपलं वय उरलं नाही हे लक्षात आल्यावर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा अभिनयापासून दूर जाण्याचा निर्णय घेत १९९६ मध्ये एबीसीएल ही स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था सुरू करून सर्वप्रथम अरशद वारसी व चंद्रचूड सिंगला घेऊन ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाची निर्मिती केली; परंतु हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फारशी करामत करू शकला नाही. मधल्या काळात प्रोफेसर की पडोसन, अक्का (मराठी चित्रपट) अशा काही चित्रपटांमध्ये ते पाहुणा कलाकार किंवा सूत्रधार म्हणून काम करत राहिले. परंतु, अभिनयापासून लांब रहाणं त्यांना शक्‍य झालं नसावं. म्हणूनच की काय १९९७ साली ‘मृत्यूदाता’ या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चन यांनी अभिनयामध्ये पुनरागमन केलं आणि आपली अँग्री यंग मॅनची प्रतिमा साकारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला; पण प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘लाल बादशहा’चंदेखील तेच झालं. म्हणून ‘सूर्यवंशम’मध्ये पिता-पुत्र, ‘हिंदुस्थान की कसम’मध्ये नायकाऐवजी केंद्रीय भूमिका; तर ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये विनोदी भूमिका करून यश मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यातदेखील त्यांना अपयश मिळालं. या कारणामुळे अमिताभ बच्चन यांची चित्रपट कारकीर्द पूर्णपणे ढासळली असं म्हटलं जाऊ लागलं. एकीकडे त्यांची अभिनय कारकीर्द संपुष्टात आली; तर दुसरीकडे एबीसीएल बुडीत खात्यात निघाली आणि अमिताभच्या डोक्‍यावर करोडो रुपयांचं कर्ज झालं. अमिताभ बच्चन संपला, आता पुन्हा त्यांना यश मिळणं शक्‍य नाही, असे अंदाज बांधले गेले.
असं म्हणतात, की फिनिक्‍स पक्षी राखेतून जन्म घेतो. ही गोष्ट या महानायकाच्या बाबतीत खरी ठरली. चित्रपट अयशस्वी होत असतानाच २००० मध्ये स्टार टीव्हीद्वारे ‘कौन बनेगा करोडपती’ या रिॲलिटी शोचा सूत्रधार म्हणून आलेली ऑफर अमिताभ बच्चन यांनी स्वीकारली. मोठ्या पडद्यावर काम केल्यानंतर छोट्या पडद्यासाठी सूत्रधार म्हणून काम करण्याचा कमीपणा त्यांना वाटला नाही. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोद्वारे केवळ या महानायकाचं कमबॅक-पुनरागमनच झालं नाही, तर रिॲलिटी शोचा सूत्रधार कसा असावा याचा त्यांनी नवा पायंडा पाडला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकाशी त्यांचं अतिशय विनयशील, सुसंस्कृत वागणं-बोलणं हे यूएसपी (युनिक सेलिंग पॉइंट) म्हणजे अनन्य विक्रीबिंदू ठरला. मोठ्या पडद्यावर वावरणारा एकेकाळचा हा हिरो इतक्‍या अगत्यशीलतेने, प्रेमाने व आदराने वागतो ही गोष्ट सर्वसामान्य माणसाला चक्रावून सोडणारी होती. पण अमिताभ यांच्या वर्तनाने (खरं म्हणजे अभिनयाने) त्यांच्या लोकप्रियतेला शिखरावर नेऊन बसवलं. सूत्रधार म्हणून त्यांना मिळालेलं यश बघूनच शाहरुख खान, सलमान खान यांनी सूत्रधार म्हणून टीव्हीवर काम करण्यास सुरुवात केली. या टीव्ही शोने अमिताभ बच्चनसाठी पुन्हा एकदा यशाची, प्रसिद्धीची, पैशांची दारं उघडली आणि त्याच वर्षी यशराज फिल्म्सच्या ‘मोहब्बतें’द्वारे चरित्र अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन यांनी अभिनयाची नवी इनिंग सुरू केली. या चित्रपटानंतर आजतागायत विविध प्रकारच्या चरित्र भूमिकांमध्ये अमिताभ बच्चन आपल्याला दिसत आहेत आणि भविष्यातही त्यांची अभिनय कारकीर्द अशीच यशस्वी होत राहील, यात शंका नाही.
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले भले भले नट, अभिनेते एका विशिष्ट कालखंडानंतर अपयशाच्या गर्तेत सापडलेले दिसतात. प्रसिद्धीच्या शिखरावरून गुमनामीच्या अंधारात ते असे काही लुुप्त होतात की त्यांचे शिखरावर असणे स्वप्नच वाटावे. पण अमिताभच्या बाबतीत असे काही झाले नाही. त्यांनी शिखरावर नव्या अभिनेत्यांसाठी अत्यंत ग्रेसफुली जागा करून तर दिलीच; पण स्वतःसाठी रसिकहृदयात एक अढळपदही निर्माण केले...!

इतर ब्लॉग्स