निवृत्तीनंतरची धोकादायक हतबलता 

तुषार जगताप
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

स्वेच्छानिवृत्तीनंतर एखाद्याला मोठी रक्कम मिळते; परंतु ती पुरेशी असते का, हा खरा प्रश्‍न आहे. मग मनुष्य अधिक पैसे मिळविण्यासाठी वेगळे पाऊल उचलून आपल्या कष्टाचे पैसे एखाद्या फ्रॉड कंपनीत गुंतवितो आणि होत्याचे नव्हते होते. एकरकमी एवढे मोठे पैसे मिळून अशी वेळ का येते हे आपण आज पाहणार आहोत. 

विजयरावांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सुरक्षित आयुष्य जगण्याचा विचार केलेला होता. साठीपर्यंत नोकरी करावी, नंतर दूर कुठे एखाद्या छोट्या शहरात छोटीशी जागा घेऊन छानसा एक छोटा बंगला बांधावा आणि आरामात पेन्शन खात आयुष्याची संध्याकाळ साजरी करावी, असा एकूण फुलप्रूफ प्लान नोकरीला लागतानाच करून टाकला होता. वडिलांची नो टेन्शनवाली, महिन्याला ठराविक पगार हातात पडणारी नोकरी पाहत पाहत लहानाचा मोठा झालेला विजय, त्यांचे रिटायरमेंटचे सुखासीन दिवस बघत नोकरीला लागला. जगायचे तर असेच, रमतगमत, आरामात असा विचार करत नोकरीची वर्षांमागून वर्षे जाऊ लागली. परंतु काळ अचानक बदलला. अचानक महागाई वाढू लागली, नवनवे खर्च घरात डोकावू लागले. वेगवेगळ्या मशिन्सनी घराचे कोपरे भरू लागले. कपड्यांनी कपाटे भरू लागली. मुलांच्या शाळेची फी दर वर्षी भरमसाट वाढू लागली. त्यासोबतच कोचिंग क्‍लासेसच्या फीने खर्चात आपले स्थान पक्के केले. आजारपणे आली की भरपूर खर्च व्हायला लागला. अशा परिस्थितीत खर्चाचे नियोजन करणे शक्‍य होत नव्हते. मागच्या पिढीपासून तयार झालेली आणि कायम वर वर जाणारी लाइफस्टाइल तर सोडता येत नव्हती. पुरेसा पगार असूनही हाता-तोंडाची गाठ प्रकार होऊ लागला. मग बचत आणि गुंतवणूक वगैरे दूरच होते. अशातच ऐन पन्नाशीतच विजयरावांना कंपनीने मोठा धक्का दिला. स्वेच्छानिवृत्ती योजना घ्यावी, असा दबाव येऊ लागला. एकरकमी मोठी रक्कम घ्यावी आणि निवृत्त व्हावे अशी ऑफर वरकरणी विजयरावांनाही आवडली होती. एक दिवस 30-40 लाख रुपये घेऊन विजयराव निर्धारित रिटायरमेंटच्या तारखेआधी निवृत्त झाले. 

आता खरी लढाई सुरू झाली. एकगठ्ठा रक्कम आल्याचे समजताच बरेच नातेवाईक जिवंत झाले. "पाच हजार द्या, दहा हजार द्या, बहिणीच्या मुलाला कॉलेजचे ऍडमिशन आहे पन्नास हजार द्या, भावाच्या मुलीचे लग्न ठरले एक लाख रुपये द्या,' असे प्रश्‍न धर्मसंकट घेऊन उभे ठाकू लागले. मोठी रक्कम आहे म्हणून विजयरावांनी "काय होतंय एवढ्याला...' असा विचार करून ज्याला हवे त्याला सढळहस्ते पैसे दिले. परत येतीलच या आशेवर दिलेले हे पैसे कधीच परत आले नाहीत. उरलेले पैसे बॅंकेच्या एफडीत टाकून व्याज मिळवत उरलेले आयुष्य आरामात जाईल, असा विचार केला होता. पण तेथे बाबांच्या काळात जसे व्याज मिळायचे तसे काही मिळताना दिसत नव्हते. एकतर बाबांच्या काळात खर्चही फार कमी होते आणि मुद्दलावर व्याजही दुप्पट मिळत होते. आज खर्च दुप्पट आणि व्याज निम्मे असा उफराटा प्रकार होऊन बसला. वाढत जाणारे खर्च आणि जबाबदाऱ्या पाहता रिटायरमेंटच्या दिवशी मिळालेली भली मोठी रक्कम ही काही प्रचंड नव्हती याची जाणीव विजयरावांना होऊ लागली. मग पुढे वाढून ठेवलेले भयाण आयुष्य पाहून त्यांना आता काय करावे हा प्रश्‍न पडला. मग त्यांची शोधाशोध सुरू झाली. 

कमीत कमी वेळेत जास्तीच जास्त परतावा कसा मिळेल याची विजयरावांना आस लागून राहिली. कुठून तरी, कोण्या मित्राकडून ऐकले की अमुक एका कंपनीत दोन लाख गुंतविले की तीन वर्षांत चार लाख मिळतात. दहा लाख गुंतविले की वीस लाख मिळतात. विजयरावांनी चार-दोन लोकांकडे चौकशी केली. ज्यांना पैसे मिळाले त्यांच्या भेटी घेतल्या. सर्वांचे चांगले मत पाहून त्यांनीही या कंपनीत पैसे गुंतवायचा निर्णय घेतला. आपण एकदम 20 लाख गुंतवू, तीन वर्षांत चाळीस लाख होतील. या गुंतवणुकीत जोखीम आहे याची कल्पना असली तरी हा निर्णय घेताना कमी रक्कम हातात असल्यामुळे रिटायरमेंट निभावून नेण्याकरिता त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. 

आपल्या सोबत वाईट काही होणार नाही, अशी भाबडी इच्छा बाळगून आपल्या 25 वर्षांच्या मेहनतीने मिळालेले 20 लाख रुपये एका फ्रॉड कंपनीत टाकून मोकळे झाले. आता गेली दोन वर्षे ते आपली मुद्दल मिळते का यासाठी कित्येक ठिकाणचे दरवाजे रोज ठोठावत आहेत व आपल्या नशिबाला दोष देत आहेत. 
विजयरावांचे हे असे का झाले? ते मूर्ख होते का? त्यांना अज्ञान भोवले का? नाही. विजयरावांसारखे लाखो लोक आज भारतात सर्वत्र सापडतील. त्यांना ना त्यांचे अज्ञान भोवले ना मूर्खपणा. त्यांना त्यांची आर्थिक असाक्षरता व वेळेवारी न केलेले शिस्तबद्ध आर्थिक नियोजन भोवले. त्यामुळे ते आयुष्यात अशा एका वळणावर आले जिथे कमी वेळेत जास्त परतावा मिळणे ही त्यांची हतबलता होती. त्यामुळे फसविले जाण्याच्या परिस्थितीकडे ते अजाणतेपणे ढकलले गेलेत. आपला विजयराव होण्यापासून आपण स्वतःला नक्कीच वाचवू शकतो. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाचा आधार घेऊन लवकरात लवकर आपले रिटायरमेंट प्लानिंग सुरू करणे हेच हितकारक आहे

इतर ब्लॉग्स