ती झोपडी समृद्ध झाली.... 

यशेंद्र क्षीरसागर 
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगणे येथील माळरानावर एका झोपडीत 1907 मध्ये मुलींची शाळा झाली. त्यानंतर महिला महाविद्यालय, महिला विद्यापीठ तसेच निष्काम कर्ममठ स्थापन करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे अर्थात अण्णासाहेब कर्वे यांचा आज (शनिवार) स्मृतीदिन. त्या निमित्त...

ज संपूर्ण भारत वर्षांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाचा आपण डंका वाजवत आहोत. मुलींना समान अधिकार मिळाले पाहिजेत, मुलींना भरपूर शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडताना आले पाहिजे आणि त्यांनाही इतक्‍या संधी मिळाल्या पाहिजेत. जितक्‍या पुरुषांना संधी मिळतात ही या अभियानामागील भूमिका आहे. इतकेच नव्हे तर स्त्री म्हणून जे हक्क स्त्रियांना नाकारले गेले, ज्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांपासून स्त्रियांना वंचित ठेवण्यात आले असे अधिकार स्त्रियांना मिळावेत. ज्या संधी स्त्रियांना, मुलींना नाकारल्या गेल्या त्या सर्व संधी स्त्रियांना आणि मुलींना मिळाल्याच पाहिजेत अशा भावनेतून हे अभियान आहे. याशिवाय विविध उपक्रमातून मुलींना आणि एकंदरीतच स्त्रियांना मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र, या परिस्थितीच्या मुळाशी अनेक महान समाजसुधारकांनी केलेले कार्य हे आजही पारिजातकाप्रमाणे दरवळत आहे. या महान समाजसुधारकांच्या मालिकेतील एक चमचमता तारा म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे अर्थात अण्णासाहेब कर्वे होत. 1955 मध्ये पद्मविभूषण आणि त्यानंतर 1958 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले महर्षी धोंडो केशव कर्वे हे केवळ भारतीयांचे नव्हे ; तर जगाचे तीर्थस्थान झाले आहेत. त्यांच्या पत्नी बाया कर्वे यांनी त्यांना या कार्यात मोलाची साथ दिली.

18 एप्रिल 1858 ला जन्म झालेले महर्षी कर्वे यांचे निधन 9 नोव्हेंबर 1962 रोजी झाले. आपल्या 104 वर्षाच्या प्रदीर्घ आयुष्यात महर्षी कर्वे यांनी स्त्रियांसाठी महान कार्य केले. इतकेच नव्हे तर हेच कार्य पुढील सर्व कार्याची मुहूर्तमेढ ठरले. 1848 मध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या महान दांपत्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर बरोबर दहा वर्षांनी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. महात्मा फुले हे 1890 मध्ये निवर्तले. तेव्हा महर्षी कर्वे यांचे वय 32 वर्षे होते  आणि त्यांच्या कार्याची जोरदार सुरुवात झालेली होती. एका अर्थाने महात्मा फुले यांचा वारसा महर्षी कर्वे यांनी पुढे चालवला असे म्हटले तर अयोग्य ठरणार नाही. विधवांना जगण्याचा अधिकार नाकारला जात असण्याच्या काळात विधवा-पुनर्विवाहसाठी केलेले कार्य हे महर्षी कर्वे यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा पैलू होय. 

नाथीबाई ठाकरसी विद्यापीठ महर्षी कर्वे यांनी स्थापन केले. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था स्थापन केली. अनाथ बालिकाश्रम 1899 मध्ये स्थापन केला. महर्षी धोंडो केशव कर्वे महान कर्मयोगी होते. कोकणामध्ये मुरुड येथे गरीब कुटुंबात जन्म झालेल्या महर्षी कर्वे यांनी लहानपण अत्यंत हलाखीत घालवले. शेकडो किलोमीटर इयत्ता सातवीच्या वयात असतानाच परीक्षेसाठी चालणारे ते महान कर्मयोगी होते. त्यांच्या कार्याचा सुगंध आजही विविध रूपांनी दरवळतो आहे. आज मुली, स्त्रिया विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. त्यांना आत्मसन्मान लाभत आहे. समाजाकडून प्रचंड सहकार्य लाभत आहे. या सर्वांच्या मुळाशी अण्णासाहेबांनी केलेल्या कार्याचा स्रोत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमधील गणिताचे प्राध्यापक म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना बोलावले. 1891 पासून 1914 पर्यंत प्रदीर्घकाळ गणिताचे प्राध्यापक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी मोठे ज्ञानदानाचे कार्य केले. 

पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन या संस्थेतील एका विधवेशी विवाह केला. म्हणजेच ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी महर्षी कर्वे यांना प्राणपणाने केवळ सहकार्य नव्हे तर आयुष्यभर साथ दिली. या पुर्नविवाहामुळे अण्णासाहेब कर्वे यांना खूप त्रास सहन करावा लागला. तत्कालीन समाजाने त्यांना वाळीत टाकले तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. 1893 मध्ये त्यांनी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ स्थापन करून क्रांतिकारक कार्य केले. इतकेच नव्हे, तर पुनर्विवाहितांचे कुटुंब मेळावे भरविले हा एक मोठा कार्याचा ठसा त्यांनी उमटवला विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी 1899 साली अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. समाजाकडून अवहेलना सहन करूनही अशाप्रकारे सक्रिय कार्य करणे हे एखादी महान व्यक्तीच करू शकते. केवळ बोलून समाज सुधारणा होत नाही. स्वतः सुद्धा तसेच सक्रिय पाऊल उचलावे लागते त्या दृष्टीने हे कुटुंब मेळे आणि अनाथ बालिकाश्रम तसेच विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळ यांची स्थापना हे खूप मोठे पाऊल होय.

पुण्याजवळ हिंगणे येथे 1900 सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे गृहिणी म्हणून स्त्रियांना योग्य शिक्षण दिले पाहिजे. या भावनेने स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी ते प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने 1916 मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबंधित विविध विषयांचा समावेश आहे. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे हजारो स्त्रियांनी अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांमधून शिक्षण पूर्ण केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशात अक्षरशः वणवण केली आणि मदत मिळवली 1929 ते 1932 या काळात त्यांनी परदेशातही वणवण केली. 

महर्षी कर्वे यांचे आयुष्य जणू संस्थांमुळे होते त्यांनी मुरुड फंड 1886 मध्ये स्थापन केला. स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी निष्काम कर्ममठ स्थापन केला. हे वेगळ आणि महत्त्वाचे सकारात्मक पाऊल होते. 1936 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ त्यांनी स्थापन केले. 1944 मध्ये समता संघ स्थापन केला स्त्रियांसाठी मुलींसाठी विधवांसाठी कार्य करण्याबरोबरच सामाजिक समस्या वर उपाय शोधण्यासाठी ही महर्षी कर्वे यांच्या रूदयात मोठी तळमळ होती. या तळमळीतून जातिभेद आणि अस्पृश्‍यता निवारणासाठी 1944 मध्ये समता संघ त्यांनी स्थापन केला. आधुनिक भारताचा सामाजिक सुधारणेचा इतिहास जेव्हा अभ्यासला जातो जेव्हा चर्चिला जातो तेव्हा ही चर्चा आणि हा अभ्यास महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यांनी अत्यंत चिकाटीने ध्येयवादाने झपाटून कार्य केले महान त्याग केला ते आणि त्यांच्या सौभाग्यवती या त्यागाच्या मूर्ती होत्या. 1915 मध्ये त्यांनी आत्मवृत्त लिहिले त्यातून त्यांचा जीवनपट उभा केला आहे. त्यांची ही अपूर्व जिद्द चिकाटी समाजासाठीची तळमळ हे महान कार्य लक्षात घेऊन 1955 मध्ये भारत सरकारने महर्षी कर्वे यांना तथा अण्णासाहेबांना पद्मविभूषण या महान गौरवाने गौरविले तसेच 1958 मध्ये म्हणजेच त्यांच्या जीवनाला शंभर वर्षे पूर्ण झाली.

तेव्हा त्यांना भारतरत्न देऊन गौरविले. ज्यामध्ये महर्षी कर्वे यांचे संपूर्ण आयुष्य 18 एप्रिल 1858 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील शेरावली या गावात एका निम्न कुटुंबात महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. 1907 मध्ये त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगणे येथील माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यानंतर महिला महाविद्यालय सुरू केले आणि अखेर 1916 मध्ये महिला विद्यापीठ स्थापन झाले. 1910 मध्ये निष्काम कर्ममठ स्थापन करणारे अण्णासाहेब कर्वे यांची दूरदृष्टी महानच म्हटली पाहिजे. त्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी या झोपडीतून निर्माण केलेली समाजसुधारणेची गंगा आज राज्याच्याच नव्हे तर देशाच्या गावा-गावात पोचली आहे. मुळात ह्या कामाची या कर्मयोगाची भावना आज त्यांना मनात रुजणे गरजेचे आहे. केवळ व्यावहारिक सुख केवळ भौतिक सुविधा आणि वरवरची सूज म्हणता येईल अशी प्रगती आणि विकास काहीही उपयोगाचा नाही महर्षी कर्वे यांची ही झोपडी आज खरच समृद्ध झाली आहे.

इतर ब्लॉग्स