तिचं "कडी'दार हास्य

मतीन शेख
Thursday, 14 November 2019

प्रवास सुरू होता वर्धा ते कोल्हापूर दरम्यान... 
रेल्वे वर्ध्याच्या काहीशी पुढे आली होती... 
अचानक एक छोटीशी मुलगी समोर आली आणि आपली आई वाजवत असलेल्या वाद्यावर ताल धरुन गोड नृत्य करु लागली... 
कदाचित सकाळी तिने अंघोळ केली नसावी, केस विस्कटलेले होते, चेहरा पारुसाच वाटत होता पण, तिचं हसू खुप गोड होतं. हात वर करुन ती नाचत होती. तिच्या हात भरुन असणाऱ्या बांगड्या एक वेगळाच नाद करत होत्या. 
बांगड्या पण अशा घातल्या होत्या की एखाद्या नवरदेवाची करवली असावी अशा... 

प्रवास सुरू होता वर्धा ते कोल्हापूर दरम्यान... 
रेल्वे वर्ध्याच्या काहीशी पुढे आली होती... 
अचानक एक छोटीशी मुलगी समोर आली आणि आपली आई वाजवत असलेल्या वाद्यावर ताल धरुन गोड नृत्य करु लागली... 
कदाचित सकाळी तिने अंघोळ केली नसावी, केस विस्कटलेले होते, चेहरा पारुसाच वाटत होता पण, तिचं हसू खुप गोड होतं. हात वर करुन ती नाचत होती. तिच्या हात भरुन असणाऱ्या बांगड्या एक वेगळाच नाद करत होत्या. 
बांगड्या पण अशा घातल्या होत्या की एखाद्या नवरदेवाची करवली असावी अशा... 
अचानक माझी नजर तिच्या गळ्यातील लोखंडी कडी वर पडली अन्‌ क्षणात लक्षात आलं की ही डोंबाऱ्याची पोर. तिचा शारिरीक लवचिकतेवर स्वतःला सिद्ध करण्याचा खेळ ती आपल्याला दाखवणार... 
आणि झालं ही तसंच....तिनं सुरू केलं स्वतःला तिच्या लोखंडी निमुळत्या कडीतून ओवून घ्यायला... 
आडवे तिडवे हात पाय कडीत घालून ती स्वतःला ओवून घेत होती... 
आता त्या कडीत ती अडकून बसते की काय..? याचा घोर माझ्या मनाला लागला. 
पण माझा अंदाज फोल ठरवत अगदी अलगदपणे त्या कडीतून ती बाहेर पडायची अन्‌ छानसं हसायची. ती कडीतून बाहेर पडल्याबरोबर माझा अडकलेला श्वासही मोकळा व्हायचा. 
तिचा हा खेळ संपुर्ण डब्यात चालू होता. 
डब्यातले सर्व प्रवासी तिच्याकडे पाहत होते. शेजारी बसलेल्या सहप्रवासी कर्नाटकच्या 14 वर्षांखालील मुलींचा खो-खोचा संघ. नागपुरातील स्पर्धेत राष्ट्रीय विजेतेपद पटकावून त्या गावी परतत होत्या. त्या सर्व त्या मुलीकडे कौतुकाने पाहत होत्या. कारण त्यांच्या खो- बॅक-खोच्या खेळा पेक्षा तिचा हा खेळ त्यांना खूप अवघड वाटत होता. 
काही वेळात तिने तिच्या खेळाचा प्रकार बदलला. 
डब्याच्या एका कोपऱ्यापासून तिने फ्रंट रोल (कोलांट्या उड्या) मारायला सुरवात केली. तसा माझा जीव अलटी-पलटी मारायला लागला. कारण कुस्तीच्या आखाड्यात वॉर्म अपच्या वेळी फ्रंट रोल मारताना काय हालत होते हे मला चांगलंच माहीत होतं. सैन्यदलात तर सैनिकाला एखादी चूक झाली की फ्रंट रोल मारण्याची शिक्षा दिली जाते आणि ही 6 वर्षाची मुलगी चक्क रेल्वे डब्यातच पोटासाठी फ्रंट रोल टाकत होती. दारिद्रयात जन्म घेतला हीच तिची चूक होती आणि फ्रंट रोल मारुन ती याची शिक्षा भोगत होती त्या शिक्षेपोटी नंतर बघे तिच्या हाती चार-दोन रुपये ठेवणार होते. 
तिने हा प्रकार थांबवावा अस वाटत होतं. माझ्या जवळ तिची ऊडी येताच मी तिला थांबवलं. तिला तिचं नाव विचारल. तिने काहीसं नाव सांगितलं. 
तु शाळेत जातेस का..? 
असा प्रश्‍न मी तिला केला. तिने "नाही' असं उत्तर दिलं. 
मी गप्प झालो कारण मी तिला केलेला प्रश्‍नच निरर्थक होता. ती रोज शाळेत गेली तर हा खेळ कोण करणार आणि तिच्या पोटाची खळगी कशी भरणार. पोट भरणे हाच तिच्यापुढील मोठा प्रश्‍न होता. डब्याच्या एका कोपऱ्यातुन तिची आई पाहत होती. क्षणासाठी त्या माऊलीचा राग आला...का बरं ती आपल्या मुलीला हा खेळ करायला लावत असेल ? असा प्रश्‍न उभा राहिला. 
खिशातील दहाची नोट तिला देवु करावी असे मनात आले; परंतु पाकिटात पाहतो तर एक शंभराची पत्ती आणि पाच रुपयाचं नाणं इतकेच चलन होते. मी नाणं काढलं व तिच्या हातावर टेकवलं. 
शंभराची नोट तिला देण्याइतपत दिलदारपणा मी दाखवला नाही कारण मनुष्याचा स्वार्थीपणा आडवा आला. पण पाच रुपयाच नाणं पाहूनही तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत होती कदाचित ते नाण तिला गोलाकार भाकरी इतक मोठं दिसत असावं. 
तिने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले. मी ही हसलो आणि शाळेत जात जा असा उपदेश केला. तिने ही होकारार्थी मान डोलावली आणि पुढील प्रवाशांकडुन रुपया-दोन रुपये स्वीकारत पुढे दिसेनाशी झाली; पण ती सतत माझ्या मनात रेंगाळत राहिली. 
 

बच्चे दिल के सच्चे... 
हे खरं पण भारतात अशा अनेक मुलांचं उज्ज्वल भविष्याच झुटपणे सामोरं येतं. एका बाजुला काही मुलं मोबाईल मध्ये खेळ खेळून आनंद मिळवतात तर काही आयुष्याचा खेळ करुन जगणं शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजातल्या या दोन टोकाच्या बाजू अस्वस्थ करणाऱ्या आहेत. 
आर्थिक विषमतेवर आधारलेली आणि चंगळवादाकडे झुकलेली समाजिक व्यवस्था कुठे तरी समाजभिमुख होणं गरजेच आहे. नेते मंडळी आपल्या छातीचं माप अगदी छातीठोकपणे सांगतात पण ते भारतात असणाऱ्या दारिद्रयाची ऊंची ना मोजायला तयार आहेत, ना सांगायला. 

असो...बालदिनानिमित्त विचारांची लिंक लागली आणि हे संचित समोर आलं. ते आपल्यासाठी थोडं विचार करायला लावण्यासाठी! 

 

इतर ब्लॉग्स