बाल चिट्टीच भटक जग

सोनाली जाधव
Thursday, 14 November 2019

 चिट्टी आज गावात आलेली आपल्या आई आणि वडीलांबरोबर... 

 चिट्टी आज गावात आलेली आपल्या आई आणि वडीलांबरोबर... 
दोर sss दोरsss म्हणत गावातून आवाज देत फिरत होती. जुन्या साड्यांपासून दोऱ्या बनवून वीतभर पोट भरणारं तीच भटकं कुटुंब विंचवाच्या बिऱ्हाडासारखं होतं. एका साडीपासून तीन दोऱ्या व एका दोरीला 10 रुपये. त्यातही घेणारे घासाघीस करत होते. अवघ्या 5 ते 6 वर्षांची चिट्टी या कामात सराईतपणे व आनंदाने मदत करत होती. काम करत करत तिनं तेते जमलेल्या सर्वांचं कन्नड आणि मराठीतून बोलून मनही जिंकल होतं. काही वेळा बोलणं समजायचं नाही; पण तिचे निरागस हावभाव खूप काही सांगून जायचे. दिसायला एखाद्या टारगट पोरासारखी, आवाजही बेरकी. कोणी खिल्ली उडवली तर ती त्यांना खाटकन उत्तर देत होती.

मूळ कुटुंब कर्नाटकातील, पोटासाठी आज इथं तर उद्या तिथं, एका पोत्यात भरलेला संसार घेऊन तिचे आई-वडील फिरत होतं. ज्या गावात जायचे, त्या गावातच कोठेतरी आडोसा करून एक किंवा दोन दिवसांसाठी फाटका-तुटका संसार मांडून जगणं त्यांचं सुरू होतं. चिट्टीशी बोलायचा प्रयत्न केला. सुरवातीला खूप भाव खाल्ला तिने. बोलायला तयारच नव्हती. खूप आढेवेढे घेत, काम करत थोडं थोडं बोलायला लागली. 

"तू शाळेत जात नाहीस का गं?" या प्रश्नाचं उत्तर द्यायला तर तिने खूप वेळ लावला. चिट्टीला शाळा नावाचं जग काय असतं याची पुसटशी कल्पनाही नव्हती; पण या दुनियदारीची शाळा मात्र तिला जिणं म्हणजे काय नकळत शिकवत होती. " तू राहतेस का माझ्याजवळ? मग मी तुला माझ्याबरोबर शाळेत नेत जाईन, ड्रेस घेईन, छान छान फोटो काढू आपण... असे बोलूनही ती एकही शब्द बोलली नाही. "तुझा फोटो काढू का मी? मग काय चिट्टी एका पायावर तयार. भरा भर एका पेक्षा एक पोझ दिल्या. " ये... मावशी फुटू काढ की "मी जरा खोटं खोटं रागावून म्हंटलं, "मला मावशी नको म्हणू , मला ताई म्हण मगच मी फोटो काढीन, खूप भाव खाऊन शेवटी ती ताई म्हणाली. तिच्या आई आणि वडिलांचं काम होईपर्यंत चिट्टी आमच्या सर्वांच्या मनात घर करून गेली. 
जाताना माझं लक्ष नव्हतं. तर चिट्टी," टाटा मावशी " म्हणत नजरे आड झाली. 

सत्तेवर असणाऱ्या... सत्तेवर येऊ पाहणाऱ्या व विकासाचं राजकारण न करता समस्यांचं राजकारण करणाऱ्यांना, समाजसेवेचं राजकारण करणाऱ्यांना कुणीतरी एखादी चिठ्ठी पाठवावी. अशा लाखो चिट्टीचं जीणं कुठेतरी विरतंय. 
आईबाबांच्या फाटक्‍या-तुटक्‍या संसारबरोबर तूही वणवण फिरतेयस. कदाचित तू ही तुझ्या आईवडीलांसारखी मजबूर असावीस या वीतभर पोटासाठी. तुला बालदिनाच्या शुभेच्छा द्याव्या की नको असा प्रश्‍न मला सतावतो आहे. तुझे इवले इवले हात आईबाबांना मदत करताना दिसायला भारी वाटत होते; पण तुझं बालपण कुठेतरी कुस्करुन जात आहे त्याचं काय? 

अदृश्‍य बालमजुरीची तू बळी ठरत आहेस याची जाणीव तुला कदाचित नसावी. कशी आहेस? काय करतेयस? हे प्रश्न विचारून ते तुझ्यापर्यंत जाणार असतील तर त्यात तथ्य आहे. थोडीच तू अंतरज्ञानी आहेस माझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला. अंतरज्ञानी असतीस तर किती छान. खूप गप्पा मारल्या असत्या पण या पोकळ गप्पांचा काय फायदा. मी तुला विचारलं होत की परवा माझ्याबरोबर राहतेस का, माझ्याबरोबर शाळेत येणार का? म्हणून तर तू नाही म्हणालीस. एवढी उदासीन का ग तू शाळेबद्दल? तू भेटशील का मला पुन्हा? आपण ना तुझ्यासाठी कल्पनांचे इमले अजिबात बांधायचे नाहीत. छोटेसे घरकुल बांधू... त्यामध्ये तुला तुझं बालपण जगता येईल. छान छान भातुकली खेळता येईल. बाहुला-बाहुलीचं लग्न लावता येईल. 
पुन्हा भेटशील का गं चिट्टी?

इतर ब्लॉग्स