योग्य गुंतवणुकीसाठी जोखीम अभ्यासा !

insight.jpg
insight.jpg

नाशिक : योग्य गुंतवणुकीचा पर्याय म्हणजे जोखीम आणि परताव्याचा योग्य समतोल. गुंतवणूक करणाऱ्यांना भीती वाटणे स्वाभाविकच आहे आणि भीतीचे तिमिर दूर करतो तो ज्ञानाचा प्रकाश. भीती कमी करावयाची असेल तर जोखीम समजायला हवी, अभ्यासायला हवी. 


जोखीम अभ्यासणे म्हणजे नेमके काय करणे? : जोखीम म्हणजे काय?, त्याचे स्वरूप काय?, जोखमीचे नियोजन कसे करावे?, सर्वसाधारणपणे कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी जोखमीसंदर्भात अभ्यासावेत असे महत्त्वाचे घटक : 1) व्याजदर कमी किंवा जास्त होण्याची जोखीम, 2) परतावा वेळेवर न मिळण्याची जोखीम, 3) मुद्दल कमी होण्याची किंवा बुडण्याची जोखीम, 4) पुनर्गुंतवणूक करण्याची जोखीम, 5) प्राप्तिकरासंदर्भात बदलणारे नियम. 

प्रत्येक गुंतवणूक वरीलपैकी काही जोखीम बाळगून असतात. अनेकदा या जोखमींची आपल्याला जाणीव नसते किंवा आपण नकळत मान्य केलेली असते म्हणून त्याची भीती वाटत नाही. 
जोखीम आणि परतावा यांचे एक समीकरण आहे. परताव्याची अपेक्षा जितकी जास्त तितकी त्या गुंतवणुकीतील जोखीम जास्त. 

परतावा व जोखीम या दोन घटकांमुळे होणारे गुंतवणुकीचे दोन मूळ प्रकार : 1) तरल गुंतवणूक (Short Term Investment), 2) रोखे गुंतवणूक (Long Term Investment). 

1) तरल गुंतवणूक : 48 तासांत मोडून रोखीत रूपांतर करता येईल अशी ही अल्पमुदतीची गुंतवणूक असते तरल गुंतवणूक. या गुंतवणुकीवर व्याजदर कमी असतो. उदाहरणार्थ म्युच्युअल फंडांचे लिक्विड फंड, बॅंकांची अल्प मुदतीची ठेव योजना आदी. पुनर्गुंतवणूक करण्याची जोखीम बऱ्याच वेळा अल्पमुदतीच्या गुंतवणूक पर्यायांत आढळते. 

2) रोखे गुंतवणूक : ही गुंतवणूक दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी असते. उदाहरणार्थ पोस्टाच्या योजना, पीपीएफ, दीर्घ मुदतीच्या बॅंकेच्या ठेव योजना, कंपन्यांचे रोखे, राज्य व केंद्र सरकारचे रोखे आदी. दीर्घ मुदतीच्या योजनांमध्येही काही जोखीम आढळून येते. जसे- मुदतीआधी पैसे काढून घेण्याची सोय नसते. काढल्यास त्याचा परतावा/ व्याज बुडण्याची जोखीम (तरलता जोखीम), कंपन्यांचे रोखे व ठेवी यावर पतनामांकन कमी होण्याची जोखीम. 

गुंतवणूक करायची म्हटले, की जोखीम स्वीकारण्याची तयारी हवीच. त्यासाठीच जोखमीचे नियोजन करायला हवे. 
समतोल गुंतवणुकीतून हे नियोजन शक्‍य आहे. विविध तरल आणि रोखे गुंतवणुकीचे पर्यायांचा योग्य तो समतोल साधल्यास काही जोखीम कमी होते. उदाहरणार्थ स्थावर मालमत्तेमधील तरलता (Liquidity) जोखीम तरल गुंतवणुकीद्वारे (Short Term Investments) कमी करता येते. व्याजदर चढे असताना दीर्घ मुदतीची गुंतवणूक रोख्यांत करून व्याजदर कमी होण्याची जोखीम सांभाळता येते. 
जोखीमचा अंदाज घेऊन तिचे नियंत्रण करणे गुंतवणुकीचा महत्त्वाचा घटक आहे. आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, वय, आर्थिक परिस्थिती व उत्पन्नाचा विचार करूनच काही जोखीम घेता येते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा अभ्यास करूनच गुंतवणुकीचे पर्याय निवडावेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com