वंगभुमीतील विज्ञानोत्सव 

सम्राट कदम
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच वंगभुमीच्या राजधानीत 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाला अधिक समाजाभिमुख आणि समाजाला अधिक विज्ञानाभिमुख करण्याचा हा अभिनव उपक्रम होता.

देशातील क्रांतिकारकांची आणि साहित्यिकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्‍चिम बंगालला वैज्ञानिकांचा भूमी म्हणूनही ओळखले जाते. भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमन, डॉ. जगदीशचंद्र बसू, मेघनाथ सहा अशा दिग्गज वैज्ञानिकांचा मांदियाळी या वंगभुमीत नांदली. त्याच वंगभुमीच्या राजधानीत 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान पाचव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाला अधिक समाजाभिमुख आणि समाजाला अधिक विज्ञानाभिमुख करण्याचा हा अभिनव उपक्रम होता. विज्ञानाचे खरे उपभोक्‍ते असलेल्या सामान्य जनांपर्यंत वैज्ञानिक शोध, संशोधक आणि त्याची उपयुक्तता उत्सवातूनच अधिक प्रभावीपणे पोचते. असा हा उत्सव भारतीय विज्ञान भूमीत होणे हा दुग्धशर्करायुक्त योगच होता. (अर्थात राज्य सरकारच्या असहकारामुळे साखरेचा गोडवा काहीसा वेगळाच होता.)
Image may contain: 2 people

भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव जो 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टीवल' (आयआयएसएफ) नावाने ओळखला जातो. या महोत्सवाची सुरवात 2015 साली करण्यात आली. भारतीय विज्ञानातील उपलब्धींचा जागर आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, पृथ्वी विज्ञान विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग यांच्यासह विज्ञानातील देशी जनआंदोलन विज्ञान भारती या संस्थांच्या पुढाकाराने महोत्सवाची रचना करण्यात आली. यंदाच्या विज्ञानोत्सवाचे आयोजन कोलकत्यातील विश्‍व बांग्ला कन्व्हेन्शन सेटर, सायन्स सीटी, बोस इन्स्टिट्यूट आणि सत्यजित रे फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट अशा विविध स्थानावर हे आयोजन करण्यात आले. तीन गिनेस रेकॉर्ड, भव्य विज्ञान प्रदर्शन, आठ देशांचा सहभाग असलेल्या मंत्र्यांची परिषद, उत्तरपुर्व राज्यातील विद्यार्थ्यांचे संम्मेलन, महिला वैज्ञानिकांचे संम्मेलन, विज्ञान साहित्य संम्मेलन, आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव आदी 28 कार्यक्रमांचे आयोजन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्ये राहिले. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन चारही दिवस जातीने लक्ष घालत होते. असे जरी असले तरी, राज्य सरकारचा कोणताही लोकांचा आणि प्रशासनाचा प्रतिनिधी महोत्सवाकडे फिरकलाच नाही. 

महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरसींगद्वारे केलेल्या संबोधनाने झाले. राष्ट्राची प्रगती विज्ञाना शिवाय शक्‍य नाही त्यामुळे, लवकरात लवकर देशाला जगातील पहिल्या दोन तीन वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांच्या पंक्तीत नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. असे सांगत असतानाच त्यांनी वैज्ञानिकांनी संशोधनाचा दर्जा अधिक उंचावत आंतरराष्ट्रीय मानकांवर खरे उतरेल असे दर्जेदार संशोधन करण्याची आवश्‍यकता व्यक्त केली. सध्याच्या समाजापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या समस्यांना म्हणजेच प्लास्टिकच्या भस्मासूराला, प्रदूषणाच्या विळख्यातून शहरांना आणि जागतिक तापमानवाढीतून जगाला मुक्त करण्यासाठी आवश्‍यक संशोधन करावे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. ऊर्जेची भविष्यातील गरज आणि तिचे बदलते स्वरूप याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. सौर उर्जेसारख्या अपारंपरिक उर्जास्त्रोतांबरोबरच ऊर्जा संचयन करणाऱ्या बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्‍यक संशोधन शास्त्रज्ञांनी करावे असे त्यांनी सुचवले. पंतप्रधानांच्या संबोधनातून जरी देशातील विज्ञानाचा भविष्यातील परिपेक्ष लक्षात आला असेल, तरी इंटरनेटद्वारे लाइव्ह चालू असलेले प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे खंडित होणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची देशातील सद्यःस्थिती दर्शवते! 
Image may contain: 3 people, people sitting

आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवातील भव्य आयोजन म्हणून सायन्स सीटी मध्ये आयोजित विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगीक संस्थांच्या प्रदर्शनाकडे बघितले गेले. सुमारे साडे तीनशे संस्थांचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनाला सुमारे साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. इस्रो, डीआरडीओसह देशातील जवळपास सर्वच संशोधन संस्थांनी आपल्या वैज्ञानिक उपलब्धींचे प्रदर्शन या ठिकाणी मांडले होते. प्रदर्शनाच्या निमित्ताने देशात अवकाश विज्ञानापासून आदिवासी समाजाच्या समस्यांवर संशोधन करणाऱ्या संस्था आहेत, हे विद्यार्थ्यांसह सर्वांच्याच समोर आले. संशोधन संस्थांनाही आपण देश पातळीवर किती प्रगती केली आहे याचे आत्मपरीक्षण यानिमित्ताने करता आले. प्रदर्शनात अगदी डिजिटल माहितीपटापासून फक्त दोन चार भित्तिपत्रक चिटकवलेल्या संशोधन संस्थांचाही समावेश होता. विद्यार्थ्यांना या संशोधन संस्थांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया आणि संशोधन संस्थांच्या संशोधनाची दिशा सुद्धा लक्षात आली. आपल्या रोजच्या वापरात असलेल्या अनेक गोष्टींची निर्मिती, त्यांचे प्रामाणिकीकरण करणाऱ्या संशोधन संस्था, कर्करोग, जिवाणू, भूगर्भशास्त्र, जलविज्ञान अशा विविध जीवनावश्‍यक गोष्टींमध्ये संशोधन करणाऱ्या संस्थांची तोंड ओळख यानिमित्ताने झाली. विज्ञान प्रदर्शनाने विज्ञानाच्या महा उत्सवाला मूर्त स्वरूप दिले. 
Image may contain: 5 people, people sitting

महिला वैज्ञानिकांच्या दोन दिवसीय परिषदेने महोत्सवात आपले वेगळेपण सिद्ध केले. संशोधन क्षेत्रातही इतर क्षेत्रांप्रमाणे महिलांचा "स्पेस' जरासा कमी असल्याची खंत सर्वांनीच व्यक्त केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर मुलीने संशोधन क्षेत्राची वाट चोखंदळावी असे फार कमी पालकांना वाटते. त्यातही पीएचडी नंतर पूर्णवेळ संशोधनात जाणाऱ्यांचा टक्का फारच कमी असल्याचे सर्व महिला शास्त्रज्ञांच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवले. विशेष म्हणजे या परिस्थितीला देशाचे, कालखंडाचे आणि समाजाचे बंधन नाही. यत्र तत्र सर्वत्र हीच परिस्थिती आहे. महिला संशोधकांच्या परिषदेत सर्वांचे लक्ष वेधले ते राजस्थानच्या संतोषदेवींनी आणि महाराष्ट्राच्या अकोले या आदिवासी तालुक्‍यातून आलेल्या ममता देवराम भांगरे यांनी ! एका एकरात पंचवीस लाख रुपयांचे उत्पादन घेणाऱ्या संतोषदेवींची सेंद्रिय शेती सर्वांनाच भावली. ग्रामीण भागात नावीन्यपूर्ण उपक्रम करून आर्थिक उन्नतीचे साधन संतोषदेवींनी शास्त्रज्ञांसमोर मांडले. संतोषदेवींची "क्रेझ' इतकी होती की, शहरातले सर्व विद्यार्थी त्यांच्यासोबत सेल्फी घेत होते. ममता भांगरे यांनी पिकांना थेट खत मिळावे म्हणून गांडूळ खताची गोळी करुण झाडाच्या बुंध्या पाशी ठेवल्यास उत्पादन कसे वाढते याचे सादरीकरण केले. गाव शेताच्या बांधावर कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेल्या या महिलांना स्वतःचे संशोधन मांडण्यासाठी मोठे व्यासपीठ या माध्यमातून निर्माण झाले. यामुळे लोकोपयोगी संशोधन फक्त प्रयोगशाळांमध्ये पीएचडी धारक संशोधकांकडून होते असे नाही, तर ते रोज शेण-मातीच्या साहाय्याने निसर्गाच्या प्रयोगशाळेत सामान्य माणूसही करू शकतो हे सिद्ध झाले. महिला संशोधकांच्या समस्यांचे, यशाचे हितगूज या परिषदेच्या माध्यमातून झाले. 

महोत्सवाला जागतिक पातळीवर नेले ते तीन गिनीस विश्‍वविक्रमांनी ! सायन्स सिटीमध्ये जगात पहिल्यांदाच सर्वांत मोठ्या खगोलशास्त्राच्या तासाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सहभागी 1 हजार 598 विद्यार्थ्यांनी कार्डबोर्ड, कॉंम्पॅक्‍ट डिस्क यांच्या साहाय्याने स्पेक्‍ट्रोस्कोपी तयार केली! नुसती स्पेक्‍ट्रोस्कोपी तयार नाही केली तर, हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ताऱ्यांचे तापमान, त्यांतील रासायनिक रचनांचा अभ्यासही केला. गिनिस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला हा विश्‍वविक्रम सी.व्ही.रमण आणि मेघनाथ सहा यांना समर्पित करण्यात आला. विज्ञान महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी एका वेळेस सर्वांत जास्त विद्यार्थ्यांनी रेडिओ किट जोडण्याचा विश्‍वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. विश्‍वविक्रमात सहभागी 490 विद्यार्थ्यांपैकी 280 विद्यार्थ्यांनी बनविलेल्या किटचे परीक्षण करण्यात आले. ज्यापैकी 268 विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या हे कीट जोडले. गुणसुत्रांची मानवी साखळीच्या साहाय्याने प्रतिमा तयार करण्याच्या विश्वविक्रमात 415 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

- इंडियन सायन्स कॉंग्रेस आणि आयआयएसएफ 
देशामध्ये विज्ञान क्षेत्रातील जुनी आणि प्रतिष्ठेची परिषद म्हणून इंडियन सायन्स कॉंग्रेस ओळखली जाते. ही परिषद असतानाही भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) सुरू करण्याची आवश्‍यकता आहे का? असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. पण या दोनही परिषदा वेगवेगळ्या परिपेक्षात आहे. सायन्स कॉंग्रेस ही प्रामुख्याने संशोधक विद्यार्थी, शास्त्रज्ञ आणि संशोधनाशी जास्त निगडित असते. त्यामध्ये शेतकरी, कामगार, नवउद्योजक याच्या वैज्ञानिक प्रतिभेला स्थान मिळेलच असे नाही. विज्ञान महोत्सवामुळे विज्ञान अधिक प्रभावीपणे जनमानसात पोहचते. भारतीय जनमानसात उत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे, त्यामुळे विज्ञानाच्या उत्सवातूनच वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सर्वदूर पोचेल. 

महोत्सवातील ठळक उपक्रम 

- विद्यार्थ्यांच्या स्वप्नातले "विज्ञान ग्राम' 

देशभरातील खासदारांनी आपल्या लोकसभा मतदार संघातून पाच विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची विज्ञान महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड केली होती. या सहभागी झालेल्या मुलांनी विज्ञानाच्या गावाची म्हणजेच "विज्ञान ग्राम'ची निर्मिती केली. सहा मोठ-मोठ्या पॅंडॉलमध्ये हे गाव वसविण्यात आले. यामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयांतील प्रयोगाबरोबरच विविध प्रदर्शनांची मांडणी करण्यात आली होती. देशातील दिग्गज वैज्ञानिकांशी या विद्यार्थ्यांनी संवाद साधला, त्यांना प्रश्‍न विचारले, त्यांची वैज्ञानिक होण्यामागची प्रेरणा काय? त्यांनी अभ्यास कसा केला असे विविध प्रश्‍न विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनात सहभाग घेतला. स्वतः तयार केलेल्या वैज्ञानिक प्रयोगाचे त्यांनी प्रदर्शन मांडले. इतर विद्यार्थ्यांनी त्यांना भेटी देत विविध प्रश्‍न विचारले. नागपूर येथील अकरावीच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त गावासाठी जलसंधारणाची योजना आखली. त्या योजनेचे सुंदर प्रदर्शन त्यांनी मांडले होते. 

- पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांचे सम्मेलन 
निसर्गाचा वरदहस्त लाभलेला प्रदेश म्हणजे देशाचा पूर्वोत्तर भाग. या मध्ये आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालैंड, मणिपूर, मेघालय आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश होतो. निसर्गपुजक असलेला हा समाज पर्यावरण पूरक जिवनशैलीसाठी ओळखला जातो. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि भविष्यातील निसर्गपुरक नागरिक निर्माण करण्यासाठी या राज्यांतील विद्यार्थ्यांची मोठी भूमिका असेल. त्यासाठी या विशेष सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सम्मेलनाचे उद्घाटन मणिपूर राज्याचे शिक्षण मंत्री ताकचंद राधेश्‍याम यांनी केले. या वेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय सचिव जयंत सहस्रबुद्धे, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. संबीत के. राय, डॉ. राजीव शर्मा असे दिग्गज उपस्थित होते. यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. दोन दिवस चालणाऱ्या सम्मेलनाच्या शेवटी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

- विज्ञानाचे साहित्य संम्मेलन "विज्ञानिका' 
विज्ञान महोत्सवाच्या चारही दिवस आंतरराष्ट्रीय विज्ञान साहित्य संमेलनाचे म्हणजेच "विज्ञानिका'चे आयोजन करण्यात आले. जगभरात विज्ञान लोकांपर्यंत पोचावे यासाठी लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचे, कादंबऱ्यांचे प्रदर्शन तसेच साहित्तीक चर्चांचे आयोजन यात करण्यात आले होते. विज्ञान साहित्य लेखणाशी निगडित विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे विज्ञान कवी संम्मेलनही येथे पार पडले. 

- आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव 
कोलकता शहरातील सत्यजित रे फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इंस्टीट्यूट येथे जागतिक विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जगभरातील विज्ञानाशी निगडित चित्रपटांचे सादरीकरण येथे करण्यात आले. मिशन मंगळ, परमाणू यांसारख्या देशी चित्रपटांसहीत विदेशातील इलेमेन्ट 112, द मारीनोव्ह अफेअर अशा विदेशी चित्रपटांचे सादरीकरण महोत्सवात करण्यात आले. तसेच चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांच्या चर्चा सत्राचे आयोजन झाले.

इतर ब्लॉग्स